गोवर्धन : मुळे, पाने व फुलोऱ्यासह वनस्पती, (२) उघडलेले चषक, (३) चषक पुष्पबंध, (४) स्त्री-पुष्प, (५) पुं-पुष्प, (६) बीज.

गोवर्धन : (दुदली, मोठी दुधी हिं. गु. दुधी गु. दुदेली क. बरसु, अच्छेगिड सं. नागार्जूनी इ. पिल बेरिंग स्पर्ज, ऑस्ट्रेलियन अस्थमा हर्ब लॅ. यूफोर्बिया हिर्टा यू. पिल्युलिफेरा कुल-यूफोर्बिएसी). ही सु. १५-५० सेंमी. उंच वाढणारी किंवा आरोही (आधारावर चढणारी), वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ओषधी  भारतात सर्वत्र, शिवाय श्रीलंकेत आणि सर्व उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत, शेतजमिनीत व पडीक जागी आढळते. खोडावर व फांद्यांवर लांब, वाकडे व पिवळट केस असतात. पाने समोरासमोर, लहान आयतकुंतसम (भाल्यासारखी) पण तळास तिरपी, दंतुर, वरून फिकट तांबूस हिरवी असतात. हिला अनेक सूक्ष्मफुले कक्षस्थ (पानांच्या बगलेत), चषकरूप पुष्पबंधात (फुलोऱ्यात) वर्षभर येत असतात. फळ (बोंड) केसाळ व लहान असते. बी साधारण पिंगट व लंब-त्रिकोनी. दमा, आमांश, कफ, कृमी, शूल (तीव्र वेदना), उपदंश (गरमी) इ. विकारांवर ही वनस्पती गुणकारी असून हिचा चीक चामखिळीवर लावतात.

पहा : पानचेटी यूफोर्बिएसी.

जमदाडे, ज. वि.