चुका : (आंबट चुका क. हुळीचुक गु. चकानी भाजी सं. चुक्रिका इं. ब्लॅडर डॉक, सॉरेल लॅ. रूमेक्स व्हसिकॅरियस कुल-पॉलिगोनेसी). सु. १५ – ३० सेंमी उंचीची ही सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ओषधी मूळची पश्चिम पंजाबमधील असून तिचा प्रसार भारतात सर्वत्र शिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण व उत्तर आफ्रिका येथेही आहे. भाजीकरिता तिची बरीच लागवड करतात. फांद्या तळापासून येतात पाने साधी (२·५ — ७·५ सेंमी. लांब), एकांतरित (एकाआड एक), काहीशी मांसल, पांढरट, अंडाकृती, विशाल कोनी उपपर्णे पातळ व नलिकाकृती फुले एकत्रलिंगी (एकाच झाडावर स्त्री व पुं-पुष्पे वेगवेगळी येणारी) व पानांच्या विरुद्ध बाजूस टोकाकडेच्या मंजऱ्यांवर येतात. परिदले सहा, आतील पातळ, गोल आणि जालयुक्त केसरदले सहा किंजपुट त्रिधारी व बीजक (बीजाची पूर्वावस्था) एकच असते [→ फूल]. कपाली (कठीण, शुष्क व आपोआप न फुटणारे फळ) पांढरी किंवा गुलाबी व धारदार. चुक्याची पाने आंबट, प्रशीतक (थंडावा देणारी), सौम्य रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असतात. रस दातदुखीवर लावतात पानांच्या रसाने शिसारी कमी होऊन भूक वाढते पोटातील उष्णता आणि विंचू व इतर दंशांच्या वेदना त्यामुळे कमी होतात असे म्हणतात. बी भाजून आमांशावर घेण्याची पद्धत आहे. कोवळ्या झाडांची पालेभाजी करतात [→ पॉलिगोनेसी].

जमदाडे, ज. वि.

याच्या लागवडीचा हंगाम पावसाळी व हिवाळी असतो. याला मध्यम काळी जमीन लागते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २० — २५ टन शेणखत घालून कुळवून ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात. त्यांत हेक्टरी चार ते साडेचार किग्रॅ. बी लावतात. बी लावल्याबरोबर पाणी देतात. पुढे दर आठ — दहा दिवसांनी पाणी देतात. बी लावल्यापासून पाच-सहा आठवड्यांनी विक्रीसाठी पीक खुडतात. कडक उन्हाच्या दिवसात पिकाची वाढ मंदावते. वरखत सहसा देत नाहीत. एका हंगामातील पालेभाजीचे उत्पन्न हेक्टरी ४,००० — ५,००० किग्रॅ. येते.

पाटील, ह. चिं.

रोग : चुक्यावर केवडा व तांबेरा हे दोन रोग आढळतात. केवडा रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर बुरशीची वाढ होते आणि वरच्या बाजूवर पिवळसर चट्टे दिसतात. रोगाचा नाश करण्यासाठी बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात. तांबेऱ्यामुळे पानांवर वाटोळे तांबूस ठिपके आढळतात. हा रोग तुरळक प्रमाणात आढळतो.

रुईकर, स. के.