मध्यवनस्पति : (लॅ.मेसोफाइटस मेसोफायटा). हवेतील आर्द्रता (ओलावा) व जमिनीतील पाणी या संदर्भात ⇨जल वनस्पती व ⇨मरूवनस्पती (रूक्ष व पाणथळ प्रदेशांतील वनस्पती ) या दोहोंमध्ये ह्या वनस्पतिसमूहाचे स्थान असते. वाजवीपेक्षा कमी किंवा जास्त असे पाण्याचे प्रमाण यांच्या अधिवासात (नैसर्गिक वसतिस्थानात) नसते. असल्यास ते फारच अल्पकाल असते .त्याच्याशी समरस होण्यास विशेष प्रकारच्या अनुयोजना (जुळवून घेण्याच्या यंत्रणा) त्यांच्या संरचनेत सहसा नसतात. हवेतील आर्द्रता व जमिनीतील पाणी मुळांची नित्य शोषणक्रिया व बाष्पोच्छवास (त्वचेतील सूक्ष्म छिद्राद्वारे जलबाष्प बाहेर टाकण्याची प्रक्रिया ) या प्रक्रियांना कोणताही अडथळा करीत नाहीत. इतकेच नव्हे , तर या प्रक्रिया सतत चांगल्या चालू राहिल्यामुळे मध्यवनस्पतींची वाढ फार चांगली होते. मुळांचा विस्तार भरपूर होऊन त्यांवर विपुल केस असतात. पाने द्वापार्श्व (वरचा व खालचा असे दोन पृष्ठभाग असलेली) बहुधा मोठी, केशहीन व पातळ असून ती गर्द हिरवी असतात. त्यांवर पातळ ⇨उपत्वचा (क्युटिन या चरबीसारख्या पदार्थाचा थर) व भरपूर ⇨त्वगंध्रे (सूक्ष्म छिद्रे) असतात. मात्र पानांच्या खालच्या पृष्ठभागावर उपत्वचेचा अभाव व त्वग्रंध्रांची संख्या अधिक असते. झाडांवर काटे बहुधा नसतात. या वनस्पतींपैकी काही सावलीत तर काही भरपूर सूर्यप्रकाशात वाढतात. त्यांना अनुक्रमे छाया प्रिय आणि प्रकाशप्रिय म्हणतात. त्यांच्या लक्षणांत काही फरक आढळतात व त्यांचा संबंध कमीजास्त बाष्पोच्छवास व ⇨प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशात हरितद्रव्याच्या मदतीने कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्या पासून साधी कार्बोहायड्रेटे बनविण्याची प्रक्रिया) या प्रक्रियांशी असतो. [⟶ वनस्पति व पाणी ] सौम्य हिवाळआ व उन्हाळा आणि सर्वसाधारण सर्व ऋतूंत जमिनीत भरपूर ओलावा ज्या प्रदेशात उपलब्ध होतो, तेथे मध्यवनस्पतींची संख्या मोठी असते. व त्यांचे समावास (विशिष्ट प्रकारचे समूह) आढळतात. परिस्थितीत, विशेषतः हवामानात अथवा जमिनीत, काही अनुकूल फरक होत गेल्यास मरूवनस्तींच्या लक्षणात हळूहळू फरक पडत जाऊन त्यांना मध्यवनस्पतींचे स्वरूप प्राप्त होते, तसेच जलवनस्पतींच्या आसमंतातील पाणी कमी होत गेल्यास त्यांचेही कालांतराने मध्यवनस्पतींत रूपांतर होते. मध्यवनस्पतीत ⇨ औषधी, क्षुपे (झुडपे) वृक्ष व वेली हे सर्व प्रकार आढळतात. त्यांचा शाखाविस्तारही बराच असतो . सूर्यफूल जास्वंद, आंबा, मधुमालती, तगर ही मध्यवनस्पतींची उदाहरणे होत. उष्ण कटिबंधातील मोसमी जंगलात त्याची संख्या व प्रकार सर्वात जास्त आढळतात. बहुसंख्य जाती आवृत्तीबीजीपैकी (फुलझाडांपैकी) असतात.

शुष्कार्द्र वनस्पती : (लॅ. ट्रोपोफाइटस ट्रोपोफायटा). सर्वच वर्षभर अनुकूल परिस्थिती असलेले काही थोडे प्रदेश (उष्ण कटिबंधातील सदापर्णी मोसमी जंगले) सोडले, तर इतरत्र कित्येक प्रदेशांतील हवामानात स्पष्ट आवर्तिता (आळीपाळीने होणारा ऋतूपालट) आढळते. तेथे वर्षाच्या काही ऋतूंत पुरेसा ओलावा असतो. तथापि उरलेल्या काळात कमीजास्त प्रमाणात रूक्षता आढळते. या दोन्ही कालखंडाचे एकांकरण (एकानंतर दुसरे व त्यानंतर पुन्हा पहिले असा क्रम असणे) होते. साहजिकच अशा प्रदेशांतील वनस्पतींत वाढीव प्रमाण ऋतूमानाप्रमाणेच बदलते. इतकेच नव्हे तर सापेक्षतः प्रतिकूल कालखंडात शरीरनाश वाचवून फक्त जिवंत राहणे हे उद्दिष्ट साध्य केले जाते. याचा परिणाम असा होतो की ,दोन कालखंडात वनस्पतींचे स्वरूप भिन्न असते. या प्रकारच्या वनस्पतींना शुष्कार्द्र वनस्पती असे नाव आहे. त्या एका ऋतूत आर्द्रप्रिय वनस्पतीप्रमाणे [जमिनीत व हवेत सर्व ऋतूंत अतिशय ओलावा असलेल्या स्थानांत वाढणार्याप (उदा. शेवाळी ,अळू इ.) वनस्पतीप्रमाणे ], तर इतर ऋतूंत मरूवनस्पतीप्रमाणे असतात.

शुष्क ऋतूत यांची पाने गळून पडतात. कित्येक ओषधीचा जमिनीवरचा सर्व भाग नाश पावून फक्त भूमिस्थित (जमिनीतील) मध्योतक अवयवांच्या आधारे [उदा. ग्रंथिक्षोड, मूलक्षोड, कंद, दृढकंद, ग्रंथिल मुळे इत्यादी ,⟶ खोड, मूळ-२] त्या जगतात. काहींत फक्त जमिनीवरची पाने गुच्झाकृती असतात. सर्व काष्ठयुक्त वनस्पतींची [⟶ क्षुप वृक्ष महालता] पाने गळतात.पुढे अनुकूल हवामानात नवीन पालवी येते .काही काष्ठयुक्त वनस्पतींची पाने आर्द्रप्रिय पण अक्ष व कळ्या रूक्षतानुकूलित असतात. खोडावरच्या जाड ⇨अपित्वाचा (सर्वात बाहेरचा कोशिकांचा –पेशींचा –थर) व उपत्वचा यांपासून रूक्ष ऋतूंत संरक्षण मिळते. काहींची पाने गळत नाहीत. ती चिरहरित (सदा हिरवी) असतात. ती जाड उपत्वचा व अपित्वचा यांमुळे रूक्षतानुकूलित असतात. ब्रम्हदेशातील सागाची वने पानझडी प्रकारची आहेत. मरूप्रदेश, तृणसंघात (स्टेपस) व रूक्षवन (सॅव्हना) येथे रूक्षकाल अनेक महिने असून बाष्पीभवनापासून जीवनाशाचा धोका नेहमी असतो. समशीतोष्ण प्रदेशांत हिवाळ्यात शरीर गोठून जाण्याची भीती तर असतेच. शिवाय गोठलेल्या जमिनीतून पाणी शोषून घेणे कठीण गेल्याने रूक्षतेशी मुकाबला करावा लागतो. तेथे शंकुमंतासारखी [⟶ कॉनिफेरेलीझ] झाडे लघुपर्णी (फार लहान पानांची) असल्यामुळे जगू शकतात. इतरांची पाने हिवाळ्यात झडल्यामुळे शरीर खराट्यासारखे दिसते. कळ्यांचे अनेक प्रकारे (उदा. खवले, पर्णतले, उपपर्ण, झडलेली पाने, बर्फ, मातीचा थर यांच्या साहाय्याने) संरक्षण केले जाते. या खवल्यांवर लव, बुचासारखा पदार्थ (सुबेरिन), गळ (रेझीन), डिंक, पिच्छिल (चिकट) द्रव्य इत्यादींचा थर असतो. उच्च आल्पी दक्षिण ध्रुवीय व उत्तर ध्रुवीय व उत्तर ध्रुवीय प्रदेशांत वाढणाऱ्या उशीसारख्या (अँझोरेला सेलॅगो) मरूवनस्पतींत पृष्ठभागातच अंतिम पानांचा थर असतो. अनुकूल परिस्थितीत सुप्त कलिकांपासून नवीन प्ररोहाची (अंकुराची) वाढ होण्यास त्या कलिका ज्या अवयवांवर असतात त्यांतून (उदा. मूलक्षोड, कंद, ग्रंथिलमुळे इत्यादीतून) अन्नपुरवठा होतो.शुष्कार्द्र वनस्पतींत सर्व पानझडी वृक्ष व झुडपे, अनेक द्विवर्षायू (दोन हंगामांत जीवनक्रम पूर्ण होणारी उदा. मुळा, गाजर, कांदा, बटाट, डेलिया इ.) व काही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी उदा. काही नेचे, ऑर्किडे, गवते, लव्हाळे इ. ) वनस्पतींचा समावेश करतात.

पहा : कळी ,खोड, जलवनस्पति, परिस्थितिविज्ञान, मरूवनस्पति ,मूळ-२.

परांडेकर, शं. आ.