त्रिपंखी : (१) वनस्पतीची फांदी, (२) फळ, (३) फळाचा आडवा छेद, (४) फळ तडकून झालेली चार शकले, (५) बी.

त्रिपंखी : (सं. त्रिपक्षी हिं. त्रिपुंखी इ. ट्रेलिंग कोल्डेनिया लॅ. कोल्डेनिया प्रोकम्बेन्स कुल–बोरॅजिनेसी). ओलसर जमिनीवर पसरून वाढणारी ही अनेक फांद्यांची व एक वर्षभर जगणारी ⇨ ओषधी भारतात सर्वत्र, श्रीलंका व इतर अनेक उष्ण देशांत तणासारखी आढळते. कोवळे खोड व फांद्या लवदार असून पांढरट दिसतात. हिची पाने लहान (१·३–३·८ X ०·६ सेंमी.), एकाआड एक, तळाशी निमुळती असून पानांची किनार (कडा) काहीशी विभागलेली, बोथट दात्यांची व टोकास गोलसर असते त्यांच्या दोन्ही बाजूंस दाट पांढरट लव असते. हिला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये लहान, पांढरी किंवा फिकट पिवळी फार लहान देठांची फुले पानांच्या बगलेत एकेकटी येतात. संदले जुळलेली प्रदले व केसरदले प्रत्येकी चार असून किंजपुट किंचित चतुष्खंडी (चार भागी) व त्यात चार बीजके असतात [⟶ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) पण शुष्क फळ फार लहान (३ X ४ मिमी.) असून त्यावर दोन फुगीर रेषा व दोन खोलगट रेषा असतात ते तडकल्यावर चार शकले होतात बिया चार असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे भोकर कुलात [⟶ बोरॅजिनेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. ताजी पाने वाटून संधिवातातील सुजेवर लावतात. फोड व गळवे पिकण्यासाठी मेथीचे चूर्ण गरम करून या सुक्या वनस्पतीसह समभाग लावतात. या वनस्पतीचा अंतर्भाव एहरेशिएसी या कुलात काही वनस्पतीवैज्ञानिक (सांतापाव) करतात तिच्या वंशातील २०–२४ जातींपैकी भारतात ही एकच आढळते.

परांडेकर, शं. आ.