भूर्ज : (इं. हिमालयन सिल्व्हर बर्च लॅ. बेट्युला भोजपत्रा बे. युटिलिस कुल- बेट्युलेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील बेट्युला वंशातील एका वृक्षाचे नाव. बेट्युला वंशात सु ३८-४० जाती असून त्या सर्व झुडपे किंवा वृक्ष आहेत व त्यांचा प्रसार उत्तर ध्रृववृत्तापासून दक्षिण यूरोप, हिमालय, चीन, जपान, दक्षिण अमेरिका इ. प्रदेशांपर्यंत आहे. त्या सर्वांना ‘बर्च’ हे इंग्रजी नाव आहे. यूरोपात सामान्यपणे आढळणाऱ्या बे. पेंड्यूला व बे. प्यूबिसेन्स यांचा इमारती लाकडाकरिता बराच उपयोग केला जातो. अमेरिकेत ‘यलो बर्च’ (बे. ल्यूटिया) व ‘पेपर बर्च’ (बे. पॅपिरिफेरा) आणि फक्त उत्तर अमेरिकेत बे. लेंटा ह्या जाती आढळतात पहिल्या दोन जाती लाकडाकरिता व तिसरी जाती ‘स्वीट (चेरी) बर्च’ ‘विंटरग्रीन’ तेलाकरिता प्रसिद्ध आहे. भारतात तीन जाती आढळतात. त्यांपैकी इंडियन बर्च (बे ॲलनॉइडिस किंवा बे. ॲक्युमिनॅटा) हिमालयात रावीपासून पूर्वेकडे (१,५०० – ३,००० मी. उंचीच्या प्रदेशात टेकड्यांत (९००-३,००० मी. उंचीपर्यंत) मणिपूर आणि ब्रह्मदेशाच्या टेकड्यांत (१,५००-१,८०० मी. उंचीपर्यंत) आढळते. हा सु. ३० मी. उंच व १.५ मी. घेराचा वृक्ष आहे. यालाही भूजपत्र म्हणतात, तथापि खरा भूजपत्र वृक्ष (बे. भोजपत्रा) ही निराळा असून त्यापेक्षा लहान असतो. बे. सिलिंड्रोस्टॅकिस ही तिसरी जाती आसामात (१,३८० मी. उंचीपर्यंत) व दार्जिलिंगमध्ये (१,८०० मी. उंचीपर्यंत) आढळते हा वरील दोन्ही जातींपेक्षा मोठा (३६ मी. उंच) वृक्ष आहे. तिन्ही जाती कमीअधिक उपयुक्त आहेत. सर्वच बर्च वृक्षांच्या कोवळेपणी सालीच्या विविधरंगी आडव्या पातळ ढलप्या निघतात. पाने एकाआड एक, साधी, अंडाकृती, लांबट किंवा त्रिकोनी व दातेरी असून दरवर्षी एकदा गळतात व वसंत ऋतूत नवी पालवी येते. या वृक्षांना स्वतंत्र लोंबत्या कणिश फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] पालवीपूर्वी एकलिंगी फुले येतात. ती लहान असून सर्वसाधारण संरचना ⇨ बेट्युलेसीत (भूर्ज कुलात) वर्णिल्याप्रमाणे असते. फळे लहान शुष्क, एकबिजी, सपक्ष (पंखयुक्त) व कठीण कवचयुक्त म्हणजे कपाली असून त्यांचे शंकूच्या आकाराचे झुबके येतात.

खरा भूजपत्र वृक्ष (बे. भोजपत्रा) सु. २० मी. उंच असून हिमालयात पण भूतानच्या पश्चिमेस (सु. ४,२०० मी. उंचीपर्यंत) आढळतो पश्चिम तिबेट व चीन या प्रदेशांतही त्याचा प्रसार आहे. याची साल चकचकीत पांढरी किंवा लालसर पांढरी असते. तिच्या बाहेरच्या पातळ भागाच्या आडव्या सुरळ्या निघतात व त्यांचा उपयोग प्राचीन काळी लिहिण्याकरिता कागदाप्रमाणे करीत. हल्ली त्या आवेष्टन, छत्र्यांचे आच्छादन, छप्परे, हुक्क्यांच्या नळ्या इत्यादींकरिता वापरतात. या

  

भूर्ज : (१) नर व स्त्री-फुलोऱ्यासह फांदी, (२) नर-पुष्पे, (३) केसरदल, (४) स्त्री-पुष्पे, (५) फळधारी शाखा, (६) सपक्ष फळ.

  

वृक्षाचे लाकूड पांढरे किंवा पांढरट लाल, मध्यम कठीण व चिवट असते तसेच ते लवचिक व टिकाऊ असल्याने हिमालयी भागात घरबांधणीस वापरले जाते. फांद्यांचा उपयोग दोरांच्या पुलाकरिता व पानांचा चाऱ्याकरिता केला जातो. इंडियन बर्च या वर उल्लेख केलल्या दुसऱ्या भूजपत्र वृक्षाचे लाकूडही जड, कठीण व टिकाऊ असते ते कापण्यास, रंधून झिलई करण्यास सोपे असल्याने कापीव व कोरीव कामास चांगले असते. हे लाकूड प्लायवुडाकरिता उपयुक्त असल्याने चहाची खोकी, विमानबांधणी, ग्रामोफोन व रेडिओ यांच्या पेट्या इत्यादींकरिता फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे. बंगालच्या उत्तर भागातून दरवर्षी सु. १,४०० घ. मी. लाकूड उपलब्ध होते. शिवाय सिमला व बुशहर भाग, उ. प्रदेशातील जौनसार व टेहरी भाग येथील जंगलांतून याचा थोडा पुरवठा होतो. भूर्ज वृक्षाच्या सालीत जंतुनाशक आणि वायुसारक गुण असतात. ‘व्हाइट बर्च’ (बे. पेंड्यूला) हा वृक्ष रशियात अत्यंत उपयुक्त ठरला असून तो बागेत शोभेकरिताही लावतात. बर्च हे नाव काही इतर वंशातील कुलांतील वनस्पतींनाही लावतात उदा., वेस्ट इंडिज बर्च, चेरी बर्च, आयव्हरी बर्च, गोल्डन बर्च इत्यादी. ‘जपानी बर्च’च्या दोन जाती यलो व स्वीट बर्चसारख्या असून तेथे त्यांचा प्लायवुडाकरिता मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

संदर्भ :

1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol. I. Delhi, 1948.

2. Harder, R. and Othres, Strasburger’s Textbook of botany, London, 1965.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.