दत्रंग : (धत्रंग हीं. चामरोर क. अडक, बागरी लॅ. एहरेशिया लेविस कुल–बोरॅजिनेसी). सु. १२ मी. उंच व एक मी. घेर असलेला हा लहान पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र व द. अंदमानात टेकड्यांवर ९३० मी. उंचीपर्यंत आढळतो. साल फिकट करडी किंवा पाढुरकी असते पाने साधी, मोठी, मध्यम चिवट, एकांतरित (एकाआड एक) आणि अंडाकृती अथवा विविध आकृतींची असून थंडीत ती गळून पडतात. फुले लहान, पांढरी व बिनदेठाची असून पानांच्या बगलेत किंवा बाजूच्या वल्लरीवर जानेवारी–मार्च (किंवा एप्रिल) मध्ये येतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ प्रथम लाल काळे, मिरीएवढे, गोलसर व सुरकुतलेले असते. लाकूड पिवळट किंवा करडे, चमकदार, मध्यम कठीण, सुबक व टिकाऊ असून कुंचल्यांच्या पाठी, आगपेट्या, आगकाड्या, बुटाचे साचे (ठोकळे), घरबांधणी, शेतकीची अवजारे इत्यादींस उपयुक्त असते. फळे व झाडांची अंतर्साल टंचाईच्या काळात खातात पाने गुरांना खाऊ घालतात.

दत्रंगी : (कुप्ता). दत्रंगाचा हा एक प्रकार झुडपासारखा किंवा लहान वृक्ष (अस्पेरा ) असून दख्खन, उत्तर प्रदेश आणि पंजाबपर्यंत आढळतो तसेच सिंध, बलुचिस्थान, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान येथेही आढळतो. मुळांचा काढा सांसर्गिक गुप्तरोगांवर देतात इतर उपयोग वरच्याप्रमाणे दोन्ही वनस्पतींची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बोरॅजिनेसीमध्ये (भोकर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

दत्रंग : (१) फांदी, (२) फूल, (३) फळ.

अजान वृक्ष : क्षीक्षेत्र आळंदी येथे श्रीज्ञानेश्वरांच्या मंदिराच्या आवारात असलेला व पवित्र मानलेला ‘अजान वृक्ष’ हा वर वर्णन केलेला दत्रंग (धत्रंग) वृक्षच असावा. पुण्याच्या आसपास, कोकण व उत्तर कारवार येथेही तो आढळतो आणि तो दत्रंगाचा एक प्रकार (कॅनरेन्सिस ) असावा, असे कोणी मानतात परंतु या वृक्षाच्या पानांच्या आकारातील विविधतेमुळे याला स्वतंत्र प्रकार मानणे इष्ट नव्हे, असे थीओडोर कुक यांचे मत आहे. सामान्यपणे ⇨ अंजन–२  किंवा ⇨ अर्जुन सादडा  या नावाने ओळखले जाणारे वृक्ष म्हणजे ‘अजान’ नव्हे. श्रीज्ञानेश्वरांच्या हातातील काठी याच वृक्षाची असून समाधीच्या वेळी ती त्यांनी बाजूस ठेवली व त्यापासून जवळच अजान वृक्ष पुढे वाढला, अशी आख्यायिका आहे. या वनस्पतीची पाने व फळे मृत्यूला जिंकण्यास समर्थ करतात, असे श्रीएकनाथांनी वर्णन केले आहे. तसेच या पवित्र वृक्षाखाली बसून वाचन व चिंतन केल्यास दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असे समजतात. ज्ञानेश्वरी  या ग्रंथात ‘अज्ञान वृक्ष’ असा उल्लेखही सापडतो. ‘अजान वृक्ष’ याचा अजान वृक्ष असा अपभ्रंश असून सामान्य जनतेत वृक्षाप्रमाणे पसरलेल्या अज्ञानाचे रूपक त्या संज्ञेने दर्शविले असावे, असेही मत व्यक्त केले गेले आहे. तेच वर दिलेल्या ज्ञानसंपादनाच्या कल्पनेशी जुळते.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

Close Menu
Skip to content