पळस: (परस हिं. ढाक, पलस गु. खाकरो क. मुत्तुल सं. पलाश, त्रिपत्रक, याज्ञिक, किंशुक, परुष इं. पॅरट ट्री, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, बेंगॉल कीनो ट्री, बॅस्टर्ड टीक लॅ. ब्युटिया मोनोस्पर्मा, ब्यु. फ्रॉन्डोसा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [® वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १२–१५ मी. उंच वाढणाऱ्या ह्या मध्यम आकारमानाच्या पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात (१,२४० मी. उंचीपर्यंत) फार रुक्ष प्रदेशांखेरीज सर्वत्र आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी जंगलांत सामान्यपणे दिसतो शिवाय ब्रह्मदेश, श्रीलंका (१,२०० मी. उंचीपर्यंत) व पाकिस्तान येथेही आढळतो. उघड्या गवताळ रानात त्याचे शुद्ध समूह आढळतात, काही ठिकाणी पळसाबरोबर शालवृक्षही [⟶ साल–२] असून त्यांचे मिश्रवन आढळते. पळसाच्या वंशात (ब्युटिया) एकूण तीस जाती असून त्यांपैकी भारतात फक्त तीनच आढळतात त्यांपैकी एक वेल आहे. त्यांचा पुढे क्रमाने विचार केला आहे.

वृक्षवर्णन : पळसाच्या खोडाचा घेर सु. १·५–१·८ मी. असतो, त्यावरची साल राखी, निळसर, करडी वा फिकट तपकिरी व धागेदार असून तिच्या लहानमोठ्या ढलप्या सोलून जातात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत ‘ब्युटिया गम’ किंवा ‘बेंगॉल कीनो’ म्हणतात. कोवळे भाग लवदार असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, उपपर्णयुक्त, मोठी, त्रिदली [ त्यावरून ‘त्रिपत्रक’ हे संस्कृत नाव व मराठीतील ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण पडली आहे वास्तविक शास्त्रीय दृष्ट्या दले तीन (त्रिदली) हे बरोबर ठरते] आणि लांब देठाची असून दले मोठी, चिवट, कठीण, वरून काहीशी चकचकीत आणि खालून पांढरट लवदार असतात बाजूची दले तिरकस अंडाकृती, फार लहान देठाची व टोकाचे दल लांब देठाचे, गोलसर व टोकाशी गोलसर किंवा विशालकोनी असते. थंडीत पाने गळतात आणि नवी पालवी एप्रिलमध्ये किंवा एप्रिल अखेर येते. पळसाची फुले मोठी, नारिंगी लाल व बिनवासाची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत सु. १५ सेंमी. लांब मंजरीवर फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. पर्णहीन फांद्यांवर अनेक भडकरंगी फुलोऱ्यामुळे ‘वनाग्नि किंवा वन ज्योत’ या अर्थाचे वर दिलेले  ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ हे इंग्रजी नाव सार्थ वाटते. या भडक रंगाने आकर्षित झालेले अनेक पक्षी फुलातील मध लुटण्याकरिता झाडावर गर्दी करतात, त्यामुळे ð परागणास (परागकण दुसऱ्या फुलात नेण्यास) साहाय्य होते. कळ्या अर्धचंद्राकृती असतात. फुलाची संरचना पतंगरूप [पतंगासारखी ⟶ अगस्ता गोकर्ण–२ लेग्युमिनोजी] असते केसरदले ९+१ शिंबा (शेंगा) लोंबत्या, ६–८X३–५ सेंमी., लवदार व पिंगट असून जून-जुलैमध्ये येतात त्या न तडकणाऱ्या, सपाट व सपक्ष असतात. बी एकच, लंबगोल, चपटे (२·५ X १·९ सेंमी.), तपकिरी रंगाचे व शिंबेच्या खालच्या टोकास असते क्वचित दोन बिया आढळतात एका बीजावरून लॅटिन जातिवाचक संज्ञा (मोनोस्पर्मा) दिली गेली आहे. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात (पॅपिलिऑनेटी उपकुलात) दिल्याप्रमाणे असतात.

सामान्य उपयोग : पळसाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढतात व त्यांचा उपयोग वन्य जमाती दोराकरिता करतात, कागदनिर्मितीस व गलबतांच्या भेगा बुजविण्यास या धाग्यांचा उपयोग करतात. सुक्या फुलांपासून पिवळा रंग मिळतो, फुले उकळून किंवा थंड पाण्यात भिजत ठेवून रंग काढता येतो. तो साड्या रंगविण्यास वापरतात. तुरटी, चुना किंवा क्षार (अल्कली) मिसळून तो पक्का नारिंगी करतात. गुलाल व अबीर बनविण्यास तो उपयुक्त आहे. कातडी कमाविण्यास व रंगाकरिता वर उल्लेख केलेला डिंक (बेंगॉल कीनो) वापरतात तो गर्द लाल असून स्वच्छ करून ठेवल्यावर पुढे ठिसूळ व अपारदर्शक होतो. त्यामध्ये भरपूर टॅनीन आणि श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य असते. शुष्क प्रकारच्या ऊर्ध्वपातनाने (बाष्परूपाने मिळवून मग थंड करण्याच्या क्रियेने) त्यापासून ‘पायरोकॅटेचीन’ मिळते ते जुन्या (हट्टी) अतिसारावर पोटात देतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची जुनी पद्धत आहे. पाला गुरांना व हत्तींना खाऊ घालतात. बंगालमध्ये पळसाची पाने बिड्या बांधण्यास वापरतात. पळसाचे लाकूड करडे किंवा भुरे, नरम व हलके असून पाण्यात चांगले टिकते पण जमिनीवर फार टिकत नाही तथापि खोकी, खेळणी, फळ्या, बंदुकीच्या दारूचा कोळसा इत्यादींसाठी वापरतात. त्याचे ओंडके लांब नसतात. कारण झाडाचे खोड वेडेवाकडे असते. शोभेसाठी ही झाडे बागेत लावतात. वनसंवर्धनाच्या दृष्टीने (भूमिउद्धार) त्याला महत्त्व आहे. इतर कित्येक वृक्ष वाढणार नाहीत अशा खाऱ्या व निचरा नसलेल्या जमिनीत पळस वाढतो. बोर व पळस एकत्र वाढतात तेथे जमिनीत पाणी आढळेल, असे बृहत्संहितेत सांगितले आहे.

औषधी गुण : पळसाची पाने स्तंभक (आकुंचन करविणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), शक्तिवर्धक, वाजीकर (कामोत्तेजक) असून ती अतिसार, कफक्षय, उदरवायू, शूळ (वेदना), रक्ती मूळव्याध व कृमी यांवर देतात. त्यांचा सौम्य काढा पडसे व खोकला यावर गुणकारी असतो. पानांचे गरम पोटीस (उपनाह) गळवे, मुरूम, गुल्म, सूज इत्यादींवर बांधतात. साल खडीसाखरेबरोबर चघळली असता तहान भागते. फुलेही पानासारखीच औषधी (स्तंभक, मूत्रल, वाजीकर इ. ) असतात. पळसाच्या बिया कृमिनाशक (जंत व पट्टकृमींचा नाश करणाऱ्या) असून त्यांचा लेप नायट्यावर लावतात व जखमेतील किडे मारण्यास व दाहावर (आगीवर) गुणकारी असतात. बियांचे तेल (पिवळे, रुचिहीन व १८%), चूर्ण व अल्कोहॉलमधील अर्क यांचा अंकुशकृमीवर परिणाम होत नाही, असे आढळले आहे. बिया लिंबाच्या रसात कुटून लावल्यास मानेवरची खाज (नायट्यामुळे किंवा संपर्काने झालेल्या गजकर्णासारख्या चर्मरोगामुळे आलेली) कमी होते. डिंक जहाल व स्तंभक असल्याने अतिसार व आमांश झालेल्या लहान मुलांना व नाजूक स्त्रियांना उपयुक्त असून आमाशयातून व मूत्राशयातून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही देतात. नायटे, खरचटणे इत्यादींवर तो पाण्यात विरघळून लावतात. जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांत पळसाचे अनेक उपयोग सांगितले आहेत.

विशिष्ट उपयोग व लागवड : लाखेचे किडे वाढविण्यास पळसाचे झाड फाड चांगले असते म्हणून त्या वृक्षांची लागवडही करतात. पळसाचे मळे सुक्या (रुक्ष) जागी पाणभरत्या जागी पिकविता येतात. पावसापूर्वी शिंबा गोळा करून त्या चऱ्यांमध्ये ३–३·५ मी. अंतर ठेवून पेरतात. शेंगेतील ताजे बीज त्वरित रुजते लाखेकरिता लावलेली झाडे सु. ६ मी. अंतरावर लावतात. मुळापासून निघणाऱ्या फुटव्यामुळे शाकीय उत्पादन (अभिवृद्धी) होते. भारतात लाखेचे किडे पोसण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडांमध्ये ⇨ कोशिंबाच्या खालोखाल पळसाचा क्रमांक लागतो, पळसावर वाढणाऱ्या किड्यांपासून मिळणाऱ्या लाखेची प्रत कमी असते, तथापि लाखेचे प्रमाण अधिक असते. याकरिता मेमध्ये वृक्षांची बुंध्याच्या वर छाटणी करून नंतर नवीन मांसल प्ररोह (कोंब) येऊ देतात त्यांवर किडे पोसले गेल्यावर सर्वच नवीन फूट एकदम कापून घेता येते. बहुधा ऑक्टोबर-नोव्हेंबरात लाखेचा पिलावा (अळ्या) झाडावर सोडतात. एप्रिल-मेमध्ये दोन तृतीयांश प्ररोह नैसर्गिक रीत्या जुलैमध्ये कीटोत्पादन होण्यास ठेवतात त्यानंतर पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपूर्ण नवीन वाढ काढतात. पळसावरचा किड्यांचा पिलावा बोरीवर सोडता येतो पण तो कोशिंबावर सोडत नाहीत [⟶ लाख–१].


नावे व धार्मिक महत्त्व : पळसाच्या फुलांचे पोपटाशी साम्य दिसल्यावरून त्या अर्थाचे इंग्रजी नाव (पॅरट ट्री) पडले आहे. संस्कृतातील ‘किंशुक’ (किंचित पोपट किंवा हा पोपट काय?) हे नाव असेच पडलेले दिसते. बेंगॉल कीनो हे इंग्रजी नाव गोंदावरून पडले आहे. हिंदुधर्मात पळसाला बरेच महत्त्व पानाच्या तीन दलांना ब्रह्मा (डाव्या बाजूचे), विष्णू (मधले) व महेश किंवा शिव (उजव्या बाजूकडील) अशी नावे असून त्यांची चातुर्मासात पूजा करण्यास सांगितले आहे. लहान फांद्यांच्या सुक्या तुकड्यांना ‘समिधा’ म्हणतात व त्या होमहवनाकरिता प्राचीन काळापासून वापरात आहेत (त्यावरून ‘याज्ञिक’हे संस्कृत नाव दिले असावे). स्मृतिसार ग्रंथात पळसाच्या काड्यांनी दात घासण्यास सांगितले आहे. मौंजीबंधनात मुंडणानंतर पळसाचे पान मुंजा मुलास खावयास देतात व सोडमुंजीत पळसाची लहान काठी (दंड) त्याच्या हातात देतात. अभिज्ञान मंजरीमध्ये पळसाची अनेक संस्कृत नावे दिली आहेत. वैदिक वाङ्‌मयात (कौशिक सूत्रात) पलाश (पळस) याचा उल्लेख आला आहे तसेच त्याचा महाभारत व पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथात आणि कौटिलीय अर्थशास्त्रातही उल्लेख आहे.

जमदाडे, ज. वि. परांडेकर शं. आ.

पळसवेल : (हिं. पलसलता, किंसुका गु. वेलखाकरो क. बळ्ळीमुत्तुग सं. लतापलाश लॅ. ब्युटिया सुपर्बा). पळसाच्या वंशातील व कुलातील ही ⇨ महालता (मोठी काष्ठमय वेल) महाराष्ट्रामध्ये कोकणात व उ. कारवारात जंगलात आढळते शिवाय बंगाल, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, द. भारत आणि ब्रह्मदेश येथेही आढळते. हिचे खोड मोठे, तपकिरी रंगाचे व जाडजूड (मनुष्याच्या पोटरीजवळच्या भागाइतके) असून त्यावर त्रिदली, संयुक्त व एकाआड एक पाने असतात. ती पळसाच्या पानांपेक्षा काहीशी मोठी असतात. सामान्य शारीरिक लक्षणे पळसाप्रमाणे व लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या वेलीची फुलेही पळसाच्या फुलांपेक्षा मोठी असतात व शिंबेला लांबट देठ असतो. हिचे लाकूडही गर्द तपकिरी असते. मुळांच्या सालीपासून व कोवळ्या फांद्यांपासून उपयुक्त धागा (मध्य प्रदेशात) काढतात व त्याचे दोर बनवितात. ब्रह्मदेशात मुळापासून लाल रंगद्रव्य काढतात. फुलांमध्येही पळसासारखा पिवळा रंग असतो. गुरे विशेषकरून म्हशी व रेडे या वेलीचा जून पाला खातात. लहान मुलांना उष्णतेपासून होणाऱ्या काही कातडीच्या रोगांवर (उदा., पुरळ, फोड इ.) पानांचा रस, दही व आंबेहळद देतात. खोडापासून ‘कीनो’ गोंद मिळतो.

जमदाडे, ज. वि. 

काळा पळस : (तिवस, तिम्सा हिं. संदन गु. हारमो सं. तिनिश क. हुली, करिहोन्ने इं. चॅरिअट ट्री लॅ. औजीनिया ऊजेनेन्सिस, औ. डाल्वार्जिऑइडिस कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). ह्या शोभादायक पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात (दख्खन, गुजरात–डांग, मध्य प्रदेश इ.) सर्वत्र असून बाह्य हिमालयात व उपहिमालयात जम्मू ते भूतान या प्रदेशात तो सु. १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. कधीकधी त्याचे लहानमोठे समूह आढळतात. उ. कारवारात (येल्लापूर व हल्याळ भागांत) काळा पळस, सागवान, शिसू व जांभा यांचे मिश्र समूह आढळतात. ह्या वृक्षाची उंची सु. ६–१२ मी. (क्वचित२५–३० मी.) व घेर १-२ मी. पर्यंत असतो. खोडावरची साल करडी किंवा तपकिरी व तीवर आडव्या उभ्या भेगा असून तिचे लहान तुकडे सोलून निघतात. पाने संयुक्त, एकाआड एक, त्रिदली आणि उपपर्णे भाल्यासारखी व टोकदार, दले मोठी व चिवट मधले दल सु. ७–१४ X ५–९सेंमी. व बाजूची दले ७–९ × ३–७ सेंमी. दलांची कडा दातेरी अथवा तरंगित असते फुले पतंगरूप, असंख्य, पांढरी किंवा गुलाबी, साधारण सुवासिक, २.५–५ सेंमी. व्यासाची व लवदार असतात. ती मार्च ते मेमध्ये लहान झुपक्यांनी मंजरीवर येतात कळ्या व छदेही लवदार असतात. शिंबा जूनमध्ये येतात शिंबा ५–८ सेंमी. लांब, अरुंद, चपटी, पेरेदार व पिंगट असते. बिया दोन ते पाच इतर शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बियांनी व कलमांनी  करतात. शोभेकरिता वृक्ष बागेत लावतात मुळापासून निघालेल्या फुटव्यांपासून नवीन झाडे येतात. प्राथमिक अवस्थेत त्याला सावलीची गरज असते.

काळा पळस : (१) संयुक्त पान, (२) फुलोरा, (३) शिंबा.

याचे लाकूड (व्यापारी नाव-संदन) कठीण, लवचिक, मजबूत, फिकट तपकिरी, ठिपकेदार व सुंदर असते. तासून व रंधून त्याला उत्तम झिलई करता येते वाळवीपासून इतर लाकडांपेक्षा हे अधिक सुरक्षित असते. बैलगाड्यांचे निरनिराळे भाग, काही सजावटी सामान, शेतीची अवजारे, कापीव व कातीव काम, धोटे, चात्या, दारांच्या व खिडक्यांच्या चौकटी, तराफे, खांब, तुळ्या, पालखीचे दांडे व हत्यारांच्या मुठी व दांडे, घाणे, वल्ही, नावा इ. विविध वस्तूंसाठी उपयुक्त असते. सागवान व साल वृक्षाच्या लाकडाऐवजी ते कधीकधी वापरतात.उज्जैनीतील महादजी शिंदे यांच्या राजवाड्याचे खांब ह्याच लाकडाचे आहेत, असे रॉक्सबर्घ यांनी नमूद केले आहे (फ्लोरा इंडिका).सालीतील धाग्यांपासून दोर बनवितात. साल ज्वरनाशक व मूत्रपिंडाचे रोग, आमांश, अतिसार इत्यादींवर गुणकारी असते. सालीपासून चीर पाडून काढलेला कीनोसारखा लालसर गोंद स्तंभक असतो. तो अतिसार आणि आमांश यांवर देतात. सालीत  ७% टॅनीन असते. सालीची पूड मत्स्यविष आहे. लाखेचे किडे पोसण्यास हा बोराप्रमाणे व पळसाप्रमाणे उपयुक्त आहे. पाला गुरे आणि हरिणे खातात. [चित्रपत्र ५७].

पहा : लेग्युमिनोजी.

नवलकर, भो. सुं. परांडेकर, शं. आ.

संदर्भ : 1. Cowen, D.V. Flowering Shrubs and Trees in India,  Bombay, 1965.

    2. C.S.I.R.The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948  and Vol. VIII, New Delhi, 1966.

    3. Talbot, W. A. Forest Flora of Bombay and Sind, Vol, I, Poona, 1909.

पळस : (१) संयुक्त पान, (२) फुलोरा, (३) केसरमंडळ व किंजमंडळ, (४) शिंबा (शेंग).