वावडिंग : (हिं. बाबरंग, वायविडंग गु. वायवडिंग, वावडिंग क. वायुविलंग सं. विडंग इं. एंबेलिया लॅ. एंबेलिया राइब्स, कुल मिर्सिनेसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग]  हे मोठे आरोही (वर चढणारे) झुडूप भारतात सर्वत्र (विशेषतः महाराष्ट्रातील डोंगराळ भागात, दक्षिण कोकण, उत्तर कारवार, गिरसप्पा धबधब्याच्या आसपास), पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, चीन इ. देशांत आढळते. फांद्या लांब, बारीक व लवचिक असून लांब पेऱ्यावर वल्क रंध्रयुक्त (साल छिद्रे असलेली) असते. पाने साधी, एकआड एक, चिवट, दीर्घवृत्ताकृति-कुंतसम (भाल्यासारखी), वर चमकदार पण खाली फिकट रुपेरी असतात. सर्व वावडिंग : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ.पृष्ठभागावर फार लहान लालसर प्रपिंड (ग्रंथी) असतात. फुले लहान, द्विलिंगी, पंचभागी (प्रत्येक मंडलात पाच दले असलेली), केसाळ, अनेक, हिरवट पिवळी व सुगंधी असून फेब्रुवारीत विरळ शाखायुक्त परिमंजरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. मृदुफळे ३ – ४ मिमी. व्यासाची, गोलसर, गुळगुळीत, काळी व रसाळ असतात. ती मिरीसारखी दिसतात. त्यांत एकच बी असते. शुष्क फळ कृमिघ्न (कृमिनाशक), स्तंभक (आकुंचन करणारे), पौष्टिक व आरोग्य प्राप्त करून देणारे असते. फळांचा काढा ज्वरात आणि छातीच्या व त्वचेच्या रोगांवर देतात. मुळांचा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास इन्फ्ल्यूएंझाचा विकार जातो, असे नमूद आहे. फळांपासून केलेले मलम नायटा व त्यासारख्या त्वचारोगांवर लावतात. लहान मुलांना जंत झाले असता फळांचे चूर्ण मधातून देतात व उदरवायूवर फळे दुधात उकळून पाजतात. फळे मिरीत भेसळ करण्यासही वापरतात.

संदर्भ – Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. 2, New  Delhi, 1975.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.