गोंदणी : (गोंधणी हिं. गोंदी सं. लघुशेल्ल क. किरिचेल्ली, नखळ्‌ळी लॅ. कॉर्डिया रोथी  कुल-बोरॅजिनेसी). साधारणपणे ६—१२ मी. उंच वाढणारा हा लहान पानझडी वृक्ष श्रीलंका, अरबस्तान, ॲबिसिनिया, सिंध व भारत (पंजाब व पश्चिम द्वीपकल्प) येथे सामान्यपणे आढळतो आणि बागेतही लावतात. हा ⇨ भोकराच्या वंशातील असल्याने अनेक लक्षणे त्यासारखी आहेत. साल करडी व भेगाळ पाने साधारण समोरासमोर असून पात्यांवर तळातून शिरा नसतात फुले लहान, अनेक, पांढरी फुलोरा संयुक्त वल्लरी संवर्त, पुष्पमुकुट व केसरमंडल ही प्रत्येकी चार दलांची किंजमंडल दोन दलांचे, किंजपुट ऊर्ध्वस्थ व बीजके चार [→ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ साधारण वाटाण्याएवढे, नारिंगी इतर लक्षणे भोकरासारखी. फळातील मगज (गर) पौष्टिक, खाद्य व गोड असतो. लाकूड चांगले त्याचा व फळांचा उपयोग सामान्यतः भोकराप्रमाणे. सालीतील धागे दोराकरिता वापरतात व सालीतून निघणारा डिंक उपयुक्त असतो. साल स्तंभक (आकुंचन करणारी) असून तिचा काढा गुळण्यांकरिता वापरतात. फळे वाळवून त्यांच्या चूर्णाचे साखरेच्या पाकाबरोबर लाडू करतात ते पौष्टिक असतात. 

पहा : बोरॅजिनेसी भोकर. 

केळकर, शकुंतला