नावळी : पानाफुलांसह फांदी

नावळी : (नदीशाक हिं. कल्मिसाग, नाली गु. नालानी भाजी सं. कलंबिका लॅ. आयपोमिया अँक्कॅटिका, आ. रेप्टॅन्स कुल – कॉन्‌व्हॉल‌्व्ह्युलेसी). ह्या एक वर्ष किंवा दोन वर्षे (क्वचित अनेक वर्षे) जगणाऱ्या ओषधीचा प्रसार भारतात सर्वत्र, शिवाय श्रीलंका, उष्ण कटिबंधीय आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे आहे. हिचे लांबच लांब खोड जाड, पोकळ व आडवे, ओलसर जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर पसरत वाढणारे असून त्याच्या पेऱ्यापासून अनेक आगंतुक मुळे फुटतात. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती, लांबट व टोकदार असतात. फुले सु. २·५ – ५ सेंमी. लांब, फिकट जांभळी व नरसाळ्यासारखी असून १ – ५ च्या झुबक्यांनी नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये येतात. फुलाच्या तळात गर्द जांभळा ठिपका असतो. फळ (बोंड) अंडाकृती, ०·८ सेंमी. लांब गुळगुळीत असून त्यात २ – ४ लवदार बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे कॉन्‌व्हॉल्‌व्हुलेसी कुलात (हरिणपदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. दुभती गुरे आणि डुकरे यांना ह्या वनस्पतीचा चारा चांगला मानवतो ती उत्तम मत्स्यखाद्यही आहे. मुळे गोडसर लागतात त्यामुळे दुष्काळात लोक खातात कोवळ्या पाल्याची भाजी करतात. तमिळनाडूत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात भाजीकरिता पिकवितात लागवडीकरीता छाट कलमे वापरतात काही आठवड्यांतच भरपूर पीक येते. खोड व पाने थंडावा देणारी असून पानांचा रस वांतिकारक (ओकाऱ्या करणारा) व रेचक असतो तो अफू व आर्सेनिक यांमुळे झालेल्या विषबाधेवर उतारा म्हणून उपयुक्त आहे. स्त्रियांच्या मानसिक आणि सर्वसाधारण दौर्बल्यावर ही वनस्पती उपयुक्त आहे आसामात ती मूळव्याधीवर देतात. कंबोडियात ताप चढून उन्माद वायू झाल्यास या वनस्पतीचे पोटीस लावतात नायट्यावर कळ्यांचा उपयोग करतात. ताज्या पानात जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सर्व वनस्पतीत ०·७६% पेक्टीन असते व सुके द्रव्य ६·९%, प्रथिने १९·६%, मेद ३·४%, कार्बोहायड्रेटे ४१·१%, चोथा २०·४% व राख १५·५% असतात.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.

Close Menu
Skip to content