घोगर : (गोगर्ली, पापुर, पांडरू हिं. पाप्रा क. कळकंबी इं. इंडियन बॉक्सवुड, गार्डेनिया लॅ.गार्डेनिया लॅटिफोलिया कुल रूबिएसी). हा सु. ३–५ मी. उंच व ०·९–१.२ मी. घेर असलेला लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात सर्वत्र शुष्क जंगलात आढळतो. फांद्या ताठर व सरळ पसरलेल्या असून वृक्षाचा माथा गोलाकार असतो. साल गुळगुळीत व फिकट करडी असून तिचे गोलसर तुकडे निघून जातात. कोवळे भाग गुळगुळीत व राळेसारख्या पदार्थाने झाकलेले असतात. फांद्यांच्या टोकास गर्दीने वाढणारी बिनदेठाची साधी पाने १०—२० × ६·१५ सेंमी., टोकाशी गोलसर, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून हिरवी पण खालून फिकट, संमुख (समोरासमोर) किंवा प्रत्येक पेऱ्यावर तीन असतात.  घोगर : फळासह फांदीउपपर्णे मोठी, तळाशी देठाबरोबर सांधलेली, नळीसारखी व कोवळ्या कळ्यांभोवती प्रथम वेढलेली दिसतात. फुले एकाकी, क्वचित जोडीने असून ती पाच ते सात सेंमी. लांबीची, प्रथम पांढरी, सुवासिक व नंतर पिवळी होतात. मार्च–मेमध्ये बहर असतो. संवर्तनलिका लवदार व तोंडाशी पसरट पुष्पमुकुटनलिका अधिक लांब, सरळ व बाहेर लवदार [⟶ फूल] दोन्ही मंडलांत दले पाच ते नऊ असून मृदुफळ फिकट हिरवे, गोलसर, खाद्य व लहान लिंबाएवढे असते त्याच्या टोकास सतत संवर्त असतो व बाह्यकवचावर खाचा असतात. बिया लहान, अनेक, चपट्या, फिकट तपकिरी व जांभळट मगजाने (गराने) वेढलेल्या असतात. इतर सामान्य लक्षणे  ⇨ रूबिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. याचे लाकूड पिवळट तपकिरी, कठीण, बळकट, टिकाऊ व जड असून कोरीव व कातीव कामास उत्तम असते उदा., फण्या, खेळणी, आखण्या, धोटे, खाटा इत्यादि. ⇨ डिकेमालीसारखा पदार्थ अल्प प्रमाणात या वनस्पतीतही मिळतो. पाला गुरांना खाऊ घालतात झाडे कुंपणाच्या कडेने लावतात.

खुरफेंद्रा : (लॅ. गार्डेनिया टर्जिडा). ह्या नावाचा लहान वृक्ष घोगरच्या वंशातील एक जाती असल्याने अनेक लक्षणांत दोहोंत साम्य आढळते. हा ब्रह्मदेशात व भारतात सर्वत्र आढळतो. फांद्यांवर कठीण व उभे, सरळ काटे असतात. पाने घोगरपेक्षा लहान, आयत, वरून गुळगुळीत पण खालून लवदार उपपर्णे त्रिकोनी व लवकर गळणारी फुले पांढरी असून कोवळ्या व पाने नसणाऱ्या फांद्यांवर एप्रिल-जूनमध्ये येतात. ती एकलिंगी असून पुं-पुष्पाचे गुच्छ असतात, परंतु स्त्रीपुष्पे एकाकी येतात. फळे अनेकबीजी, लांबट गोल, घोगरपेक्षा मोठी, करडी हिरवी व साधारण टोकदार असतात. लाकूड सर्वसाधारणपणे घोगरप्रमाणे असून त्याऐवजी वापरतात. मुळांपासून केलेले औषध अपचनावर लहान मुलांना देतात. कुटलेल्या मुळांचा फेस असह्य. डोकेदुखीत कपाळावर लावून हाताने हलकेच थापत राहिल्यास डोकेदुखी थांबते. फळे खाद्य असून स्तनाच्या विकारावर उपयुक्त असतात. या झाडांपासून सुवासिक गोंद मिळतो त्यात चाळीस टक्के मॅनिटॉल असते.

हर्डीकर, कमला श्री.