वर्मवुड : (इं. ॲबसिंथ). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील काही लहान ओषधीय [⟶ ओषधि], सुगंधी व कडू वनस्पतींच्या प्रजातीचे (आर्टेमिसियाचे) इंग्रजी नाव. या प्रजातीत सु. २८० जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः उत्तर गोलार्धात व विशेषेकरून रुक्ष प्रदेशात आहे. भारतामध्ये हिमालयात हिच्या सु. ३४ जाती आढळतात. यांची पाने साधी, एकाआड एक व बहुधा कडेने काहीशी विभागलेली असतात फुलोरे [स्तबक ⟶ पुष्पबंध] लहान व अनेक असून फुले पांढरट किंवा पिवळी आणि ती सर्व फुलोऱ्याच्या बिंबावर (मधल्या अक्षाच्या आसनावर) असतात [⟶ कंपॉझिटी]. त्यांभोवती अनेक छदांची (खवल्यासारख्या उपांगांची) मंडले असतात [⟶ फूल]. या प्रजातीतील कित्येक झाडे शोभिवंत पानांकरिता आणि सुगंधी तेले व औषधी द्रव्यांकरिता (विशेषतः सँटोनीनकरिता) लावतात.

वर्मवुड ॲबसिंथ : फुलोरा व पाने.आर्टेमिसिया ॲबासिंथियम (अरबी व इराणी नाव अफसंतीन) ह्या वनस्पतीत ॲबसिंथिन व ३ टक्के बाष्पनशील(उडून जाणारे) तेल असते. ही वनस्पती सु. १ मी. उंच व अनेक वर्षे जगणारी असून मूळची यूरोपातील आहे. ही भारतात काश्मीरमध्ये १,५२४- २,१६५ मी. उंचीवर आढळते. उत्तर आशिया, अफगाणिस्तान व पश्चिमेस अटलांटिकपर्यंत हिचा प्रसार आहे पूर्व कॅनडात हिचे देशीयभवन झाले आहे. अमेरिकेत हिची लागवड करतात. हिला हिरवट पिवळे फुलोरे येतात. या वनस्पतीपासून काढलेले सुगंधी बाष्पनशील तेल पूर्वी ‘ॲबसिंथ’ या फ्रेंच मद्यात घालीत ते अधिक प्रमाणात फार अपायकारक असल्याने ते आता वापरीत नाहीत. व्यापारी वर्मवुड तेल हे सुगंधी, उत्तेजक, दीपक (भूक वाढविणारे) व कृमिनाशक असल्याने त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. वर्मवुडची सुकी पाने व फुलोरे औषधी असून त्यांचा अल्कोहॉलमधील अर्क पौष्टिक व पाचक असतो. रोमन व ग्रीक काळात आर्टेमिसियाचा उपयोग कृमिनाशक व दीपक म्हणून करीत इराणी व अरबी वैद्यही त्याचा उपयोग करीत आजही युनानी वैद्य करतात. रोमन वर्मवुड (आ. पॉटिका) चा उपयोग वेरमूथ या मद्यात स्वादाकरिता करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ‘सेज ब्रश’ ह्या पश्चिम भागातील वनस्पती आर्टेमिसिया प्रजातीतील जाती आहेत किरमाणी ओव्यास ‘ वर्मसीड’ म्हणतात, ती वनस्पती यापैकीच आहे.

 पहा : ओवा, किरमाणी गाठोणा दवणा.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, Delhi, 1948.

जमदाडे, ज. वि. परांडेकर शं. आ.