वाळुंज : (बच्चा, बोक, बाका, बितसा हिं. बैशी क. निरवंगी इं. इंडियन बिलो लॅ. सॅलिक्स टेट्रास्पर्मा कुल-सॅलिकेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ह्या वनस्पतीच्या प्रजातीतील एकूण सु. ३५ जाती भारतात आढळतात, इतर कित्येक उत्तर गोलार्धात ध्रुव प्रदेशापर्यंत पसरल्या आहेत. वाळुंज ह्या सु. ९-१२ मी. उंचीच्या व १.५ -१.८ मी. घेराच्या मध्यम आकारमानाच्या पानझडी वृक्षाचा प्रसार चीन व मलेशिया येथे आणि भारतात सर्वत्र (बहुतेक नदीकाठी व ओलसर जागी) आहे. ते हिमालयात १,८०० मी. पर्यंत व निलगिरीत २,१०० मी. पर्यंत आढळतात. काही वृक्ष २४ मी. उंच व ३ मी. घेराचे असतात. क्वचित नरवृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावतात. साल खरबरीत, करडी भुरी किंवा काळपट असून तीवर खोल उभ्या भेगा असतात कोवळे प्ररोह (कोंब) लवदार असतात. पाने साधी सोपपर्ण, एकाआड एक, कुंतसम (भाल्यासारखी), निमुळती, वर हिरवी पण खाली पांढरट लवदार असतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये नवी पालवी व त्यानंतर हिवाळ्यात विभक्त लिंगी लहान फुले येतात, सच्छद (तळाशी असलेल्या उपांगासह), केसाळ व लोंबत्या कणिश प्रकारच्या फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] बहुधा स्वतंत्र झाडावर फुले येतात. परिदले नसतात. पुं-पुष्पे सुगंधी, पिवळी व बिनदेठाची असतात स्त्री-पुष्पे हिरवट व किंजलहीन असून किंजल्क दोनदा विभागलेला असतो केसरदले ५-१० सुटी व भिन्न लांबीची असतात [⟶ फूल]. शुष्कफळे (बोंडे) लहान व लांबट असून ती उन्हाळ्यात येतात. बिया ४-६ व त्यांच्याभोवती रेशमी केसाचा झुबका असतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सॅलिकेसी कुलात (वाळुंज कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. याची नवीन लागवड छाट कलमे लावून करतात ते जलद वाढते. दर वर्षी त्याचा घेर सु. २.८ सेंमी. वाढतो.

वाळुंजाचे लाकूड तांबूस, सुबक व नरम किंवा मध्यम कठीण असून घरबांधणी, खांब व फळ्या, सजावटी सामान, नांगर, कपाटे, आगपेट्या इत्यादींकरिता वापरतात त्यापासून बंदुकीच्या दारूचा कोळसा तयार करतात. बारीक फांद्यांच्या परड्या करतात. सालीत ६.५% टॅनीन असते आणि ती कातडी कमाविण्यास वापरतात. सुक्या पानांचे चूर्ण साखर घालून संधिवात, सूज मूळव्याध, गुप्तरोग, मुतखडा, अपस्मार इत्यादींवर देतात. पाला जनावरांना चारतात.

वीपिंग विलो : (सॅ. बॅबिलोनिका). ही लोंबत्या फांद्या व पानांची मूळची चिनी जाती उत्तर भारतात कालव्याकाठी जमिनीच्या संरक्षणासाठी व बागेत शोभेसाठी लावतात.

व्हाइट विलो : (सॅ. आल्बा). ही जाती वायव्य हिमालयात व हिमाचल प्रदेशात लागवडीत असून तिच्या लाकडापासून क्रिकेटच्या बॅटी आणि फांद्यापासून परड्या करतात. लाकडाचे इतर अनेक उपयोग आहेत. सालीत ५-७% टॅनीन असून ते कातडी कमाविण्यास फार उपयुक्त असते तिचा काढा औषधी असून तो संधिवात व अतिसारावर देतात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX,  New Delhi. 1972.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.