दूधवेल (होया पेंड्यूला) : (१) पाने व फुलोऱ्यासह फांदी, (२) फुले, (३) पेटिकाफळे.

दूधवेल : (आंब्री लॅ. होया वायटाय कुल-ॲस्क्लेपीएडेसी). ह्या वनस्पतीच्या वंशात (होया) एकूण सु. २०० जाती असून भारतात त्यांपैकी २५ आढळतात त्या सर्व ⇨ अपिवनस्पती वेली असून कित्येक मुळांच्या साहाय्याने आधारावर चढतात प्रथम जमिनीशी असलेला संपर्क तुटून पुढे त्या आपला संपूर्ण भार आधारीभूत वनस्पतीवर टाकून चढतात. दूधवेल ही अनेक वर्षे जगणारी आणि जाडजूड वेल प. भारतातील जंगलात विपुल आढळते. ही प्रथम बी रुजून वाढते व लवकरच जवळच्या आधारावर चढते व तिचा जमिनीशी संपर्क तुटतो. हिची जाड, मांसल आणि फिकट हिरवी पाने मोठी व समोरासमोर असतात (६·२५–८·५ X ३–४ सेंमी.). फुले लहान व चक्राकृती असून बाजूस दोन पानांच्या देठांमधील भागांतून वाढणाऱ्या चवरीसारख्या फुलोऱ्यात ऑक्टोबर ते डिसेंबर येतात. ती फिकट पिवळट असून त्यांची सामान्य संरचना ⇨ ॲस्क्लेपीएडेसी कुलात (रुई कुलात) वर्णिल्याप्रमाणे असते. पेटिका (पेटीसारखी) फळे (७·५–१० X ०·६ सेंमी.) सरळ, बारीक, टोकाकडे साधारण निमुळती, गोलसर असून ती जोडीने येतात. बिया अनेक, कुंतसम (भाल्यासारख्या) आणि ०·४ सेंमी. लांब असून त्यांवरील केसांचा झुबका सु. ५ सेंमी. लांब असतो. या वेलीच्या वंशातील दुसऱ्या दोन जाती, क्वीन्सलँडमधील होया कॅर्नोजा अथवा वॅक्स प्लँट आणि खासी टेकड्यांतील होया ग्रिफिथाय, लालसर फुलोरे व हिरवीगार किंवा विविधवर्णी पाने यांमुळे येणाऱ्या शोभेकरिता बागेत लावतात. अभिवृद्धी कलमे किंवा पाने वाळूत लावून करता येते. यांना सावली आणि निचऱ्याची सकस जमीन लागते. त्यांना कमानी, जाळ्या, खांब इत्यादींवर चढवून शोभेत भर टाकता येते. तसेच होया पेंड्यूला ही पांढऱ्या फुलांची वेल प. भारतातील जंगलात वाढते व तिच्या खोडापासून उपयुक्त व चांगल्या प्रतीचा धागा मिळतो ही वनस्पती वांतीकारक आणि विषाचे दुष्परिणाम घालविणारी आहे. होया मल्टिफ्लोरा ही अपिवनस्पती आसामातील नागा टेकड्यांत असून तिला शेंदरी फुले येतात तिचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा) असून जावामध्ये तिची पाने कुटून संधिवातावर चोळतात. होया ऑस्ट्रॅलिस ह्या पॉलिनीशिया या ऑस्ट्रेलियातील जातीची फुले सामोआ बेटांत उत्सव प्रसंगी नाचताना शरीरभूषणाकरिता वापरतात.

हर्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.