मारुतिफळ : (लक्ष्मणफळ क. हनुमानफळ इं. चेरिमोयर, चेरिमोया, चिरिमोया, चेरिमोलिया लॅ. ॲनोना चेरिमोला कुल-ॲनोनेसी). सु. पाच ते आठ मी. उंच व सरळ वाढणारा हा मध्यम उंचीचा वृक्ष आहे. याच्या नैसर्गिक वाढीत याला वेड्यावाकड्या फांद्या फुटतात. पाने खालील बाजूस मखमली लवदार व वरच्या बाजूस काही प्रमाणात लोमश, अंडाकृती अथवा अडाकृति-कुंतसम (भाल्याच्या आकाराची) अथवा याउलट म्हणजे व्यस्त अंडाकृती अथवा दीर्घवर्तुळाकार, टोकाकडे विशालकोनी अथवा विशालकोनी प्रकुंचित (लांबट टोकाची) आणि तळाकडे सर्वसाधारणपणे गोलाकार असतात. फुले सुवासिक, कक्षाबाह्य (पानांच्या बगलेबाहेर), एकेकटी अथवा दोन ते तीनच्या झुबक्यांत येतात. फळे आकाराने आणि दिसण्यात एकसारखी नसातात. काही फळे शंकूच्या आकाराची अथवा हृदयाकृती असून त्यांच्या पृष्ठभागावर टेंगळे (उंचवटे) असतात. काही फळे गोल अथवा रूंद देठाकडे असलेली, अंडाकृती असून पृष्ठभागावर लहान गाठी व त्यांभोवती रंगीत वलये असतात. काही फळांचा पृष्ठभाग गुळगुळीत अथवा काहीसा खडबडीत असतो. साल पातळ, नाजूक व फिकट हिरवी असते. मगज (गर) पांढरा व बियांपासून मोकळा असतो. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲनोनेसी किंवा सीताफळ कुलात वर्णन केल्याप्रामाणे असतात.

दक्षिण आणि पश्चिम भारतात लागवडीखाली असलेल्या मारुतिफळाच्या प्रकाराला लहान ते मध्यम आकारमानाची व दिसावयास सीताफळासारखी परंतु टोकाकडे गोल व सीताफळापेक्षा जास्त गुळगुळीत साल असलेली फळे येतात.

मारुतिफळ : (१) गुळगुळीत पृष्ठभाग, (२) गाठी असलेला पृष्ठभाग.

मारुतिफळ हे मुळचे द. अमेरिकेतील पेरू देशातील उपोष्ण कटिबंधात वाढणारे फळझाड असून भारतात त्याची आयात अलीकडील काळात झाली, असे मानले जाते. सु. १,००० ते २,३०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे झाड चांगले वाढते. भारतात हे आसाम व दक्षिण भारताच्या २,००० मी. उंचीपर्यंतच्या टेकड्यांत चांगले वाढते. आंध्र प्रदेशात (विशेषतः हैद्राबादच्या आसपासच्या भागात) थोड्याफार प्रमाणात आणि महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात ते लागवडीत आहे. उत्तर भारतातील रूक्ष उन्हळ्यातील हवामान या पिकाला मानवत नाही.

या झाडाची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून किंवा सीताफळ अथवा रामफळाच्या रोपांवर डोळे भरून केलेली कलमे फार जोमदार असतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला ६ ते ७ मी. हमचौरस अंतरावर रोपे किंवा कलमे लावतात. या झाडाची लागवड सर्वसाधारणपणे सीताफळासारखी असते.

बियांपासून तयार केलेल्या झाडांना चवथ्या वर्षी फळे धरतात. सीताफळावर डोळे भरलेल्या कलमांना तिसऱ्या वर्षापासूनही फळे धरण्यास सुरूवात होते. झाडांना पहिली दोन वर्षे नियमितपणे पाणी देतात. लहान वयाच्या झाडांना आणि फळे धरणाऱ्या झाडांना दरवर्षी शेणखत देतात. मे ते सप्टेंबरच्या दरम्यान झाडांना फुले येतात. फुलांतील किंजमंडल फलनासाठी योग्य स्थितीत असताना पराग पक्व स्थितीत नसतात त्यामुळे स्वपरागमण होत नाही. नैसर्गिक परिस्थितीत फक्त २% फुलांना फळे धरतात. फलधारणेसाठी परपरागणाची जरूरी असते. [ → परागण].

ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत फळे पोसण्यासाठी दर १५ ते २० दिवसांनी झाडांना पाणी देतात. फळे डिसेंबर ते जानेवारीमध्ये तयार होतात. ती पिवळसर झाल्यावर देठासह झाडावरून काढून घेतात. १० ते १५ दिवसांत ती पिकतात. सीताफळांची बाजाराती आवक संपल्यावर मारूतिफळे बाजारात येतात. सीताफळाप्रमाणे हे फल तडकत नसल्यामुळे वाहतुकीत चांगले टिकते.


आठ ते दहा वर्षाच्या कलमी झाडाला दर वर्षी शंभरापर्यंत फळे धरतात. हाताने परागण केल्यास आणि वरखते दिल्यास फळांच्या उत्पन्नात वाढ होते.

झाडांची वाढ वेडीवाकडी होत असल्याने त्यांना योग्य आकार देण्यासाठी अयोग्य ठिकाणी असलेल्या फांद्या छाटतात. ही छाटणी पाने गळाल्यानंतर नवीन पालवी फूटण्यपूर्वी करतात. हे झाड ५०–६० वर्षे जगते.

मारूतिफळ ॲनोना प्रजातीतील सर्वोत्कृष्ट फळ मानले जाते. ते सीताफळापेक्षा आकारमानाने मोठे असते, त्यात सीताफळापेक्षा रवाळपणा कमी असतो, त्यात लोण्यासारखा आंबट मगज जास्त प्रमाणात असतो व त्याला अननसाचा स्वाद असतो. तसेच या फळात सीताफळापेक्षा पुष्कळच कमी (१० ते १५) बिया असतात. सीताफळात त्या ६० ते ७० असतात. उष्ण कटिबंधातील तीन सर्वश्रेष्ठ फळांपैकी हे एक आहे, असे काहींचे मत आहे. (मँगोस्टीन व अननस ही इतर दोन फळे होत).

मारुतिफळाची पद्धतशीर आणि मोठ्या प्रमाणावर लागवड मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅलिफोर्नियाचा दक्षिणेकडील भाग, कानेरी व हवाई बेटे आणि उत्तर अटलांटिक महासागरातील मादीरा बेटांत केलेली आढळते. मादीरा बेटात पुष्कळशा बागातून द्राक्ष पिकाऐवजी या फळझाडाची पद्धतशीर लागवड होऊ लागली आहे. झाडांना वळन देऊन ती जाळीदार कठड्यांवर वाढविण्यात येतात. खताचा पुरवठा भरपूर प्रमाणात केला जातो. निवड पद्धतीने प्रत्येकी ५ ते ७ किग्रॅ. वजनाची, उत्कृष्ट स्वादाची व कमी बिया असलेली फळे देणारे प्रकार उपलब्ध झाले आहेत.

फळातील गर लोण्यासारखा मऊ, किंचित आंबट परंतु स्वादीष्ट असतो. त्यात १८·४% शर्करा व १·८७% प्रथिन असते. गर खातात अथवा त्यापासून सरबत व इतर पेये तयार करतात.

मारुतिफळ आणि सीताफळ यांच्या नैसर्गीक संकरापासून तयार झालेल्या फळाचे इंग्रजी नाव ॲटमोया (ॲ. ॲटेमोया) असे आहे. भारताखेरीज ते फिलिपीन्स, इझ्राएल, ईजिप्त, फ्लॉरिडा (अमेरिका) आणि ईशान्य ऑस्ट्रेलियामध्ये लागवडीत आहे. भारतात ते हनुमानफळ या स्थानिक नावाने ओळखले जाते. सीताफळ ज्या हवामानात वाढते जवळजवळ तशाच प्रकारच्या हवामानात हे फळझाड वाढते. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींतही ते वाढते. या फळाचे सीताफळापेक्षा मारुतिफळाशी जास्त साम्य दिसून येते.

संदर्भ : 1. MacMillan, H. F. Tropical Planting and Gardening, London, 1956.

             2. Sigh, Ranjit. Fruits, New Delhi, 1969.

             3. Sigh, Sham Krishnamurti, S. Katyal,S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

गुप्ता, पु. कि. गोखले, वा. पु.