डुरांटा प्लुमेरी : (इं. गोल्डन ड्यू ड्रॉप, स्काय फ्लॉवर, पीजन बेरी कुल-व्हर्बिनेसी). हे काटेरी, सदापर्णी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) झुडूप मूळचे द. अमेरिका (मेक्सिको ते ब्राझील), वेस्ट इंडीज येथील असून भारतात सर्वत्र बागेत शोभिवंत कुंपणाकरिता  लावले जाते. फांद्या बहुधा काटेरी, थोड्या वाकलेल्या व पसरट असतात. पाने साधी, लंबगोल, आयत, दातेरी किंवा अखंड, समोरासमोर फांद्यांच्या टोकांकडे अगर पानांच्या बगलेत लोंबत्या मंजऱ्या बहुधा नेहमी येतात परंतु विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी या काळात येतात. फुले निळी, लहान व अनेक पांढऱ्या फुलाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. मृदुफळे पिवळी, गोलसर, मोठ्या वाटाण्याएवढी असतात. इतर सामान्य लक्षणे साग कुलात [⟶ व्हर्बिनेसी ] वर्णिल्याप्रमाणे. ही झाडे विषारी आहेत असे मानतात. फळांचा रस डासांच्या अळ्यांना मारक असतो व तसा त्याचा उपयोग करतात. पानांत सॅपोनीन व फळात नार्कोटिनासारखे क्षाराभ (अल्कलॉइड) असते. ह्याचे लाकूड पिवळट किंवा फिकट तपकिरी. कठीण व जड असते. ते कातीव कामास उपयुक्त असते. पाला जनावरे खात नाहीत. नवीन लागवड कलमे लावून करतात.

चौगले, द. सी.

डुरांटा प्लुमेरी : फुलां-फळांसह फांदी