अंबाडा : (रान-आंबा हि. अम्रा क. अमटे, अवटेकाई सं. आम्रतक इ. बाइल ट्री, इंडियन हॉग प्लम लॅ.स्पाँडियास मँजिफेरा कुल-ॲनाकार्डिएसी). सु. १० मी. उंचीच्या या पानझडी वृक्षाचा प्रसार ब्रह्मदेश, अंदमान,श्रीलंका, हाँगकाँग, हिंदी द्वीपसमूह व भारत (उपहिमालय प्रदेश, चिनाब ते पूर्वेकडे, पश्चिम द्वीपकल्प, महाराष्ट्रातील पानझडी जंगले, उत्तरकारवार इ.) इ. ठिकाणी आहे. साल करडी, जाड व गुळगुळीत पाने एकांतरित, मोठी, संयुक्त, विषमदली-पिच्छाकृती [→पान] दले ९-१३, समोरासमोर, लांबट, तळास तिरपी, पातळ, चकचकीत फुले लहान, विखुरलेली, हिरवट पांढरी, एकलिंगी किंवा द्विलिंगी, मोठ्या व शेंड्याकडील परिमंजरीवर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. अश्मगर्भी (बाठा असलेले) फळ पिवळे असून नोव्हेंबर-डिसेंबरात येते बी बहुधा एकच. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ॲनाकार्डिएसीकुलात वर्णिल्याप्रमाणे. लाकूडनरम सालीतून पाझरणारा डिंक काळसर व बाभळीच्या डिंकासारखा असतो. फळ आमटीत घालतात किंवा त्याचे लोणचे करतात. साल कातडी कमावण्यास उपयुक्त पाने व फळे जनावरे खातात. साल थंडावा देणारी असते. ती आमांशावर देतात. तिचे पीठ पाण्यात कालवून संधिवातात संधींवर बाहेरून चोळतात. फळ स्तंभक (आकुंचन करणारे) व स्कर्व्ही रोगास विरोधक. पानांचा रस कानदुखीवर लावतात. डिंक शामक असतो.

जमदाडे, ज. वि.