माका : (अ) फुलोऱ्यांसह फांदी (आ) फुलोरा (स्तबक) : (१) किरण-पुष्पके, (२) बिंब-पुष्पके (इ) फळांसह अपक्व गुच्छ.माका : (हिं. भांगरा गु. काळो भांगरो क. गर्गडासोप्पू सं. पितृप्रिया, भृंगराज, केशरंजक लॅ. एक्लिप्टा आल्बा, ए. इरेक्टा कुल-कंपॉझिटी). ही लहान ओषधीय वनस्पती [⟶ ओषधि] ओलसर जागी, भारतात सु. १,८६० मी. उंचीपर्यंत सर्वत्र आणि ब्रह्मदेश, श्रीलंका, मलेशिया व पाकिस्तान या देशांत आढळते. खोड व फांद्या उभ्या किंवा काहीशा झुकलेल्या व केसाळ असून कधीकधी त्यांच्या पेऱ्यांपासून मुळे फुटलेली असतात खोड व फांद्यांची लांबी सु. ३० सेंमी. पेक्षा जास्त नसते. पाने साधी, समोरासमोर, बिनदेठाची व लांबट भाल्यासारखी असतात. फुले पांढरी, लहान व स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात [⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकांस ऑक्टोबर ते डिसेंबरात येतात. स्तबकातील किरण-पुष्पके (परिघावरची फुले) स्त्रीलिंगी, वंध्य किंवा अवंध्य (जननक्षम) व जिव्हिकाकृती (जिभेसारखी) आणि बिंब-पुष्पके (मध्यभागी असलेली फुले) उभयलिंगी व नलिकाकृती असतात [⟶ फूल]. फळे संकृत्स्न (शुष्क व एकबीजी), चपटी व पंखधारी. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी वा सूर्यफूल कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

वेडेलिया चायनेन्सिस (वे. कॅलेंड्युलॅसिया) ह्या माक्यासारख्या दिसणाऱ्या जातीस ‘पिवळा माका’ म्हणतात. माका हे नाव सीसुलिया ॲक्सिलॅरिस या फिकट निळसर फुलांच्या पण माक्याच्या कुलातील दलदलीत वाढणाऱ्या ओषधीस दिलेले आढळते तिला ‘काळा माका’ असे म्हणतात आणि प्रथम वर्णिलेल्या वनस्पतीस ‘पांढरा माका’ म्हणतात. अलाका (भृंगराज) या नावाने माक्याच्या केशवृद्धीच्या गुणाच्या संदर्भातील उल्लेख अथर्ववेदाच्या कौशिकसूत्रात आला आहे. बाराव्या शतकातील सोढल निघंटू ह्या आयुर्वेदीय ग्रंथातही भृंगराजाचा उल्लेख आहे बौद्ध भिक्षूने तिसऱ्या शतकात रचलेल्या नावनीतक ग्रंथात केशरंजनात वापरावयाच्या अनेक द्रव्यांत भृंगराजाचा समावेश केलेला आढळतो.

माका यकृत व प्लीहा यांच्या वाढीवर व त्वचारोगावर देतात. कारण ही वनस्पती रेचक व पौष्टिक आहे. माक्याचा रस मिरपूड घालून दह्याबरोबर घेतल्यास काविळीवर गुणकारी असतो. लहान मुलांना मधाबरोबर पडशावर देतात. मूळव्याधीवर माक्याचा रस देतात. तिळेलात व खोबरेलात माक्याचा पाला (किंवा रस) उकळून केसांच्या वाढीकरिता व त्यांना काळेपणा आणण्यास वापरतात. माका उष्ण, कडू, रुक्ष व वेदनाशामक असून दातदुखीवर हिरड्यांना चोळतात व डोकेदुखीवर डोक्यास चोळतात. भाजल्यावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लावल्यास आग कमी होते व डाग राहत नाही. हत्तीरोगावर (हत्तीच्या पायाप्रमाणे पायावर आलेल्या सुजेवर) तिळेलात उकळलेला रस लावतात. माक्याचे मूळ वांतिकारक (ओकारी आणणारे) व विरेचक (पोट साफ करणारे) असते. माणसांच्या व जनावरांच्या जखमांवर बाहेरून लेप लावण्यास माका चांगला असतो. चीनमध्ये रक्तस्त्राव थांबविण्यास माका वापरतात. हिंदू लोक श्राद्ध-पक्षाच्या विधीत, पूजेत माका वापरतात त्यावरून ‘पितृप्रिया’ हे संस्कृत नाव आले असावे. जावामध्ये कोवळ्या भागांची भाजी करतात. भारतात कोणी चटणी करतात. गोंदण्यामध्ये खोडाचा व पानांचा रस वापरतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials. Vol. III, New Delhi, 1959.

           २. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७०.  

           ३. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.