कासूद : (काशिंदा इं. सयामीज कॅसिया, जूवार लॅ. कॅसिया सयामिया कुल-लेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). रस्त्यांच्या दुतर्फा व बागेतून शोभेकरिता व सामान्यपणे सावलीकरिता लावण्यात येणारा हा जाडजूड, जलद वाढणारा, पण मध्यम आकाराचा व ९—१८ मी. उंच शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, भारत (फक्त दक्षिणेत) इ.देशांत निसर्गतः आढळतो महाराष्ट्रात फक्त लागवडीत दिसतो. याची सामान्य शारीरिक लक्षणे बाहवा, तरवड व टाकळा यांसारखी आहेत  [→लेग्युमिनोजी] . साल करडी, गुळगुळीत, काहीशी भेगाळ पाने संयुक्त,  पिसासारखी व १५—३० सेंमी. लांब दले ६—१४ जोड्या, फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत, सप्टेंबर–एप्रिलमध्ये परिमंजऱ्यांवर पिवळी फुले येतात. शेंग सु.३० सेंमी. लांब, सरळ, पिंगट, अरुंद, चपटी व अनेकबीजी असते. बिया पिंगट व गुळगुळीत. केसरदले (पुंकेसर) भिन्न लांबीची व काही वंध्य असतात  [→फूल] . लाकूड कठीण, जड, टिकाऊ, मजबूत व काळपट असल्याने त्याच्यापासून सजावटी सामान, कपाटे, हातातील काठ्या, खांब, तुळया, हत्यारांचे दांडे, ठोकणी इ. वस्तू बनवितात. साल व शेंगांपासून टॅनीन मिळते, फुले भाजीकरिता आणि पाने खताकरिता उपयुक्त असून झाड लाखेचे किडे वाढविण्यास उपयुक्त आहे.

पहा : टाकळा तरवड बाहवा.

परांडेकर, शं.आ.

कासूद : (१) पान,(२) फूल, (३) शिंवा.