नरक्या ऊद : फुलोऱ्यासह फांदी

नरक्या ऊद: (लॅ. गिरोनीरा रेटिक्युलॅटा, गि. कस्पिडॅटा कुल – उल्मेसी). सु. तीस मी. पर्यंत उंच वाढणारा हा सदापर्णी व विभक्तलिंगी प्रचंड वृक्ष ब्रह्मदेश, श्रीलंका, जावा व भारत (सिक्कीम, हिमालय, आसाम, प. द्वीपकल्प, उ. कारवार) इ. प्रदेशांत आढळतो. याच्या तळाशी अनेक आधारमुळे आणि खोडावर पिंगट लालसर साल असते व तिचे पातळ तुकडे खालून वर अशा क्रमाने सुटतात. अंतर्सालीत बळकट व लांब धागे असतात. याची पाने साधी, एकाआड एक, लांबट वाटोळी (७·५–१२·५ X ४-५·५ सेंमी.) व गुळगुळीत असतात. उपपर्णे जुळलेली, केसाळ व शीघ्रपाती (लवकर गळणारी) फुले एकलिंगी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), पाच परिदलांची असून स्त्री-पुष्पे एकएकटी आणि पुं-पुष्पे शाखित वल्लरीवर [→ पुष्पबंध] नोव्हेंबर–जानेवारीत येतात केसरदले पाच व वंध्य किंज केसांच्या पुंजासारखा किंजपुट गुळगुळीत [→ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ खाद्य, गोलसर, लहान (१·८ सेंमी.), गुळगुळीत व चंचुयुक्त असते. या वृक्षाचे लाकूड पिंगट आणि बळकट असून ते तासल्यावर व रंधल्यावर गुळगुळीत व झिलईदार होते. सिक्कीममध्ये ते फळ्या आणि वासे यांकरिता वापरतात. श्रीलंकेत त्याची भुकटी लिंबाच्या रसातून खरूज व पुरळ या त्वचारोगांवर लावतात आणि लाकूड लिंबाच्या रसात उगाळून पोटात देतात त्यामुळे रक्तशुद्धी होते भुकटीची धुरीही देतात. पाने गुरांना खाऊ घालतात.

पहा : अर्टिकेसी.

ज्ञानसागर, वि. रा.