केळ, जंगली : (लॅ. हेलिकोनिया कुल-म्यूझेसी). केळीसारख्या [कदली गण, → सिटॅमिनी] ह्या शोभिवंत, ओषधीय [→ ओषधि] वनस्पतींच्या वंशात सु. ३५ जाती असून त्यांच्या मूलस्थानाबद्दल एकमत नाही. काही जाती अमेरिकेतील उष्ण भागांतील व काही आशियातील उष्ण भागांतील असाव्यात. थंड प्रदेशात त्यांच्यापैकी काहींची लागवड पानांच्या सौंदर्याकरिता उष्ण पादपगृहात (काचगृहात) ॲलोकेशिया  [→ माणक हस्तिकर्णी], अँथूरियमकॅलाथियम  [→ टोपीतांबू] या वंशातील वनस्पतींबरोबर करतात. ह्यांना भूमिस्थित (जमिनीतील) बळकट खोडापासून वायवी (हवेतील) खोड येते आणि त्यावर मोठी, आकर्षक व शोभिवंत पाने त्यांखाली फुलांचे झुबके आणि शुष्क, तडकणारी तीन कप्प्यांची व तीन बीजांची फळे येतात. संदले तीन रेषाकृती व सुटी पुष्पमुकुट आखूड आणि नळीसारखा केसरदले पाच आणि वंध्य केसर एक असतो [→ फूलकेळ सिटॅमिनी].

(१) हेलिकोनिया अंगुस्टिफोलिया, (२) हे. बिहाई व (३) हे. मेटॅलिका या जाती महाराष्ट्रात शोभेसाठी लावतात. पहिली जाती मूळची ब्राधीलमधली पाने लांब देठाची व कमानीसारखी उंची १·२४ मी., खुजी फुले पांढरी, टोकास हिरवी छदे शेंदरी फुलोरा सरळ. दुसरी जाती मूळची वेस्ट इंडीजमधली उंची ४-५ मी. छदे मोठी शेंदरीफुले लाल किंवा नारिंगी, तिसरी जाती मूळची न्यू गिनीतील. तिची पाने आकर्षक व लोंबती खालची बाजू, मध्यशीर, किनार व शिरा काशासारख्या तांबड्या फुले शेंदरी. सर्वांची नवीन लागवड गड्डे विभागून लावून करतात.

जमदाडे, ज. वि.