विंचवी : (विंचू हिं. बिचू गु. विच्चिडा इं.टायगर्स क्लॉ, डेव्हिल्स क्लॉ लॅ. मार्टिनिया डायन्ड्रा , मा. ॲन्युआ कुल-मार्टिनिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. ०.९-१.२ मी. उंच, सरळ वाढणारी, फांद्यायुक्त, चिकट, लवदार, वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी) ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पती मूळची मेक्सिकोतील असून रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागी किंवा कचऱ्याच्या ढिगांवर सर्वत्र आढळते. पाने साधी, मोठी (१५-२५ सेंमी.), समोरासमोर, रुंदट अंडाकृती ते त्रिकोणी, काहीशी खंडित व दातेरी असतात. फुले मोठी (६.३ सेंमी), दुर्गंधीयुक्त, सुंदर, गुलाबी, आतल्या बाजूस जांभळी व त्यांवर पिवळे ठिपके असलेली, ऑगस्ट ते डिसेंबरात पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या सांध्यांतून मंजरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. पुष्पमुकुट काहीसा लांबट व हस्तपाकृती (हातमोज्यासारखा) असून फळ कठीण बोंडासारखे, तपकिरी व त्यावर दोन आकडे असतात. फळ सुकल्यावर आतील कठीण आवरण त्या आकड्यांमुळे काळ्या भुंगेऱ्यासारखे दिसते व विंचवाच्या नांगीसारखे आकडे त्याला प्राण्यांच्या शरीरास अडकून त्याचा प्रसार होण्यास मदत होते, यामुळे वनस्पतीस विंचवी हे नाव पडले आहे. बिया आयताकार असतात. घसा खवखवत असल्यास पानाच्या रसाने गुळण्या करतात. फळे दाहावर उपयुक्त असतात. बियांपासून काढलेले फिकट पिवळे तेल चमत्कारिक वासाचे व अर्धवाट सुकणारे असते. झाडे बागेत शोभेकरिता लावतात. विंचवाच्या विषावर ही वनस्पती उपयुक्त नाही, असे प्रयोगांती आढळले आहे.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI. New Delhi, 1962.

जमदाडे, ज.वि.