शिरीष : (शिरस, शिरीस, चिचोळा हिं. सिरई, सिरीस गु. पिलो सर्सिओ क. बगेमर सं. शिरीष, कर्णपुरा इं. पॅरट–सिरीस–सिझलिंग ट्री लॅ. अल्बिझिया लेब्बेक कुल-लेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] हा मोठा पानझडी, जलद वाढणारा, शिंबावंत वृक्ष भारतात मिश्रजंगलांत सर्वत्र आढळतो रस्त्यांच्या दुतर्फा शोभा व सावलीकरिता आणि मोठ्या उद्यानांतूनही तो लावतात. त्याच्या अल्बिझिया ह्या प्रजातीत एकूण ६० जाती असून भारतात १५ आढळतात. वैदिक व वेदोत्तर वाङ्मयात याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. संस्कृत काव्यांत हा वृक्ष कोमलतेचे प्रतीक मानला आहे.

याचा प्रसार उष्ण कटिबंधातील आशिया व आफ्रिकेचा भाग, हिमालयाचा १,२०० मी. उंचीपर्यंतचा पायथा, श्रीलंका, अंदमान व म्यानमार येथे आहे. तो ⇨ वर्षावृक्ष, ⇨ बाभूळ, ⇨ शमी इत्यादींच्या कुलातील व उपकुलातील असल्याने या सर्वांच्याच अनेक शारीरिक लक्षणांत साम्य आहे.

वनस्पतिवर्णन : याची उंची १८–३० मी. पर्यंत व घेर सु. १·८–३ मी. असतो. याची साल करडी व कोवळ्या फांद्या गुळगुळीत असतात. मोठ्या फांद्या लांब व पसरट पाने संयुक्त, एकाआड एक, दोनदा विभागलेली व पिसासारखी असून दलांच्या जोड्या २–४, क्वचित ६, प्रत्येक दल १०–१२·५ सेंमी. लांब असते दलके ५–९ जोड्या फुलोरे साधारण गोलाकार व स्तबकासारखे [→ पुष्पबंध] असून ते मार्च–मे महिन्यांमध्ये येतात त्यावर सवृंत (देठ असलेली), लहान, द्विलिंगी, सुवासिक, हिरवट पांढरी फुले असतात. केसरदले (पुं-केसर) पाकळ्यांपेक्षा बरीच लांब, बारीक व नाजूक, असंख्य व तळाशी जुळलेली असून शिंबा (शेंग) लांब, पातळ, चपटी, दोन्ही टोकांस गोलसर, फिक्कट पिवळी, गुळगुळीत व चमकदार असून त्या तडकत नाहीत. उन्हाळ्यात पाने नसतात ह्या वाळलेल्या शिंबा वाऱ्याने जोरात हलल्यामुळे जो कलकलाट होतो, त्याची तुलना स्त्रियांच्या गप्पांशी करून, त्या अर्थाचे इंग्रजी नाव ‘वुइमेन्स टंग’ यास दिले आहे. बिया ४–१२, लंबगोल, चपट्या, फिकट व पिंगट असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी किंवा शिंबावंत कुलात व मिमोजॉइडी उपकुलात (शिरीष उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. हा वृक्ष ओलसर परिसरात अधिक चांगला वाढतो. बिया व छाट कलमे लावून लागवड करता येते.

शिरीष (अल्बिझिया लेब्बेक) : संयुक्त पाने व फुलोरे यांसह फांदी.

उपयुक्तता : शिरिषाचे लाकूड गर्द पिंगट, कठीण व टिकाऊ असल्याने ‘ईस्ट इंडियन वॉलनट’ किंवा ‘कोक्वो’ या नावाने त्याची निर्यात होते. लाकूड मोठ्या प्रमाणात अंदमानातून येते त्यापासून सजावटी सामान, शेतीची अवजारे, खेळणी वगैरे विविध प्रकारच्या वस्तू बनवितात. त्याची साल रंगविण्यास व कातडी कमाविण्यास आणि कोळ्यांची जाळी रंगविण्यास उपयुक्त असते. त्याचा गोंद बाभळीच्या डिंकाबरोबर भेसळ करून विकतात. पाला गुराढोरांना खाऊ घालतात. चहाच्या व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता शिरीष वृक्ष लावतात. साल, पाने, फुले व बी औषधी आहेत.

काळा शिरीष : (चिच्वा, चिचोळा, बोर्हीय चिंचाडा, रान शिरीष, चिंचुदा हिं. काला सिरीस गु. सरसडो, काळो सारसिओ क. सिरसल, बिलवरा सं. शिरीष इं. ब्लॅक सिरीस लॅ. अ. ओडोरॅटिसिमा). अल्बिझिया प्रजातीतील वृक्षाची दुसरी जाती. त्याचा प्रसार हिमालय, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान व भारत येथे सर्वत्र आहे. विशेषतः कोकण, सह्याद्री घाट, कारवार येथील दाट मिश्रजंगलांत तो आढळतो. तो सु. ९–१२ मी. (क्वचित २५ मी.) उंच असून कोवळ्या फांद्या गडदरंगी व लवदार असतात. साल करडी व भेगाळलेली असते. पाने १५-३० सेंमी. लांब दले ३–८ जोड्या, प्रत्येक दल ७·५–१५ सेंमी. लांब, दलकांच्या ८–१५ जोड्या फुले बिनदेठाची, सुवासिक व पांढरी असून ती एप्रिल ते जूनमध्ये येतात. त्यांचे २–२·५ सेंमी. व्यासाचे लहान झुपके फांदीच्या टोकास परिमंजरीप्रमाणे लोंबतात. केसरदले बरीच लांबट, फिकट पिवळी व तळाशी जुळलेली शेंग लहान, पिंगट बिया अंडाकृती, चपट्या व पिवळ्या असतात.

पांढरा शिरीष : (गुराई, किन्हई क. बेलटी हिं. सफेद सिरीस, गुरार सं. श्वेत कटभी इं व्हाइट सिरीस लॅ. अ. प्रोसेरा). शिरिषाच्या प्रजातीतील आणखी एक पानझडी वृक्षाची जाती. काळ्या शिरिषाशी याचे अधिक साम्य आहे. त्याचा प्रसार भारत (मध्य व पूर्व हिमालय, बंगाल, बिहार व प. भारत, अंदमान), म्यानमार, पाकिस्तान, मलाया, चीन, फिलिपीन्स येथे आहे. महाराष्ट्र व कर्नाटक येथील जंगलांत तो ओढयाच्या काठाने, गाळाच्या जमिनीत व इतरत्र ओलसर ठिकाणी विशेषकरून आढळतो.

वृक्षाची उंची १८–२४ मी. (क्वचित ३० मी.) व खोडाच्या घेर एक मी. पेक्षा जास्त असतो. कोवळ्या फांद्या फिकट व त्यांवर अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. साल जाड, पिवळट व गुळगुळीत. संयुक्त व पिसासारखी पाने ३०-४५ सेंमी. असून वरील दोन्ही जातींपेक्षा मोठी दले १२·५–१५ सेंमी लांब, संख्येने अधिक (२–६ जोड्या) व दलके (६–१२ जोड्या), फुलोरे मे – जूनमध्ये लहान झुपक्यांनी परिमंजरीत येतात. प्रत्येक झुपक्यात बिनदेठाची अधिक फुले असतात. केसरदले लांब, असंख्य व हिरवट पिवळी शेंग १०–१२ X १·५–२·५ सेंमी., रंगाने नारिंगी-पिंगट, चकचकीत व गुळगुळीत बीजे लंबगोल, ६–१२, चपटी व फिकट पिंगट असतात.

परांडेकर, शं. आ.