सेडम : (इं. स्टोनक्रॉप कुल-क्रॅसुलेसी). ह्या बहुवर्षायू, मांसल ⇨ओषधीचे मूलस्थान समशीतोष्ण व शीत कटिबंधीय प्रदेशात असून त्यांच्या एकूण सु. २८० (विलिस यांच्या मते ६००) जाती आहेत. लॅटिन भाषेतील सेडेस (म्हणजे बसणे) या शब्दावरून सेडम हे प्रजातिवाचक नाव पडले आहे. त्यांचे वास्तव्य खडकाळ व रुक्ष जागी किंवा भिंतीवर असते इंग्रजी नावही यालाच अनुसरून आहे. ⇨कलांचो, ⇨ पानफुटी, ⇨कॉटिलेडॉन इ. बागेतील शोभेच्या वनस्पतींच्या कुलात या वनस्पतींचा समावेश असून काही लक्षणे सारखी आहेत [⟶ क्रॅसुलेसी ]. खोड कधी सरळ व कधी रांगते आणि पाने लहान, मांसल, साधी, विविध आकारांची, बहुधा गुळगुळीत व खोडावर गर्दीने वाढणारी फुले लहान, ४-५ भागी, पांढरी किंवा पिवळट, लाल, क्वचित गुलाबी किंवा निळसर असून फांद्यांच्या टोकास कुंठित फुलोऱ्यावर येतात. पेटिकासम फळे झुबक्याने येतात.

सेडम वनस्पती बागेत शोभेकरिता वाफ्याच्या कडेने किंवा कुंड्यांत व शैलोद्यानात विशेषेकरून लावतात. सार, कोशिंबीर किंवा भाजीकरिता काही जाती उपयोगात आहेत. भारतात दोन जाती (से. मल्टिकॉन से. क्रॅसिपेस ) हिमालयात (अनुक्रमे सस.पासून १,२००-२,००० मी. व ३,४००-५,००० मी. उंचीवर) आढळतात. त्या वेदनाहारक, जखमा भरून आणणाऱ्या व सूज नाहीशा करणाऱ्या आहेत.

परांडेकर, शं. आ.