ॲरॉकॅरिया : प्रकटबीज वनस्पतींपैकी ⇨कॉनिफेरेलीझ म्हणजे शंकुमंत गणातील ॲरॉकॅरिएसी कुलातॲगॅथीस व ॲरॉकॅरिया या दोन वंशांचा समावेश होतो. ॲगॅथीसच्या सु. वीस ॲरॉकॅरियाच्या बारा जाती असून त्या सर्वच दक्षिण गोलार्धात पसरल्या आहेत. या जातींतील बहुतेक सर्व घटक मोठे (१५–४५ मी.), सदापर्णी, बहुवर्षायू (पुष्कळ वर्ष जगणारे), शाखायुक्त वृक्ष असून त्यांना एकाआड एक, साधी, लहान व अनुपपर्ण पाने असतात [→ पान]. पुं-शंकूवर ४-१९ परागकोश स्त्री-शंकू मोठे बीजक अधोमुख व शल्कावर (खवल्यावर) एकाकी असते. ॲगॅथीसपासून ‘कोपल’ नावाच्या रोगणास उपयुक्त रेझीन मिळते.ॲरॉकॅरियाच्या अनेक जातींची अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर (विशेषतः कॅलिफोर्नियात) व दक्षिण फ्लॉरिडात लागवड केली आहे. दक्षिण चिलीतील ‘ॲरॉको’ भागात प्रथम आढळले म्हणून हे वंशवाचक लॅटिन नाव दिले आहे. ब्राझील, फीनिक्स बेटे व ऑस्ट्रेलिया येथेही याचा प्रसार आहे. हल्ली याच्या अनेक जाती बहुत्रा सर्वत्र व विशेष काळजी घेऊन शोभेसाठी बागेत लाविलेल्या आढळतात. भारतातील बागांत पाच जाती सामान्यत: दिसतात. नॉरफॉक आयलंड पाइन (ॲ. एक्सेल्सा) चे झाड लहान असताना घरात मोठ्या कुंडीत लावून ठेवता येते.

   त्रिकोणी आकृती व एकावर एक फांद्यांची मंडले  यांमुळे विशेष शोभा दिसते याची पाने कठीण, चपटी व टोकदार खवल्यासारखी असतात. ‘मोरेटन बे पाइन’ ‘बन्या बन्यापाइन’ व ‘पराना पाइन’ या सर्व जाती भारतातील बागांत आढळतात. ⇨चिली पाइन (मंकी पझल) याच वंशातील आहे. याच्या व बन्या बन्या पाइनच्या बिया खाद्य आहेत.

नॉरफॉक आयलंड पाइन. (१) कुंडीत लावलेले झाड, (२) फांदी.पहा : कॉनिफेरेलीझ कौरी.

ॲरॉकॅराइट्स : कॉनिफेरेलीझमधील ॲरॉकॅरिया ह्या वंशातील आजच्या वृक्ष-जातींसारख्या वृक्षांच्या डहाळ्या, पाने, शंकू व शंकूतील खवले (शंकु-शल्क) इत्यादींचे प्राचीन अवशेष (जीवाश्म) अनेक देशांत आढळतात. सर्वांत जुने जीवाश्म फ्रान्सच्या पर्मियन कल्पातील (सु. २७·५-२४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत आढळतात. ते त्या कालातील ॲरॉकॅरियाच्या वंशातील वृक्षांच्या शंकु-शल्कांचे आहेत. ते रुंदट त्रिकोणी असून त्यांच्या प्रत्येक खवल्याच्या पृष्ठभागावर तुटून पडलेल्या बीजाचा एक किण (वण) आढळतो. ट्रायासिक व जुरासिक कल्पांतही (सु. २३ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातही)ॲरॉकॅराइट्स वंशातल्या वृक्षांच्या शंकूंचे व शंकु-शल्कांचे जीवाश्म आढळतात. मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) उ. अमेरिकेच्या मध्यभागातही ॲरॉकॅरिएसी कुलातील अनेक वंश व जाती पसरल्या होत्या. न्यू जर्सीच्या क्रिटेशस कल्पातील (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत काही लंबगोल व अंडाकृती पानांच्या वंध्य फांद्यांच्या जीवाश्मांना हॉलिक यांनी ॲरॉकॅराइट्स ओव्हॅटस हे नाव दिले आहे. वायोमिंगच्या उ. क्रिटेशस कालीन खडकांत . हॅचेराय या जातीचे जीवाश्म आढळतात.

ॲरॉकॅरिओझायलॉन (ट्रायासिक कल्प) हे नाव ॲरॉकॅरिया  वंशातील जातींच्या काष्ठांच्या जीवाश्मांना दिले जाते. मध्यजीव महाकल्पातील व तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील)⇨कॉर्डाइटेलीझसारख्या द्वितीयक ⇨प्रकाष्ठाच्या तुकड्यांच्या काष्ठ-जीवाश्मांना ॲरॉकॅरिओझायलॉन हे वंश-नाम दिले जाते. ॲरॉकॅरिओझायलॉन ॲरिझोनिकम या जातीच्या जीवाश्मी ओंडक्यांची लांबी ३१ मी. व व्यास सु. १ मीटरपर्यंत भरतो. भारतातील गोंडवनी खडकांत ॲरॉकॅराइट्सच्या काही जातींचे जीवाश्म आढळतात.

पहा : कॉर्डाइटेलीझ.

परांडेकर, शं. आ.