खांडवेल : (लोखंडी हिं. पिट्टी गु. रगतर्शदो क. पोपळी सं. रक्तवल्ली इं. रेड क्रीपर लॅ. व्हेटिलॅगो मॅड्रसपॅटना कुल-ऱ्हॅम्नेसी). ही अनेक फांद्यांची ⇨महालता (मोठी वेल) श्रीलंका, तेनासरीम (ब्रह्मदेश) आणि भारत (तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, कारवार, कोकण इ.) येथील मॉन्सून जंगलांत आढळते. शारीरिक लक्षणे सामान्यत: ⇨ऱ्हॅम्नेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने मध्यम आकाराची, साधी, दंतूर किंवा अखंड पुष्पबंध (फुलोरा) शेंड्याकडे व लोंबत्या, लवदार परिमंजरी प्रकारचा असतो. हिची हिरवट, लहान, दुर्गंधी फुले जानेवारीत येतात. फळ पिवळट, गोल, स‌पक्ष (पंखासारखा विस्तारलेला भाग असलेले), शुष्क, कपाली (कठीण व आपोआप न फुटणारे) व एका कप्प्याचे असते. फळाला स‌पाट संवर्ताचा (पुष्पकोशाचा) फक्त आधार मिळतो. मुळाच्या सालीपासून काढलेला रंग रेशमी कपडे रंगविण्यास वापरतात. सालीची पूड उत्तेजक, ज्वरनाशी, वायुनाशी आणि दीपक (भूक वाढविणारी) असून तिळाच्या तेलातून ती पूड खरजेवर व इतर चर्मरोगांवर लावतात.

पहा : कानवेल.                                                      

जोशी, रा. ना.