तेंडू : (१) फुलांसह फांदी, (२) फळे.

तेंडू : (तेमरू गु. टमरूज क. थुंबरी सं. दीर्घपत्रका इ. कोरोमंडल एबनी लॅ. डायोस्पिरॉस मेलॅनोझायलॉन कुल–एबेनेसी). ह्या सु. ९–१५ मी. उंच पानझडी वृक्षाचा प्रसार श्रीलंकेत व भारतात बहुतेक सर्वत्र आणि महाराष्ट्रातील पानझडी जंगलात आहे. याची साल गडद करडी किंवा काळी असून तिचे साधारण आयत खवले निघतात. कोवळ्या भागांवर लव आणि फांद्यांवर क्वचित काटे असतात. पाने चिवट, आयत अंडाकृती, एकाआड एक किंवा काहीशी समोरासमोर फुले एकलिंगी पण एकाच झाडावर पुं–पुष्पे लोंबत्या वल्लरीवर ३–१२ स्त्री–पुष्पे एकेकटी, लोबंती व पांढरी असून फळे गोल व पिवळी आणि बिया दोन ते आठ असतात.

साल स्तंभक (आकुंचन करणारी) काढा अतिसार व अग्निमांद्यावर देतात तो शक्तिवर्धक असतो. पाने मूत्रल (लघवी साफ करणारी), वायुनाशी, रेचक, रक्तरोधक (रक्तस्राव थांबवणारी) सुकी फुले कातडी आणि रक्त यांच्या विकारावर गुणकारी असतात. सालीत १९%, फळात १५% आणि अर्धपक्व फळात २३% टॅनीन असते. मध्यकाष्ठ (आतील जून लाकूड) काळे व रसकाष्ठ (बाहेरचे कोवळे लाकूड) फिकट तपकिरी किंवा लालसर असते. ते कठीण व टिकाऊ असून त्याला चांगली झिलई होते ते खांब, तराफे, गाड्यांचे भाग, सजावटी सामान, धोटे इत्यादींसाठी वापरतात मध्यकाष्ठ (एबनी) कोरीव कातीव कामांसाठी उपयुक्त असून नक्षीकाम, कपाटे पेट्या, जडावाचे काम, चित्रांच्या चौकटी, हातातल्या काठ्या, मुसळे, फण्या, खेळणी, तपकिरीच्या डब्या इ. विविध वस्तूंस उपयुक्त असते. पाने मोठ्या प्रमाणावर विड्या बांधण्यास वापरतात. पिकलेली फळे खातात कारण त्यात गोड, मऊ, पिवळसर व स्तंभक गर असतो. पानांच्या पत्रावळी व द्रोण बनवितात. कोवळी पाने आणि फळे जनावरांना खाऊ घालतात.

पहा : एबेनेसी.

जमदाडे, ज. वि.