चिल्ला : (लैंजा हिं. चिल्लारा, मोदी, भारी क. कोंजा लॅ. कॅसिॲरिया टोमेंटोजा कुल – सॅमीडेसी). हा लहान पानझडी वृक्ष भारतात सामान्यपणे सर्वत्र आणि श्रीलंका, मलाया व

उ. ऑस्ट्रेलिया ह्या प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात पानझडी जंगलात व हिमालयात ९३० मी. उंचीपर्यंत आढळतो. याची उंची ९ मी. व घेर १·२–२ मी. असतो. साल राखी, जाड व कडू लहान फांद्या लवदार पाने साधी, बहुधा एकांतरित (एकाआड एक), थोडीफार लवदार, दीर्घवर्तुळाकृती किंवा भाल्यासारखी, अखंड किंवा दंतुर असतात. फुले लहान, असंख्य, हिरवट पिवळी व पानांच्या बगलेत, जानेवारी – मे मध्ये झुबक्यांनी येतात. संदले ४-५ लवदार आणि दीर्घस्थायी (दीर्घकाल टिकून राहणारी) प्रदले नसतात. संवर्तनलिका फार लहान केसरदले बहुधा आठ, वंध्यकेसर आखूड आणि टोकास लवदार, संदलाशी एकांतरित आणि ती सर्वच संवर्तनलिकेस खाली चिकटलेली असतात. किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यात एकच कप्पा असतो [→फूल]. बीजके (बीजाची पूर्वावस्था) अनेक व तटवर्ती फळ (बोंड) शुष्क, दीर्घवर्तुळाकृती, गुळगुळीत व तिकोनी असून त्याची तीन शकले होतात [→ फळ]. बिया शेंदरी अध्यावरणाने (गराने) वेढलेल्या असून त्या सर्वांचा मऊ मगज फळात भरलेला असतो. याचा सॅमीडेसी कुलात अंतर्भाव केला जातो, तथापि काहींच्या मते ⇨ फ्लॅकोर्टिएसी  अथवा अत्रुण कुलात करावा. फळातील दुधी रस मत्स्यविष असतो. लाकूड पिवळट पांढरे, मध्यम कठीण व खरबरीत असून फण्या व तत्सम किरकोळ वस्तूंकरिता वापरतात. तात्पुरत्या झोपड्यांनाही ते उपयुक्त असते. सालीच्या चूर्णाची कमला-पुडीत [→कुंकू] भेसळ करतात. मगज मूत्रल (लघवी साफ करणारा) असून सालीचे चूर्ण जलशोफावर (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहातील म्हणजे ऊतकातील पेशींच्यामध्ये द्रव साठल्यामुळे येणाऱ्या सुजेवर) बाहेरून लावतात. कातडी कमावण्यास साल वापरतात. त्यामुळे कातड्यास गर्द रंग येतो.

बोखरा : (बोखाडा, कॅसिॲरिया ग्रॅव्हिओलेन्स ). हा त्याच वंशातील लहान पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो. याला उग्र वासाची असंख्य फुले येतात. पाने मनुष्यास विषारी व गर्द पिवळी फळे मत्स्यविष असतात लाकूड कातीव कामास उपयुक्त असते.

बोहक्रा : (कॅसिॲरिया ग्लोमेरॅटा ). ही कॅसिॲरिया  वंशातील तिसरी जाती भारतात सर्वत्र व हिमालयात १,५५०–२,१७० मी. उंचीपर्यंत सापडते. हा सु. ६ मी. उंच व सदापर्णी वृक्ष असून त्याला ऑगस्ट ते जानेवारीत उग्र वासाची असंख्य हिरवट फुले येतात. मगज नारिंगी व फळाची साल कडवट असते. फळे मत्स्यविष असतात. लाकूड चहाच्या पेट्या, कोळसा व किरकोळ बांधकाम इत्यादींसाठी वापरतात. या वृक्षालाही चिल्ला म्हणतात. 

कुलकर्णी, उ. के.