एबेनेसी : (टेंबुर्णी कुल). फुलझाडांपैकी (वर्ग-द्विदलिकित) एबेनेलीझ गणातील एक कुल. ⇨सॅपोटेसी  कुलाचा याच गणात अंतर्भाव असून जे. एन्. मित्र यांच्या मते एरिकेलीझ या गणाप्रमाणे हा गण ⇨जिरॅनिएलीझ  किंवा ⇨प्रिम्युलेलीझ  यांपैकी एका गणापासून अवतरला असावा. ह्या कुलात एकूण ५ वंश व सु. ३२० जाती समाविष्ट केल्या असून त्या सर्व वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे) आहेत व त्यांचा प्रसार मुख्यतः भारत, मलाया, आफ्रिका इ. प्रदेशांत आढळतो. पाने साधी, बहुधा एकाआड एक व चिवट फुले एकलिंगी, क्वचित द्विलिंगी, बहुधा स्वतंत्र झाडांवर, अर-समात्र, अवकिंज असून त्यातील प्रत्येक मंडलात तीन ते सात भाग असतात. संदले व प्रदले युक्त (जुळलेली), केसरदले पाकळ्यांस चिकटलेली, कधी अनेक किंजदले जुळलेली किंजले दोन ते आठ, सुटी किंवा अंशतः जुळलेली किंजल्क तितकेच व सुटे (मुक्त) किंवा तळाशी जुळलेले ऊर्ध्वस्थ किंजपुटात अनेक कप्पे व बीजके [→ फूल] बीजकास दोन आवरणे मृदुफळे मांसल किंवा कठीण, एक किंवा अनेकबीजी, बहुधा न तडकणारी बिया सपुष्क (वाढणाऱ्या बियांच्या गर्भाला अन्न पुरविणाऱ्या पेशी समूहांनी युक्त). यातील कित्येक वृक्षांचे लाकूड काळपट, फार कठीण, बळकट व जड असून व्यापारात ‘एबनी’ या नावाने प्रसिद्ध आहे विशेषतः कपाटासारख्या फर्निचरकरिता ते उपयुक्त असते. या कुलातील अबनुस, तेंडू, तिमरू, टेंबुर्णी, रक्तरोहिडा इ. वनस्पती उपयुक्त आहेत (या वनस्पतींसंबंधीच्या स्वतंत्र नोंदीही पहाव्यात).

परांडेकर, शं. आ.