चिवरी : (मेस क. कोंडा इं. स्लेंडर बांबू लॅ. ऑक्सिटेनँथेरा स्टॉक्साय, कुल-ग्रॅमिनी). ऑक्सिटेनँथेरा  वंशातील एकूण पाच जाती भारतात आढळतात. हा लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारा), बारीक व ९ मी. उंच (व ३·८ सेंमी. घेर) वृक्ष (गवत) कठीण असून द. आशियात व द. भारतात (कोकण व उ. कारवार) विशेषतः समुद्रकिनारी आढळतो. याची लागवडही बरीच करतात (पाचगणी, किनाऱ्यावरची खेडी इ. भागांत) खोडावर पेरी आणि कांडी (१५ – ३० X २·५ – ४ सेंमी.) स्पष्ट दिसतात [→ कळक] व आतील पोकळी लहान असते. पाने साधी १० – २० X ०·९ – १·८ सेंमी. व साधारणपणे कळकासारखी परिमंजरी मोठी आणि तीवर अनेक २·५ सेंमी. व्यासाची कणिश-गुच्छे असून त्यांत काटेरी कणिशके असतात [→फळ]  गुच्छांना गोलसर छदे (फुलोऱ्याच्या तळाशी असलेली उपांगे) असतात फुले नोव्हेंबरात येतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ ग्रॅमिनी  अथवा तृण कुलात वर्णिल्याप्रमाणे. खोडांचा उपयोग लाठ्या, काठ्या, छपरे, दांड्या, छत्र्यांचे दांडे, टोपल्या इत्यादींकरिता बराच होतो. बिया पेरून अथवा तळाजवळच्या कोंबांपासून नवीन लागवड करतात.

पहा : बांबू. 

ठोंबरे, म. वा.