हीदर : एरिकेलीझ गणामधील एरिकेसी कुलातील एरिका व कॅल्यूना प्रजातीतील सदापर्णी क्षुपे. उत्तर व पश्चिम यूरोप, इंग्लंड, स्कॉटलंड ववेल्स, अमेरिका (अ. सं. सं.) व दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही क्षुपे मोठ्या प्रमाणावर आढळतात. एरिका प्रजातीत सु. ५०० जाती असून त्यातील बहुसंख्य दक्षिण आफ्रिकेत व काही भूमध्यसामुुद्रिक प्रदेशांत आढळतात. या प्रजातींत फारच थोडे वृक्ष असून इतर सर्व ३० सेंमी. उंच क्षुपे आहेत. त्यांची पाने साधी, लहान (१–३ मिमी. लांब), बिनदेठाची, त्रिधारी व प्रत्येक पेऱ्यावर ३-४ असतात. फुले फार लहान (सु. २ मिमी. व्यासाची), घंटाकृती, पांढरी, गुलाबी-जांभळट किंवा पिवळी काहीजाती कुंड्यांतून शोभेकरिता लावतात. कॅल्यूना प्रजातीतील सामान्य हीदर वा स्कॉच हीदर वा लिंग हीदर (कॅ. व्हल्गॅरिस) ही जाती सु. एक मी. उंच व शाखायुक्त असून यूरोप व आशिया मायनरमध्ये तिचा मोठ्या- प्रमाणात प्रसार झालेला आहे. पर्वतीय भागांत तिचा आढळ सस.पासूनसु. १,००० मी.पर्यंत आहे. तिची पाने लहान खवल्यासारखी व फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी असून उन्हाळ्यात मंजिऱ्यांवर येतात. इतर काही जाती बागेत लावतात. पांढऱ्या फुलाचा प्रकार क्वचित आढळणारा असून पाश्चात्त्य लोक तो सुयशाचे प्रतिक मानतात. 

 

हीदर वनस्पतीचे अनेक आर्थिक उपयोग आहेत. खोडाचा उपयोगझाडू तसेच कुंचले (ब्रश) तयार करण्यासाठी आणि टोपल्या( करंड्या) विणण्यासाठी होतो. हिच्या लाकडापासून बिछाने तयार करतात. मुळे कुजून त्यापासून तयार झालेल्या पीटाचा उपयोग इंधनासाठी होतो. तसेच आडोसा तयार करण्यासाठी देखील यांचा वापर करतात. कोवळ्या रसदार फांद्या व बिया हे तांबड्या हंसकाचे (लॅगोपस स्कॉटिकस) मुख्य खाद्य असून पिकलेल्या बिया अनेक जातींच्या पक्ष्यांचे खाद्य आहे. 

 

पहा : एरिकेलीझ पीट. 

परांडेकर, शं. आ.