कल्होणी : (कवशी, कौशी क. हैगा, उण्णी इं. होपिया लॅ. होपिया वाइटियाना कुल-डिप्टेरोकार्पेसी). हा मध्यम ते मोठ्या आकाराचा वृक्ष भारतात पश्चिम द्वीपकल्पातील सदापर्णी जंगलात कोकणापासून दक्षिणेपर्यंत आणि तमिळनाडू राज्यात आढळतो तसेच उत्तर कारवारच्या घाटातील नद्यांच्या व नाल्यांच्या कडेनेही आढळतो. कोवळ्या फांद्या लवदार जून खोडावरची साल गुळगुळीत असून तिचेचौकोनी तुकडे निघतात. अंतर्साल पांढरी किंवा पिवळट. पाने साधी, सोपपर्ण (उपपर्णांसह) व एकाआड एक, आयत-कुंतसम (भाल्यासारखी), गुळगुळीत, शिरा तिरप्या, देठ लवदार. फुले गुलाबी, दोन सेंमी. व्यासाची, सच्छद, एक ते सहा किंवा बहुधा तीन एकत्र असून अकुंठित, कक्षास्थ (बगलेतील) परिमंजरीवर मार्च–जूनमध्ये येतात [→ पुष्पबंध फूल]. फळे अंडाकृती, सपक्ष, किरमीजी असून उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात येतात. रोगामुळे फुलोऱ्याचे रूपांतर स्पॅनिश चेस्टनटाप्रमाणे गोलसर काटेरी गोळ्यात होते.

लाकूड लालसर तपकिरी व त्यात पांढऱ्या रेषा असे असून कठीण, गुळगुळीत, जड, बळकट व टिकाऊ असते. त्याचा उपयोग बांधकाम, गाडीची चाके, जडावाचे आणि कातीव काम इत्यादींकरिता होतो. ते चांगले इंधन आहे. कारवारात मंदिरे बांधण्याकरिताही त्याचा वापर करतात.

पहा : डिप्टेरोकार्पेसी.

जमदाडे, ज. वि.