पिंपळ : (हिं. पीपल गु. पिपर क. अरळीगिड सं. अश्वत्थ, बोधिद्रुम इं. पीपल ट्री लॅ. फायकस रिलिजिओजा कुल-मोरेसी). हा मोठा पानझडी वृक्ष उपहिमालय प्रदेश, बंगाल व मध्य प्रदेश येथील जंगलात व इतर सर्व भारतात मंदिरे व खेड्यांच्या आसपास आढळतो ब्रह्मदेशात व श्रीलंकेतही आढळतो. हिंदू लोक याला पवित्र मानतात. वैदीक वाड्.मयात एक उपयुक्त यज्ञीय वृक्ष म्हणून याचा अनेकदा उल्लेख आढळतो बृहत्संहितेत घराच्या पश्चिमेस वृक्ष लावणे शुभ असून घरबांधणीत मात्र त्याचे लाकूड वापरू नये असे सांगितले आहे. गौतम बुध्दांचा या वृक्षाशी निकट संबंध आल्याने याला ‘ बोधी वृक्ष ’ व ‘ बोधिद्रुम ’  अशी नावे आहेत. श्रीलंकेतील अनुराधपुरचा अश्वत्थ वृक्ष सु. २,२०० वर्षापूर्वीचा आहे असे म्हणतात. याचे बी दुसर्‍या झाडांवर उगवून रोपटे अनेक वर्षे ⇨अपिवनस्पतीसारखे वाढते व पुढे स्वतंत्रपणे वाढते. याला [ वडाप्रमानेच महत्त्व असून त्याच्याशी हा समवांशीक (एकाच वंशातील) आहे. मात्र याला पारंब्या नसतात [वट कुल ⟶मोरेसी]. पिंपळाची पाने साधी, एकाआड एक, प्रकुंचीत (निमुळत्या) टोकाची, अंडाकृती, तळाशी काहीशी हृदयाकृती, लांब देठाची व लोंबती असून उपपर्णे अंडाकृती खवल्यासारखी असतात. कोवळेपणी प्रथम पाने तांबूस तपकिरी असून नंतर हिरवी होतात. कुंभासनी [⟶पुष्पबंध] फुलोरे जोडीने पानांच्या बगलेत येतात ते अवृंत (बिनदेठाचे),  गोलसर, गुळगुळीत प्रथम हिरवे असून त्यांचा व्यास सु. १.२ सेंमी. असतो. पुं-पुष्पे फार थोडी अथवा क्वचित नसतात परिदले तिन व केसरदल एक असते. गुल्मपुष्पे विपुल स्री-पुष्पे थोडी व त्यांत परिदले पाच आणि किंजपुट असतो [⟶फूल].⇨परागण कीटकांद्वारे होते [⟶अंजीर] व फळ (औदुंबरिक) जांभळे किंवा काळे आणि त्यांचे विकिरण (प्रसार) पक्ष्यांकडून होते त्यांच्या विष्टेतून पिंपळाचे बी कोठेही नेले जाते ते रूजून अत्यंत अनपेक्षित ठिकाणी झाडे उगवलेली अढळतात.

पिंपळ : पाने व फलांसह फांदीपिंपळाचे लाकूड निकृष्ट प्रकाराचे असून त्यचा उपयोग खोकी, जू, आगपेट्या पळ्या, पाळी (उथळ पसरट भांडी) इ. बनविण्याकरिता होतो जळणासही वापरतात टॅनिनामुळे साल कातडी कमविण्यास व रंगविण्यास उपयुक्त असते. सालीतील धाग्यांच्या दोर्‍या बनवितात. तुरटी व पिपळाची मुळे यांचा सुती कापड किंवा धागा रंगविण्यासाठी करतात. पांढर्‍या चिकापासून पकडण्याचा गोंद बनवितात. साल स्तभंक (आकुंचन करणारी) असून प्रमेहावर (परग्यावर) देतात. फळे सारक बी शीतक (थंडावा देणारी) व आरोग्यप्रद पाने व कोवळा पाला (प्ररोह) रेचक (पोट साफ करणारा) सालीचा फांट [⟶ औषधिकल्प] खरूज-खवडे यांवर पोटात देतात श्रीलंकेत सालीचा रस दातदुखीवर ल हिरड्यांच्या मजबुतीकरिता गुळण्या करण्यास वापरतात. कोवळ्या फांद्या दुधात उकळून साखर घालून व गाळून ते पेय म्हणून घेतात ते थंड व पौष्टिक असते.

ज्ञानसागर, वि. रा.

परोसा पिंपळ : (पारसा पिंपळ, भेंड, भेंडी वृक्ष हिं. पारस पिपल, परसिपू सं. परिश गु. पारस भिंडी क. भंगरळी, बुगरी इं.पोर्शिया ट्री, ट्यूलिप ट्री लॅ. थेस्पेशिया पॉपल्निया कुल-माल्व्हेसी). हा मध्यम आकारमानाचा सदापर्णी व जलद वाढणारा वृक्ष मूळचा आफ्रिका व आशिया येथिल उष्ण प्रदेशातील व पॅसिफिक बेटांतील असून भारतात समुद्रकिनारी (कोकण व बंगाल), ब्रह्मदेश व अंदमान बेटे येथे आढळतो. ग्रीक भाषेत थेस्पेशिया (वंशवाचक लॅटिन नाव) याचा अर्थ ‘ईश्वरी’ असा असून ते नाव देण्याचे कारण प्रसिध्द इंग्लिश समन्वेशक कॅप्टन जेम्स कुक यांनी हे झाड प्रथम ताहितीमध्ये देवळांच्या आसपास पाहिले होते.. पॉपल्निया (जातिवाचक लॅटिन नाव) हे त्या झाडाच्या ‘यूरोपीयन पॉप्लर’ च्या पानाच्या साम्यावरून दिले आहे. वानीर (पाळसा पिंपळ) यानावाने बृहत्संहितेतील वृक्षायुर्वेद अध्यायात या वृक्षाचा उल्लेख आलेला असून तो पाणथळ देशातील असल्याचे म्हटले आहे. हा वृक्ष ⇨माल्व्हेसी कुलातील (भेंडी कुलातील) एक फुलझाड असल्याने त्यची बहुतेक शारीरिक लक्षणे त्या कुलात वर्णल्याप्रमाणे आहेत. साल करडी असून जवळजवळ असलेल्या फांद्यांमुळे या वृक्षाला छत्रीसारखा आकार येतो. पाने साधी, एकाआड एक, अखंड, जाड, हृदयाकृती व प्रकुंचित फुले मोठी, ७-९ सेंमी. व्यासाची, कक्षास्थ (पानाच्या बगलेत येणारी), आकर्षक व गर्द पिवळी असून तळाशी जांभळट असतात हाच रंग पुढे विटेसारखा लाल होतो. संवर्त पेल्यासारखा व पाकळ्या टोकांशी काहीशा विभागलेल्या असून केसरदलांचा दांडा लालसर-जांभळट असतो व त्यातून किंजल्काच्या पाच शाखा डोकवतात [⟶फूल]. फळ (बोंड) गोलसर सु.४ सेंमी. व्यासाचे, कठीण व बसकट पेल्यात आधारलेले असून प्रथम हिरवे, नंतर पिंगट व शेवटी काळे दिसते ५-१५ लांबट गोल बिया फळ तडकल्यावर बाहेर पडतात. फेब्रुवारीच्या सुमारास पाने पिवळी होऊन गळू लागतात फुले साधारण वर्षभऱ येतात, पण थंडीत विशेष बहार असतो.

परोशा पिंपळाचे लाकूड कठीण असून पाण्याने खराब होत नाही. गाड्यांची चाके, खोकी, पडाव व होड्या यांस ते उपयुक्त असते. सालीतील धागे बळकट असून दोर्‍या करण्यास व पिशव्या विणण्यास चांगले असतात. सालीतील टॅनीन व लाल रंगही उपयुक्त असतो. पाने, मुळे व फळे यांचा लेप चर्मरोगावर लावण्यास चांगला असतो. साल स्तंभक असून अतिसारावर उपयुक्त मूळ शक्तिवर्धक असते.

रानभेंडी : (लॅ. थेस्पेशिया मॅक्रोफायला). हे झुडूप पारोशा पिंपळाच्या वंशातील असून आफ्रिकेतील उष्ण प्रदेशात, जावात व भारतात (कर्नाटक, सह्याद्री व कोकण) आढळते. याची उंची सु. एक मी. पर्यत असते. पाने मोठी, त्रिखंडी असून खालच्या बाजूस काळ्या प्रपिंडाचे (ग्रंथींचे) ठिपके असतात. फुले पिवळी असून प्रत्याकास पाच छिदे असतात व ती ऑगस्ट ते ऑक्टोबरात येतात.पाकळ्यांववर किरमिजी ठिपके असतात. बोंडे लहान व टोकदार असून ती तडकल्यावर ४-५ शकले होतात. लहान फांद्यांपासून चांगला धागा निघतो व तो मोळ्या बांधण्यासाठी वापरतात. पाने जनावरांना खाऊ घालतात.  

जोशी, गो. वि. 

पारोसा पिंपळ : पाने, फुले व फळ यांसह फांदी