यकृतका : (इं. लिव्हरवर्ट्‌स लॅ. हिपॅटिसी). बीजांच्या साहाय्याने आपली निर्मिती न करणाऱ्या [⟶ वनस्पति, अबीजी विभाग] वनस्पतींच्या एका मोठ्या गटातील ⇨ शेवाळी (ब्रायोफायटा) या उपविभागातील (हल्ली हा विभाग मानतात) तीन प्रमुख वर्गांपैकी एक वर्ग. पूर्वी या वर्गात (१) ॲन्थोसिरोटेलीझ, (२) मार्केन्शियेलीझ आणि (३) जंगरमॅनियेलीझ असे तीन गण अंतर्भूत केले जात. आजही तीच विभागणी काही पाठ्यपुस्तकांत आढळते परंतु हल्ली (एम्‌. ए. हौ यांच्या १८९९ मधील सूचनेप्रमाणे) ॲन्थोसिरोटी या नावाने ॲन्थोसिरोटेलीझ गणाला समान दर्जा दिला जातो त्यामुळे शेवाळ्यांचे (१) हिपॅटिसी, (२) ॲन्थोसिरोटी व (३) मुस्सी असे तीन वर्ग काहींनी (उदा., जे. एच्‌. शॅफनर यांनी १९३४ मध्ये) मान्य केले आहेत परंतु त्यांचे नैसर्गिक परस्परसंबंध (आप्तभाव) महत्त्वाचे समजून शेवाळी वर्गाचे हे तीन उपवर्ग समजावेत असे काहींना वाटते. जी. एम्‌. स्मिथ यांनी जे. एच्‌. शॅफनर यांच्याप्रमाणे त्यांना वर्गच मानले आहे. येथे फक्त पहिल्या दोन वर्गांची रूपरेखा दिली असून तिसऱ्या वर्गाची (मुस्सीची) माहिती ‘हरिता’ या स्वतंत्र नोंदीत दिली आहे. ह्या सर्वच वनस्पती अनेक ऊतकांच्या (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांच्या) बनलेल्या असून त्यांचे शरीर क्षुद्र पण कोमल कायकाभ (अत्यंत साधे) असते तथापि ⇨कायक वनस्पतीपेक्षा त्या अधिक प्रगत आहेत.

हिपॅटिसी : (यकृतका). ओलसर जमिनीवर वाढणाऱ्या ह्या हिरव्याचार वनस्पतींचे शरीर अत्यंत साधे (कायक), सपाट, लहान पानासारखे, कमीजास्त विभागलेले, मर्यादित वाढ असलेले, जमिनीशी मुळांऐवजी एककोशिक किंवा अनेककोशिक तंतूप्रमाणे दिसणाऱ्या मूलकल्पांनी (मुळावरील केसासारख्या उपांगांनी) आणि खवल्यांनी (शल्कांनी) चिकटलेले असते (उदा., रिक्सिया मार्केन्शिया  इ.) काही वनस्पतींत (उदा., जंगरमॅनिया ) फार लहान आकारमानाचे साधे खोड, त्यावर साधी पातळ पाने व तळाशी सूक्ष्म मूलकल्प असतात. मूलकल्पाद्वारे आधार, पाणी आणि लवणे मिळतात व इतर भागांतील हरितद्रव्यामुळे प्रकाशात अन्ननिर्मिती होते. सपाट शरीरातील अंतर्रचनेत वरचा आणि खालचा पृष्ठभाग ओळखण्याइतके कमीजास्त प्रभेदन (फरक) आढळते. खोड व पाने असल्यास वाहक घटक (उच्च वनस्पतीतल्याप्रमाणे विशेष प्रकारचे) नसतात ते कार्य काही लांबट, साध्या कोशिका करतात. काहींत सर्वच शरीरातील ऊतके सामान्यपणे सारखी असतात तथापि काहींत भिन्न ऊतकांमुळे थोडेफार प्रभेदन आढळते. हवा आत-बाहेर जाण्यास काहींत सूक्ष्म छिद्रे असतात. काही जाती वृक्षांच्या सालीवर अथवा खडकांवर आढळतात, तर काही अन्य झाडांच्या पानांवर ⇨अपिवनस्पतीप्रमाणे जगतात. रिक्सियाच्या काही जाती पाण्यावर तरंगतात रिएलाच्या जाती सर्वस्वी त्यात बुडून असतात. जीवनचक्रातील ही त्यांची गंतुकधारी (लैंगिक प्रजोत्पादन करणारी आणि कोशिकांत रंगसूत्रांचा-एका पिढीतून पुढील पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांचा-एकच संच असणारी) अवस्था असते. कित्येकांत पुं- व स्त्री- कायक भिन्न असतात काहींत मात्र दोन्ही प्रकारची गंतुकाशये (लैंगिक प्रजोत्पादक कोशिका निर्मिणारी इंद्रिये) एकाच कायकावर असतात. गंतुकाशये वनस्पतीच्या टोकाजवळ (उदा., टार्जिओनिया) किंवा कायकाच्या वरच्या बाजूस असतात व तेव्हा त्यांची निर्मिती पृष्ठभागावरच्या कोशिकांपासून होते. सर्वच शेवाळ्यांत (नेचांतल्याप्रमाणे) ही गंतुकाशये अनेक कोशिकांची बनलेली असून त्यांवर वंध्य कोशिकांचे आवरण असते (कायक वनस्पतींत असे नसते) त्यांचा विकास साधारणतः ⇨ नेफ्रोलेपिस नेचाप्रमाणे असतो. त्यांना ‘रेतुकाशय’ (पुं-गंतुकाशय) व ‘अंदुककलश’ (स्त्री – गंतुकाशय) म्हणतात. रेतुकाशय लहान गोलसर असून पक्वावस्थेत ते फुटते व त्यातून अनेक द्विकेसली (जीवद्रव्याचे-कोशिकेतील जटिल सजीव द्रव्याचे-केसासारखे दोन धागे असलेल्या) प्रजोत्पादक पुं-कोशिका (रेतुके) बाहेर पडतात. अंदुककलशाचा आकार लांबट मान असलेल्या चंबूसारखा असून त्याच्या फुगीर तळभागास ‘अंदुस्थली’ व मानेस ‘ग्रीवा’ म्हणतात. अंदुस्थलीत एकच अंदुक (अंडे स्त्री-कोशिका) असून त्यावर मानेच्या खालच्या बाजूस ‘औदरमार्ग कोशिका’ व मानेत काही ‘ग्रीवामार्ग कोशिका’ असतात. पक्वावस्थेत अंदुकाखेरीज इतर सर्व कोशिकांचा नाश होतो व त्यामुळे रेतुके पाण्यातून पोहत मानेतून अंदुकाकडे येतात (सर्वच शेवाळ्यांत बाहेरच्या पाण्याशिवाय लैंगिक प्रजोत्पादन होत नाही). एका रेतुकाचा अंदुकाशी संयोग होतो (फलन होते) व रंदुक (संयुक्त कोशिका) बनते. यामुळे दोन एकगुणित (रंगसूत्रांचा एकच संच असलेल्या) कोशिकांचे मीलन होऊन द्विगुणित (रंगसूत्रांचे दोन संच असलेली) कोशिका बनते. येथे दुसरी पिढी (बीजुकधारी पिढी) सुरू होते, तिला ‘बीजुकधर’ म्हणतात. रंदुकाचा विकास पुनःपुन्हा होणाऱ्या त्याच्या विभागणीमुळे व मर्यादित वाढीमुळे होऊन ती द्विगुणित पिढी प्रभेदित होते. काही जातींत पद (तळभाग), दंड (लांब देठासारखा मध्य भाग) व टोकास बीजुकाशय (विशेषतः बीजुकांनी-सूक्ष्म प्रजोत्पादक कोशिकांनी-भरलेली पिशवी) असे प्रभेदन आढळते (उदा., मार्केन्शिया ) काहींत (उदा., रिक्सिया) फक्त बीजुकाशय बनते तर काहींत दंड नसतो (उदा., कॉर्सिनिया ). रंदुकाच्या विकासात प्रारंभिक अवस्थेत ज्या वेळी तो अनेक कोशिकांचा गोळा असतो, त्या वेळी त्याचा सर्वांत बाहेरचा भाग (स्तर) आतील अनेक कोशिकांच्या थरांपासून भिन्नत्व दर्शवितो, त्याला बाह्यकोश म्हणतात. बाहेरील थर वंध्य असून आतील भाग जननक्षम असतो. ह्या आतील अनेक थरांचे (अंतःकोशाचे) रूपांतर लागलीच अनेक बीजुकजनक कोशिकांत होते शेवटी प्रत्येक बीजुकजनक कोशिकेचे न्यूनीकरण (अर्धसूत्रण) विभाजन होऊन [⟶ कोशिका] एकगुणित चार कोशिका (बीजुके) बनतात. हीच बीजुकधारी पिढी असून ती बव्हंशी पहिल्या गंतुकधारीवर अवलंबून असते. ज्या अंदुस्थलीत ती बनते ती फुटून बीजुके बाहेर पडतात व वाऱ्याने दूरवर नेली जातात पुढे ओलावा मिळेल तेव्हा ती रुजून नवीन गंतुकधारी पिढी वाढू लागते. याप्रमाणे गंतुकधारी व बीजुकधारी पिढी यांचे एकांतरण (एकानंतर दुसरी तिच्यापासून पुन्हा पहिली) घडून येते. शरीराच्या काही सामान्य भागांपासूनही नवीन वनस्पती (शाकीय पद्धतीने) निर्माण होतात.


 आ. १. मार्केन्शिया : (अ) कायकाचा उभा छेद : (१) वायुरंध्र, (२) अपित्वचा, (३) हरितकणयुक्त ऊतक, (४) मृदूतक, (५) मूलकल्प, (६) शल्क (आ) कायक (स्त्री-गंतुकधारी) : (१) मुकुलिका-चषक, (२) मूलकल्प, (३) अंदुककलशधारी, (४) अंदुककलशबिंब, (५) अंदुककलशबिंबाचा छेद (इ) कायक (पुं-गंतुकधारी) : (१) मुकुलिका-चषक, (२) मुकुलिका, (३) रेतुकाशयशधारी, (४)रेतुकाशयबिंब, (५) रेतुकाशयबिंबाचा छेद (ई) रेतुकाशयाचा उभा छेद : (१) देठ, (२) आवरण, (३) रेतुकजनक कोशिका, (४) रेतुके, (५) रेतुक (विवर्धित) (उ) अंदुककलशाचा उभा छेद : (१) अंदुक, (२) अंदुस्थली, (३) ग्रीवा (ऊ) बीजुकधराचा उभा छेद : (१) पद, (२) दंड, (३) बीजुकाशय, (४) आभासी पद, (५) पिधानी, (६) बीजुक, (७) क्षेपक.यकृतकाच्या सर्वांत जास्त जाती उष्ण कटिबंधात आढळतात एकूण प्रजाती सु. २२५ व जाती सु. ८,५०० आहेत. त्यांपैकी जंगरमॅनियेलीझ या गणात सु. १८० प्रजाती आहेत. यकृतका वर्गात आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे मार्केन्शियेलीझ व जंगरमॅनियेलीझ हे दोन गण घातले आहेत तथापि हल्ली काही शास्त्रज्ञ [एफ्‌. कॅव्हर्स (१९१०) आणि डी. एच्‌. कॅम्बेल (१९३६)] स्फीरोकार्पेलीझ व कॅलोब्रियेलीझ ही नावे जंगरमॅनियेलीझपासून वेगळ्या केलेल्या काही यकृतकांच्या गटांना आ. १. मार्केन्शिया : (अ) कायकाचा उभा छेद : (१) वायुरंध्र, (२) अपित्वचा, (३) हरितकणयुक्त ऊतक, (४) मृदूतक, (५) मूलकल्प, (६) शल्क (आ) कायक (स्त्री-गंतुकधारी) : (१) मुकुलिका-चषक, (२) मूलकल्प, (३) अंदुककलशधारी, (४) अंदुककलशबिंब, (५) अंदुककलशबिंबाचा छेद (इ) कायक (पुं-गंतुकधारी) : (१) मुकुलिका-चषक, (२) मुकुलिका, (३) रेतुकाशयशधारी, (४)रेतुकाशयबिंब, (५) रेतुकाशयबिंबाचा छेद (ई) रेतुकाशयाचा उभा छेद : (१) देठ, (२) आवरण, (३) रेतुकजनक कोशिका, (४) रेतुके, (५) रेतुक (विवर्धित) (उ) अंदुककलशाचा उभा छेद : (१) अंदुक, (२) अंदुस्थली, (३) ग्रीवा (ऊ) बीजुकधराचा उभा छेद : (१) पद, (२) दंड, (३) बीजुकाशय, (४) आभासी पद, (५) पिधानी, (६) बीजुक, (७) क्षेपक. वापरतात व त्यांना गणाचा दर्जा देतात म्हणजेच यकृतकात (ॲन्थोसिरोटेलीझ वेगळे केल्यावर) तीन गण अंतर्भूत करतात.

मार्केन्शियेलीझ : या गणातील वनस्पतींची लहान गंतुकधारी पिढी जमिनीवर सपाट वाढते ती रुंद पट्टीप्रमाणे असून द्विशाखाक्रमाने वाढते तिला पाने नसतात. अंतर्रचनेतील तपशिलावरून तिचा वरचा व खालचा पृष्ठभाग ओळखता येतो. काही अपवाद वगळल्यास इतर प्रजातीतील जातींत वरच्या पृष्ठामध्ये वायुकोटरे व त्यांत हरितकणयुक्त कोशिका असून त्यांचा बाहेरील हवेशी साध्या किंवा जटिल संरचनेच्या छिद्रांतून (वायुरंध्रांतून) संपर्क असतो. खालच्या पृष्ठामध्ये अन्नसंचय करणारे ⇨ मृदूतक, वाहक कोशिकांची बनलेली साधी व प्रारंभिक जुडी, पृष्ठापासून खाली जमिनीशी संपर्क राखणारे दोन प्रकारचे मूलकल्प, खवल्यासारखे केस इ. लक्षणे उल्लेखनीय आहेत. गंतुकाशये वर वर्णन केल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे असून त्यांचे गंतुकधारीवरील स्थान भिन्न प्रजातींत असू शकते. तसेच बीजुकधारींची संरचना, त्यांचे गंतुकधारीवरील स्थान व प्रभेदन यांमध्येही भिन्न प्रजातींत फरक आढळतात. यावर ह्या गणातील वर्गीकरण ठरविलेले आहे. या गणात सु. ३२ प्रजाती व सु. ४०० जाती आहेत. त्यांचा अंतर्भाव पाच कुलांत असून त्यांपैकी रिक्सियेसी [⟶ रिक्सिया] कुल सर्वांत प्रारंभिक आणि मार्केन्शियेसी सर्वांत प्रगत असे मानतात तथापि ही बाब विवाद्य आहे. कॉर्सिनियेसीतील कॉर्सिनिया प्रजाती सर्वज्ञात आहे परंतु ती भारतात आढळत नाही. टार्जिओनियेसीतील सायथोडियम व टार्जिओनिया प्रजातींचा प्रसार जगभर आहे. भारतात काही जाती आढळतात. मोनोक्लियेसी कुलातील एकमेव प्रजातीत दोन जाती आहेत परंतु भारतात एकही नाही. मार्केन्शियेसी कुलात सु. २३ प्रजाती व २५० जाती आहेत. सर्वच जातींत अंदुककलश एका लहान उभ्या दांड्याच्या वर (अंदुककलशधरावर) बिंबावर असतात.

मार्केन्शिया ही सामान्यपणे सर्वपरिचित प्रजाती असून तीत सु. ६५ जाती (भरपूर पाऊस व थंडी असते तेथे) आहेत. मार्केन्शिया पॉलिमॉर्फा ह्या जातीचा प्रसार मोठा असून ती भारतात आढळते. हिच्या प्रजातीतील रेतुकाशयेसुद्धा स्वतंत्र, उभ्या, सरळ दांड्यावरच्या बिंबावर (रेतुकाशयधरावर) असतात ती सर्व आकाशाकडे वळलेली असतात परंतु अंदुककलशधरावरच्या बिंबावर, ते बिंबच प्रौढावस्थेत खाली वळल्याने, अंदुककलश खाली जमिनीकडे वळलेले असतात तत्पूर्वी अंदुकांचे फलन झालेले असते व त्या वेळी अंदुककलशांच्या ग्रीवा व त्यांची छिद्रे वर असतात. या जातीत पुं- व स्त्री- कायक भिन्न असतात. बीजुकधराचा विकास होत असताना अंदुककलशाच्या तळातून व बीजुकधराच्या पदाखाली एक संरक्षक आवरण (आभासी परिदल मंडल) बनते पुढे त्यातून दंड व बीजुकाशय बाहेर वाढतात तत्पूर्वी अंदुकस्थलीपासूनही एक आवरण (पिधानी) बनते परंतु ते फुटून त्यातून बीजुकाशय बाहेर येते, पुढे ते तडकते व बीजुकाशिवाय त्यातून अनेक पिळवटलेल्या धाग्यांसारखे तंतूही बनतात ते अविकसित बीजुकजनक कोशिका असतात हे तंतू (क्षेपक) आर्द्रताशोषक असल्याने हवेतील ओलावा शोषून घेतात त्यामुळे त्यांची जी यांत्रिक हालचाल होते त्यामुळे बीजुकांचे विकिरण (स्थलांतर) होते. ओल्या जमिनीवर बीजुक रुजून त्यातून अनियमितपणे वाढलेला सहा ते आठ कोशिकांचा तंतू बनतो व त्याच्या विकासापासून पुढे गंतुकधारी पूर्ववत वाढतो. कायक शरीराच्या वरच्या पृष्ठभागावर (उदा., मार्केन्शिया) लहान पेल्यासारख्या अवयवात (मुकुलिका-चषकात) हिरव्या टिकल्यांसारख्या कळ्या (मुकुलिका) बनतात त्या शरीरापासून अलग होऊन नवीन कायक निर्माण करतात. कायकांच्या तुकड्यांपासूनही नवीन उत्पत्ती निसर्गतः होते. रिक्सियाची तपशीलवार माहिती स्वतंत्र नोंदीत दिली आहे. [⟶ रिक्सिया].


आ. २. ॲन्थोसिरोस : (अ) संपूर्ण वनस्पती : (१) कायक (गंतुकधारी), (२) मूलकल्प, (३) बीजुकाशयाचे आवरण, (४) बीजुकाशय, (५) कील, (६) शकल (आ) बीजुकधराचा तळभाग (उभा छेद) : (१) पद, (२) बीजुकाशयाचा तळभाग (३)  बीजुकजनक थरातील बीजुकपूर्वज कोशिका, (४) कील (इ) त्वग्रंध्राचे पृष्ठदृश्य : (ई) बीजुकाशयाचा अपक्व भाग (उभा छेद) : (१) अपित्वचा, (२) हरितकणयुक्त कोशिकांचे आवरण, बीजुकजनक कोशिका, (४) क्षेपक, (५) कील (उ) बीजुकाशयाच्या पक्व भागाचा उभा छेद : (१) व (२) ई प्रमाणे, (३) क्षेपक, (४) बीजुकांच्या चौकड्या, (५) कील. जंगरमॅनियेलीझ : (स्फीरोकार्पेलीझ व कॅलोब्रियेलीझ यांसह). यकृतकांच्या ह्या गणात अंतर्भूत केलेल्या जाती मुख्यतः उष्ण कटिबंधीय असून त्या अन्य वृक्षांच्या सालीवर, पानांवर किंवा जमिनीवर वाढतात याची एकूण संख्या सु. ९०० असून यकृतका विभागातील सु. ९०% जाती या गणात अंतर्भूत आहेत. काहींचे शरीर रिक्सियासारखे (उदा., मेट्झगेरिया फर्‌कॅटा ) किंवा मार्केन्शियासारखे (उदा., पेलिया ) असून इतर काहींत ते पानांसारख्या घटकांनी बनलेले असते ही पाने एका लांबट देठासारख्या खोडवजा भागांवर दोन ओळींत चिकटलेली असतात (उदा., प्लॅजिओकिला). पानांना मध्यशीर नसते व खोडात वाहक ऊतके नसतात. पोरेलाच्या सु. १८० जातींपैकी सु. ३४ हिमालयात आढळतात. यांच्या खोडावर पानांच्या तीन रांगा असतात. ब्लॅसिया पुसिलाचा कायक रुंद व खंडित असून त्याला बाजूस पानासारखी उपांगे असतात. ह्या गणातील जातींना वायुरंध्रे किंवा त्वग्रंध्रे नसतात. यांच्यापैकी काहींना अंदुककलशाच्या तळाशी आवरण किंवा परिदलासारखी उपांगे असतात. बीजुक रुजून त्यातून प्रथम येणारा तंतू (शंवालक) फार थोड्या कोशिकांचा असतो. बीजुकधारीचे पद, लांब दंड व बीजुकाशय हे भाग आढळतात. बीजुकाशयावर कोशिकांच्या अनेक थरांचे आवरण असते व ते तडकून त्याची चार शकले होतात बीजुके व क्षेपके आढळतात क्षेपके कधी आ. २. ॲन्थोसिरोस : (अ) संपूर्ण वनस्पती : (१) कायक (गंतुकधारी), (२) मूलकल्प, (३) बीजुकाशयाचे आवरण, (४) बीजुकाशय, (५) कील, (६) शकल (आ) बीजुकधराचा तळभाग (उभा छेद) : (१) पद, (२) बीजुकाशयाचा तळभाग (३)  बीजुकजनक थरातील बीजुकपूर्वज कोशिका, (४) कील (इ) त्वग्रंध्राचे पृष्ठदृश्य : (ई) बीजुकाशयाचा अपक्व भाग (उभा छेद) : (१) अपित्वचा, (२) हरितकणयुक्त कोशिकांचे आवरण, बीजुकजनक कोशिका, (४) क्षेपक, (५) कील (उ) बीजुकाशयाच्या पक्व भागाचा उभा छेद : (१) व (२) ई प्रमाणे, (३) क्षेपक, (४) बीजुकांच्या चौकड्या, (५) कील. कधी बीजुकाशयात तळाशी (उदा., पेलिया ) किंवा शकलांच्या टोकास (उदा., रिकार्डिया ) झुपक्यांनी चिकटून राहतात. या वनस्पतींना ‘पर्णयुक्त यकृतका’ असे म्हणतात.

ॲन्थोसिरोटी : (शृंगका: इं. हॉर्न्‌ड लिव्हरवर्ट्‌स). या वर्गात एकच गण (ॲन्थोसिरोटेलीझ) व एकच कुल (ॲन्थोसिरोटसी) असून त्यात एकूण चार पण प्रमुख फक्त दोन प्रजाती व एकूण सु. ३०० जाती आहेत. या दोन प्रजाती -ॲन्थोसिरोस व नोटोथायलस होत. काहींनी नोटोथायलसचा समावेश नोटोथायलसी या स्वतंत्र कुलात केला आहे. ॲन्थोसिरोसच्या एकूण २०० जातींपैकी सु. २५ जाती आहेत नोटोथायलसच्या ३ जाती आहेत. ह्या वर्गात काही साध्या जमिनीवर वाढणाऱ्या व काही रेताड खडकवासी जातींचा अंतर्भाव होतो. खाली केलेले वर्णन मुख्यतः अँन्थोसिरोसचे असून सामान्यपणे ते इतर प्रजातीतील वनस्पतींची कल्पना देईल. गंतुकधारीचे शरीर (कायक) चकतीसारखे, खंडयुक्त, पर्णहीन व काही थोड्या सेंमी. व्यासाचे असते. अनेक जातींत ते द्विशाखाक्रमी असते. जमिनीशी ते अनेक मूलकल्पांनी घट्ट चिकटलेले असून त्याची संरचना फार साधी असते. ॲन्थोसिरोसचा गंतुकधारी सु. २-३ X ०.५–१ सेंमी., काळपट हिरवा व तेलकट दिसतो. प्रत्येक कोशिकेत बहुधा एकच वाटीसारखा हरितकणू असतो व त्यात एक प्रकणू असतो काही प्रजातींत कोशिकांत अधिक हरितकणूही आढळतात. कायकाच्या खालच्या पृष्ठावर त्वग्रंध्रे असून त्यांच्यामागे श्लेष्मद्रव्य (बुळबुळीत पदार्थ) असलेली पोकळी असते. त्यात काहींत नॉस्टाक हे नीलहरित शैवल असते. जुनाट भाग जीर्ण होऊन दोन शाखा अलग होतात व स्वतंत्रपणे वाढतात ग्रंथिक्षोड [⟶ खोड] व मुकुलिका यांच्याद्वारेही शाकीय निर्मिती होते. कायकाच्या वरच्या पृष्ठाजवळ असलेल्या काही पोकळ्यांत (अपित्वचेखालच्या कोशिकांपासून बनलेली) अनेक रेतुकाशये असतात तसेच काही अंदुककलशही त्यांच्या जवळपास असतात. काही जाती द्विलिंगी व काही एकलिंगी असतात. अंदुक व रेतुक यांच्या मीलनानंतर रंदुकापासून पुढे बनलेल्या खालच्या चार कोशिकांपासून काही शोषक कोशिका (पद) बनतात व वरच्या बाजूच्या चार कोशिकांपासून खाली सतत वाढणाऱ्या कोशिका [⟶ विभज्या] व वरच्या भागात बीजुकाशय वाढते. गर्भाच्या या दिशास्थापनाला (तळभाग व अग्रभाग असे प्रभेदन ठरण्याला) ‘बाह्याग्र’ म्हणतात [⟶ गर्भविज्ञान]. गर्भाच्या प्रारंभिक प्रभेदनात संपूर्ण अंतःकोशापासून वंध्य भाग (कील) बनतो व बाह्यकोशापासून आतील बाजूस बीजुकजनक कोशिका व बाहेरच्या बाजूस बाह्यावरण बनतात. दंड हा भाग बीजुकधराला नसतो. बीजुकाशय विभाजी कोशिकांमुळे जसजसे खालून वर वाढत जाते, तसतसे ते टोकाकडून खाली तडकते त्याच्या दोन शकलांमध्ये कील ताठ राहतो. शकलांचे भाग दोन शिंगांप्रमाणे दिसतात, त्यावरून हॉर्न्‌ड हे इंग्रजी व शृंगका हे संस्कृत नाव पडले आहे. किलाभोवती (वर व बाजूस) बीजुकजनक कोशिकांचा थर असून त्यांपासून गर्द तपकिरी बीजुके व क्षेपके बनतात एकाच वेळी द्विगुणित बीजुकजनक कोशिकेपासून अर्धसूत्रणाने बीजुके व समविभाजनाने क्षेपके बनतात त्यामुळे बीजुके एकगुणित असतात. सर्व बीजुकजनक कोशिका एकाच वेळी पक्व न होता तळातून नव्या कोशिका क्रमाने बनत राहतात बीजुकाशयावर जाड बाह्यावरण, त्वग्रंध्रे व आतील कोशिकांत हरितकणू असतात. त्यामुळे हा बीजुकधर (बीजुकधारी पिढी) गंतुकधारीवर अर्धवट अवलंबून असतो. ही लक्षणे इतर यकृतकांत फारच कमी प्रमाणात आढळतात तसेच हा बीजुकधर इतर यकृतकांपेक्षा अंतर्रचनेबाबत अधिक जटिल असतो व त्यापासून इतरांत प्रगामी सुलभीकरण झाले असावे [⟶ हरिता] असे मानतात. ज्या अर्थी या वर्गातील रंगसूत्रांची संख्या फक्त पाच असते व इतर यकृतकांत ९-१० (क्वचित ४) असते, त्या अर्थी हा वर्ग आपोआपच ह्यांपासून अलग पडतो.

लिव्हरवर्ट्‌स हे इंग्रजी नाव व हिपॅटिसी हे शास्त्रीय नाव पडण्याचे कारण यांपैकी मार्केन्शिया व कोनोसेफॅलियम यांचा उपयोग यकृताच्या विकारांवर होतो अशी पूर्वी समजून होती. तसा उपयोग होत नाही हे खरेच तथापि या वर्गातील कोणत्याही वनस्पतींचा आर्थिक दृष्ट्या उपयोग नाही. नवीन जमिनीवर प्रथम स्थायिक होऊन पुढे हळूहळू इतरांना सोयिस्कर होण्यास (व अनुक्रमणास) सुलभ करणे, जमिनीची धूप थांबविणे, फार लहान प्राण्यांना अन्न व निवारा देणे इ. किरकोळ कार्ये या वनस्पती करतात. वनस्पतीतील लिंगविशिष्ट रंगसूत्रे (एक्स व वाय) प्रथम यकृतकातच पाहिली गेली होती.

पहा : नेचे फ्युनेरिया रिक्सिया शेवाळी हरिता.

संदर्भ: 1. Harder, R. and others Trans. Bell. P. Coombe, D. Strasburger’s Textbook of Botony, London, 1965. 

        2. Mukarji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964. 

        3. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

महाजन, मु. का. नवलकर, भो. सुं. परांडेकर, शं. आ.