शिवलिंगी : [कवदोदी, कवोदी हिं. घरनारु, गरगुमारु क. मानिंगन बळ्ळी गु. शिवलिंगी सं. अपस्तंभिनी, बहुपत्रा, लिंगजा, शिववल्ली लॅ. डिप्लोसायक्लॉस पामेटस, ब्रायोनिया (ब्रायोनॉप्सिस) लॅसिनिओजा कुल-कुकर्बिटेसी]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] काकडी व भोपळा इत्यादींच्या कुलातील ही वर्षायू वेल मॉरिशस, उष्णकटिबंधीय आफ्रिका, मलाया, श्रीलंका, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया व भारतात आढळते. भारतात तिचा प्रसार सर्वत्र शेतांच्या कडेने कुंपणावर झालेला असतो. डिप्लोसायक्लॉस या प्रजातीतील एकूण पाच जातींपैकी ही एकच भारतात आढळते.

शिवलिंगी (ब्रायोनिया लॅसिनिओजा) : पाने व फुले यांसह फांदी.

शिवलिंगीचे खोड गुळगुळीत असून त्यावर खोलगट रेषा व पुष्क़ळ फांद्या असतात. ताणे (तणावे) बारीक व दुभंगलेले आणि पाने साधी, १०–१५ सेंमी. लांब व रुंद, पातळ, वरून हिरवी व खरखरीत, खालून फिकट व गुळगुळीत, ५–७ खंडित व तळाशी ह्रदयाकृती असतात. त्यांची किनार काहीशी दातेरी व तरंगित असते. फुले एकलिंगी असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतात. पुं-पुष्पे पिवळी व घंटेसारखी, ३–६ च्या झुपक्यांनी येतात. स्त्री-पुष्पे बहुधा एकएकटीच येतात. अनेक बीजी मृदुफळ १·३–२·५ सेंमी व्यासाचे, गोलसर, मांसल, गुळगुळीत व निळसर हिरवे असून त्यावर पांढऱ्या उभ्या व रुंदट रेषा असतात. बिया अनेक, पिवळट तपकिरी, ०·५-०·६ सेंमी. लांब व शिवलिंगाच्या आकाराच्या असल्याने त्याला शोभेसे नाव या वनस्पतीला पडले आहे.

शिवलिंगीला उग्र वास येतो व ती कडू, तिखट, पौष्टिक, आरोग्य-पुनःस्थापक असते. ज्वरात व उदरवायूवर ती गुणकारी असते. पित्तप्रकोप व पित्तज्वरात तिचा रस दुधाबरोबर देतात. त्यामुळे पोट साफ होते. दाहावर पाने बाहेरून लावतात.

पहा : कुकर्बिटेसी.

परांडेकर, शं. आ.