ब्राझील नट : (इं. सॅव्हरीनट, पॅरानट, क्रीमनट, कॅस्टानिया लॅ. बर्थोलेसिया एक्सेल्सा कुल लेसिथिडेसी). हा सु. २० – ३० मी. (कधी ४५ मी.) उंच व १ मी. घेर असलेला वृक्ष दक्षिण अमेरिकेत (गिनी, पॅरा, व्हेनेझुएला व ब्राझील येथे) फक्त वन्य अवस्थेत आढळतो ॲमेझॉन व रीओ नेग्रो या नद्यांच्या काठाने याची दाट जंगले आहेत. याची पाने मोठी (६० X १५ सेंमी.),ब्राझील नट : साधी, एकाआड एक व चिवट असून फांद्यांच्या टोकांस झुबक्यांनी येतात. कोरड्या ऋतूत शेंड्याकडे मोठी, द्विलिंगी, मलई सारख्या रंगाची फुले मंजऱ्यांवर येतात. फूल उमलताना संवर्ताचे तडूकन दोन भाग होतात पाकळ्या ६ केसरदले अनेक व फडीप्रमाणे जुळलेली, पण वरची वंध्य [ ⟶ फूल]. फळे (बोंडे) मोठी, १५ सेंमी. व्यासाची, गोलसर, कठीण, तपकिरी व न तडकणारी असून ती सु. १५ वर्षांनी येऊ लागतात. प्रत्येक फळ १-२ किग्रॅ. वजनाचे असून त्यात १८-२४ कठीण कवचयुक्त त्रिकोणी बिया असतात. त्यांनाही ‘ब्राझील नट’ म्हणतात. बियात तेलयुक्त पुष्क (गर्भाभोवतीचा अन्नांश) असते. बिया काढण्यास फळ लहान कुऱ्हाडीने फोडावे लागतात. कठीण संवर्ताच्या गुडदीने त्याचे भोक बंद करून ठेवल्यास रुजलेल्या बियांचे मोड बाहेर येतात. बियांत १७% प्रथिन आणि ६५ – ७०% मेद असून त्या पूर्वीपासून तद्देशीय लोक खातात तेल साबणास उपयुक्त असते. खोडाची साल गलबताच्या भेगा बुजविण्यास वापरतात. बर्थोलेसियाच्या इतर जातींपासूनही ब्राझील नट (बिया) मिळवितात त्यांना व्यापारी महत्त्व आहे.

पहा : मिर्टेलोझ.

चौगले, द. सी.