बारतोंडी : (१) फुलोऱ्यासह फांदी ,(२) संयुक्त फळ, (३) फुलाचा उभा छेद .

बारतोंडी : (म. गु. हिं आक, आल, सुरंगी सं. अरयुक, अच्छुक क. ऐनशी, मड्डी, तगसे इं. इंडियन मलबेरी लॅ. मोरिंडा सिट्रिफोलिया कुल-रुबिएसी). सु. ३.६-४.५ मी. उंच व सरळ खोड असलेला हा लहान सदापर्णी वृक्ष पूर्वी सर्व भारतात लावलेला आढळत असे परंतु हल्ली बंगाल, बिहार, ओरिसा, प. किनारा व अंदमान येथील जंगलात आढळतो. ब्रह्मदेश व चीन येथेही याची लागवड केलेली नमूद आहे. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨रुबिएसीमध्ये (कदंब कुलात) याचा अंतर्भाव असून त्याच्या मोरिंडा या वंशातील फक्त आठ जाती भारतात आढळतात. याच्या एकूण ८० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात झालेला आहे. बारतोंडी वृक्षाची साल पिवळट पांढरी व गुळगुळीत असून पाने मोठी, समोरासमोर, फार लहान देठाची,चकचकीत, भडक हिरवी व साधारण दीर्घवर्तुळाकृती आणि उपपर्णे (तळाजवळची उपांगे) रुंद व अर्धगोलाकृती असतात. फुलोरा गोलसर [स्तबकासारखा⟶ पुष्पबंध कंपॉझिटी], एकाकी क्वचित दोन-तीन एकत्र, पानासमोर असून त्यावर अनेक, लहान, पांढरी, सुवासिक फुले मे-जूनमध्ये येतात ती वर पसरट आणि सुट्या पाकळ्यांची व खाली नळीसारखी असून पुष्प मुकुटाच्या कंठाशी केस व बाहेर डोकावणारी केसर दले व किंजल्क असतात [⟶ फूल]. प्रत्येक फुलापासून बनलेले अश्मगर्भी फळ (आठळीयुक्त फळ) इतरांशी पूर्णपणे जुळून वाढते व त्यात मांसल संवर्त (पुष्पकोश) सहभागी असतो  त्यामुळे सर्वांचे मिळून एक संसुक्त फळ [फलपुंज⟶ फळ] बनते ते लहान अंड्याएवढे, मऊ, चमकदार, पांढरे असून त्याचा मोसम पावसाळा असतो. फळातील अष्ठिका (लहान आठळ्या) काहीशा चपट्या व कडेने पंखयुक्त असून बिया व्यस्त अंडाकृती (तळाशी निमुळत्या व टोकाकडे गोलसर) असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रुबिएसीमध्ये वर्णिल्याप्रमाणे असतात.

बारतोंडीच्या मुळांपासून पूर्वी तांबडा रंग काढीत व त्यापासून रेशीम, कापूस किंवा लोकर यांच्या धाग्यांना लाल, पिंगट वजांभळ्या छटा देत तो रंग पक्का असतो. अलीकडे कृत्रिम रंग प्रचारात आल्यामुळे ह्या वनस्पतीचे व तिच्यापासून मिळत असलेल्या रंगाचे महत्त्व कमी झाले आहे. ह्या झाडापासून सावली मिळते व त्यावर मिरवेल चढवतात. दुष्काळात पाने व फळे खातात. एरवी जनावरांना याचा पाला खाऊ घालतात. रेशमी किड्यांनाही पानांचे खाद्य मानवते. केस स्वच्छ करण्यास फळांचा मगज (गर) वापरतात. फळांत पिवळट रंगाचे बाष्पनशील (बाष्परुपात उडून जाणारे) तेल असते. लाकूड पिंगट पिवळसर व मध्यम प्रतीचे कठीण असते ते कातीव व कापीव कामांस चांगले असून खेळणी, बश्या व तबकड्या इ. वस्तूंकरिता वापरतात.बोरतोंडीची मुळे, पाने व फळे औषधांत उपयुक्त असल्याचे आढळले आहे.मूळ विरेचक व ज्वरनाशी असून ⇨ गाऊट (सांध्यात यूरिक अम्ल साठून वेदना होणे) रोगात बाहेरून मूळ किंवा पानांचा रस लावतात. पाने पौष्टिक व तापनाशक जखमांवर बाहेरून लावण्यास ती उपयुक्त असतात. लाहन मुलांच्या अतिसारावर करपलेल्या पानांचा मोहरीबरोबर काढा करून देतात. गिनीमध्ये मुळांचा काढा ओकाऱ्या येण्यास व सारक म्हणून वापरतात पानांचा फांट [विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा ⟶ औषधिकल्प] शामक (दाह कमी करणारा), शीतकर (थंडावा देणारा), दीपक (भूक वाढविणारा) व वेदनाहारक असून शिजविलेली पाने तापात व डोकेदुखीत बाहेरून लेप लावण्यास वापरतात. कच्ची फळे भाजून मिठाबरोबर मृदू हिरड्यांना लावतात तसेच घशाचे विकार, आमांश इत्यादींवरही फळे उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

अल किंवा ऐनशी याच नावाने बारतोंडीच्या वंशातील दुसरी एक जाती (मो. टोमेंटोजा किंवा मो. टिंक्टोरिया प्रकार टोमेंटोजा) ओळखली जाते. हा सु. ४.५-६ मी. उंचीचा लहान वृक्ष उत्तर भारतात व दक्षिण द्वीपकल्पात विशेषेकरून सापडतो याची अनेक लक्षणे बारतोंडीसारखीच आहेत. याच्या सालीवर उभ्या भेगांचे जाळे असते फांद्या, देठ, पानांची पाती व फुलांचे भाग यांवर बारीक लव असते, त्यावरून जातिवाचक नाव पडले आहे. याला एप्रिल-मे मध्ये पांढऱ्या लांबट गोलसर फुलांचे स्तबक [⟶ पुष्पबंध] येतात संयुक्त फळ गोलसर व खाद्य असते. याचे लाकूड जू, फण्या, बश्या व बुंदुकीचे दस्ते इत्यादींकरिता वापरतात याच्याही मुळापासून रंग मिळतो. मो. कोरीया (मो. टिंक्टोरिया) ही जाती बारतोंडीचा जंगली प्रकार मानतात त्याचेही उपयोग बारतोंडीसारखेच करतात. मो. अंबेलॅटा ही जातीही भारतात आढळते. हिची फळे शेंदरी व फुलोरे चवरीसारखे असून फळे खाद्य व मुळे-पाने औषधी आहेत.

संदर्भ :  1. Cook, T. The Flora of the Presidency of Bombay, Vol. II, Calcutta, 1958.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.

3. Kirtikar, K. R Basu, B.D. Indian Medicinal Plants, Vol. II, Delhi, 1975.

हर्डीकर, कमला श्री. ; परांडेकर, शं. आ.