नीलपुष्पी : (१) फुलांसह वनस्पती, (२) फूल, (३) फळ, (४) बी.नीलपुष्पी: (हिं. शंखपुष्पी गु. काळी शंखावली क. विष्णुक्रांती सं. विष्णुक्रांता लॅ. इन्हॉल्व्युलस अल्सिनॉइडिस कुल-कॉन्‌व्हॉल्‌व्ह्युलेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी उघड्या व गवताळ जागी तणासारखी भारतात सर्वत्र व हिमालयात १,८६० मी. उंचीपर्यंत आढळते. पावसाळ्यात दख्खन कोकण व गुजरात येथे सामान्यपणे आढळते. मूलक्षोड (जमिनीतील जाड खोड) काष्ठमय, लहान, नाजूक, ५ सेंमी. पेक्षा लांब व जमिनीसरपट वाढणारी खोडे तारेसारखी व केसाळ असतात. पाने साधी, एकाआड एक, भरपूर, लहान, काहीशी लांबट व तळाजवळ निमुळती असून रेशमी केसांनी आच्छादलेली असतात. फुले फिकट निळी, सच्छद (तळाजवळ लहान उपांगे असलेली), एकाकी किंवा कधीकधी जोडीने पानांच्या बगलेत, लांब देठावर जुलै—नोव्हेंबरात येतात. फळ (बोंड) गोलसर व तडकल्यावर त्याची चार शकले होतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॉन्‌‌व्हॉल्व्ह्युलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती कडू, शक्तिवर्धक, जंतनाशक व आमांशावर गुणकारी असते. जुनाट श्वासनलिकादाह आणि दमा यांवर पानांच्या विड्या करून ओढतात. काविळीवर मुळी ताकातून देतात.

जमदाडे, ज. वि.