चिनी ताग: [जयंती गु. नानी-नहानी खपट सं. जया इं. इंडियन मॅलो,चायना (टीएंट्‌सीन) ज्यूट लॅ.ॲब्युटिलॉन ॲव्हिसेनी, ॲब्यूटिलॉन थीओफ्रॅस्टी कुल-माल्व्हेसी]. ही केसाळ व वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी  ⇨ मुद्रा  व ⇨ कसीली   यांच्या वंशातील व ⇨ माल्व्हेसी  अथवा भेंडी कुलातील असल्याने काही शारीरिक लक्षणे त्यांसारखी व भेंडी कुल-वर्णनात दिल्याप्रमाणे आहेत. हिचे नैसर्गिक स्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश ते चीन असून अमेरिकेतील ऊबदार भागात ती नेण्यात आली आहे. हिचा प्रसार भारताचा वायव्य भाग व उत्तर प्रदेश, बंगाल, काश्मीर आणि सिंध इ. प्रदेशात विशेष आहे. पाने ८–१० सेंमी. लांब हृदयाकृती, टोकदार असतात. हिला पिवळी कक्षास्थ (बगलेतील) फुले येतात. बोंडाचे १५–२० भाग होत असून बिया अनेक व केसाळ असतात. खोडापासून मिळणारे धागे (चायना ज्यूट, टीएंट्‌सीन ज्यूट) ज्यूट किंवा मॅनिला हेंप यांपेक्षा सरस असून त्यांना कोणताही रंग देता येतो. यांचा धागा बळकट चकचकीत करडा पांढरा, जाडाभरडा असून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर ही वनस्पती पिकविली जाते. मांचुरियाचे हे व्यापारी उत्पादन असून फार वर्षांपासून तिन्‌त्सिन (चिंगमा) मधून निर्यात केले जाते. परंतु लागवड व तीपासून होणारे धाग्याचे व्यापारी उत्पादन उ. अमेरिकेत यशस्वी झाले नाही तेथे हल्ली तर कित्येक ठिकाणी ही वनस्पती एक त्रासदायक तण बनली आहे. हे पीक साधारणतः चार पाच महिन्यांत कापणीस येते त्यानंतर चारपाच दिवस तो माल पाण्यात ठेवून (कुजवून) त्यापासून धागा काढतात. तो सहज रंगविता येतो. चीनमध्ये धाग्यांचा उपयोग बुरणूस, गालिचे व कागदनिर्मिती यांकरिता करतात. या औषधाची पाने शामक, साल मूत्रल (लघवी साफ करणारी ) व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) बिया सारक व शामक असून तिचे मूळ तापावर देतात. बियांत १९% अर्धवट सुकणारे तेल असते.

पहा : ताग.

परांडेकर, शं. आ.