मेडशिंगी : (१) फुलांसह फांदी, (२) फुलाचा उलगडलेला पुष्पमुकुट व केसरदले, (३) दात्राकृती बोंड, (४) सपक्ष बीज.

मेडशिंगी : (हिं. हवर गु. मारीसंगी क. बुडिगे, कायतुंबू सं. अजशृंगी लॅ. डॉलिकँड्रॉन फॅल्कॅटा कुल-बिग्नोनिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार येथे आणि मध्य प्रदेश व द. भारतातील घनदाट जंगलांत तो आढळतो. त्याच्या डॉलिकँड्रॉन प्रजातीत १० जाती असून त्यांपैकी ५ भारतात आढळतात. याची उंची ६–१५ मी. पर्यंत व क्वचित अधिक असते. कोवळे भाग लवदार आणि साल पातळ व निळसर करडी असून ती खवल्यासारख्या तुकड्यांनी सोलून निघते. पाने संयुक्त, बहुधा समोरासमोर व विषमदली (दलांची संख्या सारखी नसलेली) असतात. दले १·३–४ सेंमी. लांब व तितकीच रुंद. समोरासमोर, ५–७, वर्तुळाकृती किंवा मुकुलाकृती (कळीसारखी) असून टोकाचे दल मोठे असते. पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले ४ सेंमी. लांब, लहान व फांद्यांच्या टोकांस असलेल्या मंजिऱ्यांवर मार्च-मेमध्ये येतात. संवर्त महाछदासारखा (मोठ्या वेष्टनाप्रमाणे) व केसाळ असून पुष्पमुकुट लांबट घंटेसारखा, पांढरा व चुण्या पडलेला असतो केसरदले चार, दीर्घद्वयी (चारांपैकी दोन अधिक लांब असलेली) फुलाच्या तळातील बिंब वलयाकृती असते. किंजपुटात अनेक बीजके असतात [⟶फूल]. शुष्क फळ (बोंड) सपाट, वाकडे, लांबट, २५–४५ X २ सेंमी. व फुटीर असून ते दात्राकृती (कोयत्याच्या आकाराचे म्हणून फॅल्कॅटा हे जातिवाचक नाव) असते. बिया विपुल, सपाट, आयत, २·५ X ०·६ सेंमी. व सपक्ष (पंखयुक्त) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे

बिग्नोनिएसी वा टेटू कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वृक्षाचे लाकूड कठीण, बळकट, टिकाऊ, चकचकीत व गुळगुळीत असून बांधकाम, शेतीची अवजारे इत्यादींकरिता वापरतात. गुरे पाने खातात. वनस्पतीचा किंवा फळांचा काढा गर्भपात घडविण्यास देतात. साल मत्स्यविषाकरिता वापरतात. अंतर्सालीपासून काळपट रंगाचा जाडाभरडा धागा काढतात. फळ मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे असल्याने हिला मेढशिंगी असेही म्हणतात.

संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol. III, New Delhi, 1975.

देशपांडे, सुधाकर