ऑर्किडेसी : (आमर-कुल). फुलझाडांपैकी ऑर्किडेलीझ या गणातील एक कुल. बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) अपिवनस्पती, जमिनीवर नेहमी आढळणाऱ्या, क्वचित शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) अशा षधी  ह्या कुलात समाविष्ट आहेत (४५० वंश व सु. १५,००० जाती).

ऑर्किडेसी (आमर-कुल) : रास्ना (१) संपूर्ण वनस्पती, (२) फूल, (३) ओठ व परिदले काढलेले फूल, (४) फळ (बोंड), सालंमिश्री : (५) स्तंभाचा भाग. (अ) परिदले, (आ) ओठ, (इ) स्तंभ, (उ) किंजपुट, (ए) शुंडिका, (ऐ) किंजल्क, (ओ) परागकोश, (औ) परागपुंज.

 उष्णकटिबंधात यांचे प्रमाण मोठे असून बहुतेक अपिवनस्पती आहेत. समशीतोष्ण कटिबंधात त्यामानाने प्रमाण कमी असून तेथे त्या भूमीवर वाढणाऱ्या असतात. अपविनस्पती प्रकारातील जातींची हवाई मुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. तर जमिनीवरच्या जातींत मूलक्षोड किंवा ग्रंथिक्षोड [ → खोड] आढळतात. काही अपिवनस्पतींत आभासी कंद असतात. पाने साधी, जाडसर, लांबीत अधिक, मध्ये पन्हळी व बहुधा दोन रांगांत असतात क्वचित त्यांचा ऱ्हास होऊन ती खवल्यांसारखी होतात.

फुलोरे, पानांच्या झुबक्यातून वर वाढणाऱ्या स्वतंत्र अक्षावर मंजरी, कणिश असे असतात [→ पुष्पबंध]. फुले द्विलिंगी, बहुधा अनियमित, अपिकिंज, शुभ्र अथवा निरनिराळ्या रंगांची, सुंदर व सुवासिक असतात. सहा परिदलांपैकी बाहेरील तीन संदलांप्रमाणे असतात आतील तीन पाकळ्यांप्रमाणे असून त्यांपैकी एक मोठी व पसरट (पहा : आकृती) पाकळी कीटकास उतरण्यास तळाप्रमाणे (ओठ) उपयुक्त असते व तिला खाली मधुरसाकरिता शुंडिका (सोंड) असते. केसरमंडलातील तीन केसरदलांपैकी फक्त एक, क्वचित दोन कार्यक्षम असून उरलेले वंध्य असतात व त्यांचे स्वरूप पाकळ्यांसारखे असते. किंजमंडलात तीन किंजदले जुळून वाढल्याने एका कप्प्याचा किंजपुट बनतो. तो अध:स्थ असून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत तो स्वत:भोवती  १८०कोनात फिरतो त्यामुळे फुलातील अक्षाजवळची पाकळी (ओठ) पुढे अक्षापासून दूरच्या बाजूस राहते. किंजल्काच्या तीन भागांपैकी एक वंध्य व दोन कार्यक्षम असतात. किंजपुटाच्या वरच्या बाजूस कार्यक्षम किंजल्क व केसरदले यांच्या संयोगाने एक लहान स्तंभ बनतो, त्यास ‘किंजकेसराक्ष’  म्हणतात [→ फूल].  केसरदलावरच्या परागकोशातील परागकण फारच क्वचित सुटे राहतात. त्या परागांचा दर कोशखंडास एक याप्रमाणे दोन परागपुंज बनतात. दोन परागपुंजांची एक जोडी [मांदाराप्रमाणे, → रुई] अशी एक अथवा एकूण दोन जोड्या असतात. येथे  परागण  कीटकांकडून होते. फुलांच्या अत्यंत आकर्षकपणामुळे (रंग व सुवास यांमुळे) फुलावर आलेला कीटक शुंडिकेतील मधुरस शोषीत असताना बहुधा त्याच्या डोक्यास परागपुंजांचा दांडा चिकटून तो तेथून अलग निघतो व तो कीटक दुसऱ्या तशा फुलावर गेला असता तेथील चिकट किंजल्काशी परागपुंजांचा संपर्क साधतो. यानंतर बनलेले फळ (बोंड) वाळल्यावर तडकते व असंख्य लहान बीजे वाऱ्याने पसरविली जातात.

फुलातील वर वर्णन केलेली सामान्य व त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना, परागणाच्या या खात्रीच्या व काटकसर साधणाऱ्या पद्धतीशी सुसंगत असून त्यापासून पुढे फार मोठा बीजप्रसार व जातींचा प्रसार साधण्याकरिताच आहे, हे निर्विवाद आहे. आज आढळणारी जातींची फार मोठी संख्या व प्रसार लक्षात घेता, त्याचे कारण या कुलातील वनस्पतींचे भोवतालच्या परिस्थितीशी होणारे अनुयोजन हे असून त्यामध्ये यांच्या फुलांच्या संरचनेचा व कार्यक्षमतेचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे ऑर्किड-फुले अत्यंत प्रगत फुलांपैकी असून ऑर्किडेसीकुल हे फार प्रगत कुलांपैकी एक आहे, हे पटण्यास हरकत नाही. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार मोठे महत्त्व आहे. रास्‍ना, वंदाक, डेंड्रोबियम, हॅबनेरिया, एराइड्स  ह्या वंशांतील कित्येक जाती सामान्य आहेत. व्हॅनिला नावाच्या जातीपासून (व्हॅनिला प्लॅनिफोलिया) मिळणारा व्हॅनिला नावाचा सुगंधी अर्क व  सालंमिश्रीपासून मिळणारी सलेप नावाची पौष्टिक वस्तू प्रसिद्ध आहेत (चित्रपट २९, ३०).

पहा : अमरकंद रास्‍ना शवोपजीवन.

वर्तक, वा.


लेलिओकटलेया व्हॅलेन्शिया. सायप्रिपेडियम मौदी (लेडीज स्लिपर). पॅफिओपेडिलम ग्लॉकोफायलम (व्हीनस स्लिपर). बांडा सेरूलिया (प्राइड ऑफ द टेबल मौंटन). ओडोंटोनिया. डिसा युनिफ्लोरा. ब्रासोकटलेय. ऑफ्रिस इन्सेक्टिफेरा.


डक ऑर्किड रेड स्पायडर ऑर्किड बिअर्डेड ऑर्किड  ब्ल्यू फेअरीज ऑर्किड  व्हॅक्सलिप ऑर्किड (ग्लासोडिया मेजोरा) सेंटेड सन ऑर्किड (थेलिमिना अरिस्टॅटा) लेपर्ड ऑर्किड  स्ट्रिप्ड ग्रीनहुड ऑर्किड (टेरोस्टायलस रोबस्टा)