खैर : (१) फुलोऱ्यासह शाखा, (२) फुलाचा उभा छेद.

खैर : (खैर-बाभूळ हिं. कथ्था, खैर क. काचू, कग्गली मल्याळी कच्छ सं. खदिर इं. कॅटेच्यू ट्री, कच्छ ट्री लॅ. ॲकेशिया कॅटेच्यू कुललेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी).काताबद्दल सुप्रसिद्ध असलेला हा ९–१२ मी. उंच व काटेरी वृक्ष भारतात आणि पाकिस्तानात सर्वत्र कोरड्या ठिकाणी व काटेरी जंगलात आढळतो. सिंधूपासून पूर्वेस आसामपर्यंत आणि ब्रह्मदेशातील रुक्ष मैदाने वगैरे प्रदेशांतही सापडतो. बाभूळ, लाजाळू, गुलमोहोर इ. वनस्पतींच्या कुलातील [→ लेग्युमिनोजी] व शिकेकाई, बाभूळ, हिवर इत्यादींच्या वंशातील असल्याने अनेक शारीरिक लक्षणांत याचे त्यांच्याशी साम्य आहे. कोवळ्या फांद्या पिंगट व जून साल करडी पिंगट व खरबरीत उपपर्णी काटे लहान पण टोकास वाकडे पाने दोनदा विभागलेली, पिसासारखी, संयुक्त,

१०–१५ सेंमी. लांब मध्यशीर प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) दले १०–१२ जोड्या दलके (लहान दले ) असंख्य व बिनदेठाची पानांच्या बगलेत एक किंवा अनेक कणिशे आणि त्यांवर अनेक लहान, पिवळट, बिनदेठाची फुले ऑगस्ट ते सप्टेंबरात येतात. शिंबा (शेंगा) पातळ, पिंगट, सपाट (५–८ ×१-२ सेंमी.) टोकास चोचीसारखी बिया ३–१० असतात.

लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. ते तासून व रंधून गुळगुळीत होते. घराचे खांब, शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळे, घाण्याच्या लाटा, होड्या, बासरी, तलवारीच्या मुठी इ. विविध कामास उपयुक्त असते. जळणाकरिता व कोळशाकरिताही उत्तम. लालसर मध्यकाष्ठापासून (काष्ठाच्या बऱ्याच जुन्या, अधिक कठीण व मृत अशा मधील भागापासून) पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थांस कात (काळा कात) म्हणतात तो व्यापारात कॅटेच्यू या इंग्रजी नावाने प्रसिद्ध आहे [→ कात].

लाल खैर : (इं. ब्लॅक पेगू कॅटेच्यू, कच्छ लॅ. ॲकेशिया चुंद्रा, ॲ. सुंद्रा). या नावाने ओळखले जाणारे झाड हेच खैर किंवा काताचे झाड असे सामान्यतपणे समजले जाते, कारण महाराष्ट्रात हेच विशेषेकरून सापडते. हा एक खैराचाच प्रकार असून त्यातील काताचे गुणधर्म साधारणतः समान आहेत.

सोन खैर : (कामटिया क. मुगळी लॅ. ॲकेशिया सुमा). हेही एक काताकरिताच ओळखले जाणारे काटेरी झाड असून ते उ. कारवारात व द. महाराष्ट्रात ओलसर ठिकाणी सापडते यांशिवाय बंगाल, बिहार, प. भारत व श्रीलंका येथेही आढळते. उंची ५–९ मी. साल पांढरट, गुळगुळीत व पातळ तुकड्यांनी सोलली जाणारी असून तीवर गडद रंगाचे आडवे पट्टे असतात संयुक्त पानांची दले व दलके खैरापेक्षा अधिक फुले पांढरट शिंबा अधिक लांब व बिया ६–८. लाकूड कठीण, जड व टिकाऊ, गर्द पिंगट असून त्यापासून कात काढतात आणि सालीतील द्रव्य कातडी कमाविण्यासाठी वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्यामेंढ्यांना चारतात. कात औषधी आहे.

परांडेकर, शं. आ.