अँटिगोनॉन लेप्टोपस : (इं. सँडविच आयलंड क्रीपर, कोरल क्रीपर, होनोलुलु क्रीपर कुल—पॉलिगोनेसी). ही सुंदर पानझडी वेल (आरोहिणी) मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे तथापि हल्ली ती इतर देशांत भिंतीवर, खांबावर, कुंपणावर व मांडवावर शोभेकरिता लावली जाते मुळे ग्रंथिल पाने हृदयाकृती ते त्रिकोणी, टोकदार, लांब देठाची व तरंगित (नागमोडी) कडांची असतात. फुले लहान, नाजूक, ५ सुट्ट्या परिदलांची असून ती पानांच्या बगलेत लांब मंजरीवर सबंध पावसाळा व हिवाळाभर येत असतात. त्याच मंजरीच्या टोकास काही फुलांचे देठ प्रतानात (ताण्यात) रूपांतर पावलेले असतात, त्यामुळे वेलीला आधार घेऊन चढता येते. पांढरी, लाल व गर्द गुलाबी फुले असलेले प्रकार भिन्न समजले जातात. फळ कपाली (कृत्स्नफल) व सतत राहणार्या परिदलाने वेढलेले असते [→फळ] त्यात एकच बीज असते. नवीन लागवड बिया व कलमे लावून करतात.
पहा : पॉलिगोनेसी.
जमदाडे, ज. वि.
“