क्लोव्हर : (लॅ. ट्रायफोलियम कुल-लेग्युमिनोजी, पॅपिलिऑनेटी). हे इंग्रजी नाव फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या ट्रायफोलियम वंशातील सु. ३०० जातींना सामान्यपणे दिले जाते. यातील कित्येक जाती (भारतात दहा) लागवडीत असून समशीतोष्ण कटिबंधात त्या चांगल्या वाढतात. त्यांचा नैसर्गिक प्रसार तेथे व उपोष्ण कटिबंधात आहे. या जाती बहुतेक द्विवर्षायू व बहुवर्षायू (दोन व अनेक वर्षे जगणाऱ्या) आणि काही वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ ओषधी आहेत. त्यांची पाने संयुक्त व त्रिदली आणि फुले लहान, अनेक, पांढरी, पिवळी, लाल किंवा जांभळी असून स्तबक व कणिश यांसारख्या फुलोऱ्यांवर येतात [→ पुष्पबंध]. शेंगा सरळ व बिया १—५ असतात.

क्लोव्हर (ट्रायफोलियम इन्कार्नेटम)

मेलिलोटस (स्वीट क्लोव्हर), लेस्पेडेझा (बुश क्लोव्हर), मेडिकॅगो (बर क्लोव्हर), लोटस (बर्ड्‌स फूट क्लोव्हर), पेटॅलोस्टेमॉन (प्रेअरी क्लोव्हर) व ऑर्थोकार्पंस (आउल्स क्लोव्हर) या सर्वांना क्लोव्हरच म्हणतात. काही क्लोव्हरांची पाने ४–७ दलांची असून चार दलांच्या क्लोव्हरांना पाश्चात्त्यांनी भाग्याचे प्रतीक मानले आहे.

सर्व क्लोव्हरांच्या मुळांवरील गाठींत विशिष्ट सूक्ष्मजंतूंची वस्ती [→ लेग्युमिनोजी] असल्याने त्यांच्या साहाय्याने नायट्रोजनाचे स्थिरीकरण होते म्हणून क्लोव्हराच्या पिकाखालच्या जमिनीत नायट्रोजनयुक्त पदार्थ भरपूर साठून राहतात आणि त्यामुळे जमीन सुपीक बनते. शिवाय पीक जमिनीत गाडल्याने जमिनीला अधिक खत मिळून तिचा पोतही सुधारतो. पानांमध्ये गवतापेक्षा अधिक खनिजे, शिवाय जास्त प्रथिने असल्याने पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने यांचे पीक फार महत्त्वाचे ठरले आहे लोकर, दूध व मांस यांमध्ये निश्चित वाढ होते असे आढळले आहे. म्हणून क्लोव्हरांचे काही संकरज (भिन्न वंश व जाती यांच्या संकराने झालेली संतती) प्रकार देखील काढण्यात आले आहेत. उ. भारतात मेलिलोटसाच्या तीन जातींची चाऱ्याकरिता लागवड करतात. वनमेथी (सेंजी मे. इंडिका इं. स्वीट क्लोव्हर), अस्पुर्क (मे. ऑफिसिनॅलिस इं. यलो स्वीट क्लोव्हर) व व्हाइट स्वीट क्लोव्हर (मे. आल्बा) ह्या जाती औषधीही आहेत.

परांडेकर, शं. आ.