तिमरू : (टेंबुर्णी, हिं. लोहारी, तेंडू क. बळकुनिकी, गोइंदु इं. मौंटन पर्सिमॉन लॅ. डायोस्पिरॉस माँटॅना कुल–एबेनेसी). सु. ६–९ मी. उंच वाढणाऱ्या या पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात सर्वत्र असून श्रीलंका, मलाया व ऑस्ट्रेलियातील उष्ण प्रदेश येथेही तो आढळतो. उत्तर कारवारात सामान्य आहे. साल पातळ, करडी, खरबरीत व ढलप्यांनी सोलून निघणारी असून तीवर साधे किंवा शाखित काटे असतात. कोवळ्या फांद्या लवदार व पाने विविधाकृती, एकाआड एक, अंडाकृती–लांबट, दीर्घवृत्ताकृती, विशालकोनी व तळाशी हृदयाकृती फुले विभक्त लिंगी, लहान, हिरवट पांढरी, चतुर्भागी असून फेब्रुवारी–एप्रिलमध्ये  येतात. पुं–पुष्पे वल्लरीवर व स्त्री–पुष्पे एकेकटी असतात [→ फूल]. मृदुफळ गोलसर, लालसर पिंगट व कडू असून त्यातील चिकट गरात दोन ते आठ बिया असतात इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ एबेनेसी  अथवा टेंबुर्णी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ विषारी असून गळवावर बाहेरून लावतात चुरलेली पाने व फळे माशांना आकृष्ट करण्यास वापरतात. लाकूड करडे व त्यावर पिवळी किंवा भुरी झाक असते. ते मऊ अथवा साधारण कठीण, टिकाऊ व जड असते. ते जळणास चांगले परंतु किरकोळ लहान वस्तु, कोरीव काम, आगपेट्या व आगकाड्या, गाड्या व शेतीची अवजारे, तराफे इत्यादींसही उपयुक्त असते.

पहा : अबनूस टेंबुर्णी तेंडू.

जमदाडे, ज. वि.