गांजा :(भांग हिं. भंग गु. गांजो क. बंगी सं. हर्षिनी, शिवप्रिया, विजया, गंजा इं. इंडियन हेंप, ट्रू हेंप लॅ. कॅनाबिस सॅटिव्हा, कुल- कॅनाबिनेसी). हे साधारणपणे १·५ मी. उंच, सरळ वाढणारे, वर्षायू (एक वर्ष जगणारे), गंधयुक्त क्षुप (झुडूप) भारतातील सर्व उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत लागवडीत असून हिमालयात व मध्य आशियात रानटी अवस्थेत सापडते तसेच यूरोप (इटली, यूगोस्लाव्हिया, तुर्कस्तान, फ्रान्स), चीन, जपान व अमेरिका येथेही याची लागवड केली जाते. स्त्री-क्षुप अधिक उंच व पानेमोठी. खोडावर खोलगट रेषा व लव सोपपर्ण (उपपर्ण असलेली) पाने एकाआड एक परंतु खालची समोरासमोर, हस्ताकृती, खंडित दले खाली १–३, वर ३–८, दातेरी. फुले एकलिंगी, फिकट हिरवी, लहान, कक्षास्थ (बगलेत). पुं-पुष्पबंध (पुं-फुलोरा) लोंबता झुबका परिदले ५, केसरदले ५ स्त्री-पुष्पबंध सरळ स्त्री-पुष्पे छदांनी वेढलेला झुबका परिदले जुळलेली, किंजदले २, किंजले २, किंजपुट १ व बीजक १ [→ फूल].कृत्स्नफळ (एक-बीजी, शुष्क फळ) परिदलवेष्टित, बी १ व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेली) गर्भ वाकडा.

गांजा : (१) फांदी, (२) स्त्री - पुष्पांचा फुलोरा, (३) पुं-पुष्प, (४) स्त्री-पुष्प.

खोड व फांद्यांपासून पांढरे, भुरकट, हिरवट किंवा काळे धागे काढून त्याचे दोर, केबल, चटया, पिशव्या, जाळी, शिडाचे व जाडेभरडे कापड, गालिचे इ. बनवितात. परदेशांत धाग्यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर करतात. वाळलेल्या पानांपासून ‘भांग’ नावाचे मादक पेय पदार्थ बनवितात. स्त्री-फुलोरा वाळवून टोकाच्या भागापासून ‘गांजा’ मिळवितात व हातावर मळून तंबाखूबरोबर चिलिमीतून ओढतात यालाच स्पॅनिश भाषेत ‘मरीव्हाना’ (मारिजुआना) म्हणतात. पाने व फुलोऱ्यापासून काढलेली चिकट राळ वाळवून ‘चरस’ (हशिश) नावाचे द्रव्य काढतात. भांग, गांजा व चरस ही गुंगी आणणारी द्रव्ये आहेत आणि त्यांच्या अतिसेवनाने ⇨अफू  व अल्कोहॉलाप्रमाणे मेंदू आणि तंत्रिका-तंतूंवर (मज्‍जातंतूंवर) अनिष्ट परिणाम होतात. या दुष्परिणामांमुळे गांजाची लागवड, उत्पादन, विक्री व उपयोग यांवर कायदेशीर बंधने घालण्यात आलेली आहेत. तथापि गांजाचा चोरटा व्यापार अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर चालतो. ही द्रव्ये क्षुधावर्धक (भूक वाढविणारी), निद्राजनक (झोप आणणारी), स्वेदकारी (घाम आणणारी), वेदनाहारक असून आमांश, अतिसार, अपचन इत्यादींवर गुणकारी असतात. सुश्रुतसंहितेत भांगेचा औषधी म्हणून उल्लेख आढळतो. पानाचा रस लावल्यास डोक्यातील दारुणा (कोंडा) व कीड नाहीशी होते. बियांचे तेल संधिवातावर गुणकारी. ते दिव्याकरिता तसेच रंग, रोगणे व साबण ह्यांकरिता वापरतात बी पक्ष्यांना खाद्य म्हणून व दुभत्या जनावरांना अधिक दूध येण्यास उपयुक्त असते.

पहा : औषधासक्ति कॅनाबिनेसी मादक पदार्थ.

घन, सुशीला प.