निशोत्तर : (तेड, शेतवड, फूटकरी हिं. निशोत, पिटोहरी गु. नहोतर, नाशोतर क. नागदंती, बिलि–अलुतिगडे सं. त्रिपुट, त्रिवृत, रेचनी इं. इंडियन ऱ्हूबार्ब, टर्बिथ रूट, इंडियन जलाप लॅ. ऑपरक्युलिना टर्पेथम कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ही मोठी वेल साधारणपणे उष्ण कटिबंधात आणि भारतात सर्वत्र ९०० मी. उंचीपर्यंत सापडते. ती चिकाळ, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) असून तिच्या अनेक, शाखायुक्त, लांब मुळ्या मांसल असतात. खोड लांब, लवदार, कोनीय अथवा पंखधारी, वेढणारे, घट्ट आणि पिंगट असते. पाने विविध आकारांची, ५ −१० सेंमी. लांब, साधी, किंचित लांबट, कधी खंडित ‌‌‌व तळाशी हृदयाकृती असतात. फुले लांब, पंखधारी देठाची सच्छद असून लहान वल्लरीवर ‌‌‌व तळाशी हृदयाकृती असतात. फुले लांब, पंखधारी देठाची सच्छद असून लहान वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] ऑक्टोबर ते जानेवारीत येतात.संवर्त प्रथम लहान पण पुढे त्यातील दोन दले वाढून फळास वेष्टन करतात. ‌‌‌पुष्पमुकुट मोठा, नलिकाकृती, नरसाळ्यासारखा व पांढरा असतो [⟶ फूल]. बोंड (फळ) गोलसर व त्यात चार काळ्या आणि गुळगुळीत बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलात (हरिणपदी कुलात) निशोत्तर : फुलासह फांदी.

वर्णिल्याप्रमाणे असतात. ‌‌‌या वेलीची क्वचित बागेत शोभेकरिता लागवड करतात. मूळ औषधी आहे. त्यात टर्पेथीन नावाचे ग्लुकोसाइड व एक राळ (इंडियन जलाप = टर्पेथ) असते. औषधी द्रव्य कटू व कफोत्सारक (कफ पाडून टाकणारे) आणि रेचक आहे. काळे व पांढरे टर्पेथ असे दोन प्रकार आहेत. पांढरे सौम्य विरेचक असून ते बेशुद्धावस्थेत, गुंगी व ‌‌‌दाह (आग) यांवर उपयुक्त आहे. काळे तीव्र रेचक असून त्यामुळे ओकाऱ्या, घेरी व बेशुद्धी येते म्हणून ते वापरीत नाहीत. बाजारात मुळाचे व खोडाचे तुकडे (१·५–१५ सेंमी. लांबीचे व १–५ सेंमी. व्यासाचे) सफेद निशोत आणि कृष्ण निशोत या नावांनी मिळतात. ‌‌‌त्यांच्यातील मध्यकाष्ठ (मधला भाग) काढून टाकलेले असून ते दोरासारखे दिसते त्यांचा वास व चवही न आवडणारी असतात. खरा जलाप (एक्झोगोनियम पर्गा) आणि ऱ्हूबार्ब (ऱ्हीयम इमोदी) यांच्याप्रमाणेच ते परिणामकारक असतात. ‌‌‌औषधाकरिता मुळाचा तुकडा सुंठ आणि सैंधवाबरोबर थंड पाण्यात उगाळून देतात. जलोदर, आमवात, वातरक्त इत्यादींत निशोत्तर गुणकारी आहे. कोवळे खोड व पाने फिलिपीन्समध्ये भाजीकरिता वापरतात.

टिळक, शा. त्रिं. परांडेकर, शं. आ.