वाकेरी : (१) संयुक्त पानाचा भाग : (अ) दले, (आ) दलके (२) फुलोरा, (३) फूल, (४) किंजपुटाचा उभा छेद, (५) शिंबा, (६) बी.वाकेरी : (वागटी, वाकेरी-मूळ क. हूगलीगंजे सं. घृतकरंज लॅ. वागाटिया स्पायकॅटा, सीसॅल्पिनिया डायगायना कुल-लेग्युमिनोजी), फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] संकेश्वर, सागरगोटा, बाहवा इत्यादींशी काही लक्षणांत सारखेपणा दाखविणारी व सीसॅल्पिनिऑइडी या त्यांच्याच उपकुलातील ही शिंबावंत (शेंगा असणारी), कणखर व काटेरी वेल असून हिच्या प्रजातीत एकच जाती आहेत. हिचा प्रसार कारवार व महाराष्ट्र (कोकण व सह्याद्री घाट) येथील दाट जंगलांत बराच आहे. शिवाय पूर्वेस आसाम, बंगाल, पूर्व हिमालय, म्यानमार, (ब्रह्मदेश) व श्रीलंकेत आहे. खोड व फांद्यांवरची साल गर्द पिंगट व लाल असून सर्वच भागांवर वाकडे कठीण काटे असतात. पाने संयुक्त, पिसासारखी दोनदा विभागलेली व २३-३० सेंमी. लांब असतात. दले ५-८ जोड्या असून प्रत्येक दल ७.५-१२.५ सेंमी. लांब असते. दलकांच्या ६-१० जोड्या असून ती गर्द व काळसर हिरवी, जाडसर व लंबगोल असतात. संमिश्र फुलोरे [कणिशांची मंजिरी ⟶ पुष्पबंध] जानेवारी ते फेब्रुवारीत येतात व त्यावर सुंदर बिनदेठाची फुले येतात. संवर्त शेंदरी व पुष्पमुकुट गर्द नारिंगी असून केसरदले दहा, सुटी व कमी जास्त लांबीची असतात [⟶  फूल]. शिंबा लांबट (२.५-६ × १.३ सेंमी) फुगीर व खाचदार आणि बिया ३-४ काहीशा लंबगोल व कठीण असतात. इतर सामान्य शारिरीक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात व सीसॅल्पिनिऑइडी उपकुलात (शिंबावंत कुलातील संकेश्वर उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

मूळ (भाते) व साल औषधी असतात. मूळ (अथवा त्यावरची गाठ) स्तंभक (आकुंचन करणारी) असून क्षयावर व न्यूमोनियावर देतात. मूळ उगाळून लेप भगंदर, नाडीव्रण, नासरू, इत्यादींवर लावतात, शिवाय पाण्यात अगर दुधात उगाळून पोटात घेण्यास देतात. सालीचा लेप जखमा व चर्मरोगांवर लावतात. शिंबांमध्ये भरपूर टॅनीन असते (पैकी सालीत ५४% व शेंगेत २८%) परंतु त्याची व्यापारी प्रमाणावर निर्मिती होत नाही. बियांतील तेल दिव्याकरिता उपयोगी असते. पायरोगॅलॉलच्या उत्पादनार्थ गॅलिक अम्‍ल यातूनच काढले जाते. मुळाचे चूर्ण स्तंभक असल्याने आमांशावर देतात. उपदंशावर मूळ गाईच्या निरशा दुधात उगाळून पोटात घेतात.

परांडेकर, शं. आ.