बॉम्बॅकेसी : (शाल्मली कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव जी. र्बेथॅम व जे. डी. हूकर यांनी ⇨माल्व्हेसीत (भेंडी कुलात) केला असून हल्ली या दोन्हींचा समावेश माल्व्हेलीझमध्ये (भेंडी गणात) केला जातो. ए.एंग्लर यांच्या वर्गीकरणात माल्व्हेलीझमध्ये चार कुले (माल्व्हेसी, स्टर्क्युलिएसी, टिलिएसी आणि बॉम्बॅकेसी घातली होती जे. हचिन्सन यांनी माल्व्हेसीखेरीज इतर कुले टिलिएलीझमध्ये (परुषक गणात) अंतर्भूत केली आहेत. ⇨रॅनेलिझपासून (मोरवेल गणापासून) बॉम्बॅकेसी व त्यातून ⇨टिलिएसी (परुषक कुल), एलिओकार्पेसी (रुद्राक्ष कुल), माल्व्हेसी व ⇨स्टर्क्युलिएसी (मुचकुंद कुल) ही अवतरली असावीत, असे मानतात.

शाल्मली कुलात सफेद सावर [⟶ शाल्मली], लाल सावर, काटे सावर [⟶ सावर, लाल], ⇨दुरियन व ⇨ गोरखचिंच इ. सामान्य वनस्पतींचा समावेश करतात. अद्याप काही पाठ्यपुस्तकांत यांचा समावेश माल्व्हेसीत केलेला आढळतो. बॉम्बॅकेसी कुलात ए. बी. रेंडेल यांच्या मते बावीस वंश आणि एकशेचाळीस जाती (जे. सी. विलिस यांच्या मते वीस वंश आणि एकशेऐंशी जाती) समाविष्ट आहेत व त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात आणि विशेषतः अमेरिकेत जास्त झाला आहे. माल्व्हेसीपासून पुढील लक्षणांत या कुलातील वनस्पती भिन्नत्व दर्शवितात. परागकोशात एक, दोन किंवा अधिक कप्पे असतात. परागकण गुळगुळीत व केसरमंडलात काही वंध्य केसर असतात. किंजपुट दोन ते पाच किंजदलांचा व अनेक कप्प्यांचा असून बीजके सरळ, अधोमुख व प्रत्येक कप्प्यात दोन ते अनेक [⟶ फूल] बिया गुळगुळीत असून फलावरणापासून बनलेल्या भेंडासारख्या नरम ऊतकाने (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहाने) किंवा कापसाने वेढलेल्या असतात बीजावर कधी अध्यावरण (दोन्हीवर तिसरे अंशतः किंवा पूर्णतः वेढणारे आच्छादन) पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) पातळ किंवा तो नसतो.

या कुलात बहुतेक सर्व वृक्ष उंच शाखायुक्त असून साल जाड, पाने साधी, अखंड किंवा हस्ताकृती विभागलेली, एकाआड एक व उपपर्णयुक्त केस असल्यास ते तारकाकृती किंवा लहान देठाचे खवले फुले मोठी, आकर्षक, नियमित, द्विलिंगी, अवकिंज, सच्छद, क्वचित अपिसंवर्तयुक्त (गोरखचिंच), पंचभागी संदले पाच व जुळलेली पाकळ्या कधी कधी नसतात केसरदले पाच ते असंख्य, किंजपुट ऊर्ध्वस्व [⟶ फूल]. फळ बोंड (उदा. सावर) वा मृदुफळासारखे (उदा., गोरखचिंच) असते [⟶ फळ]. वर उल्लेख केलेल्या सामान्य वनस्पती उपयुक्त आहेत. गोरखचिंच औषधी व दीर्घायुषी [⟶ आयुःकाल, प्राण्यांचा व वनस्पतींचा] आहे. ‘कपोक’ (सावर) मऊ कापसामुळे व्यापारी महत्त्वाचे आहे. ⇨बाल्सापासून अत्यंत हलके लाकूड मिळते.

 संदर्भ :

1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964. 

2. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964, 

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Cambridge, 1963.

 परांडेकर, शं. आ.