कावळी : (वाकुंडी, बेडकी; हिं. खरसिंग, मेरासिंगी; क. सण्णगर्से; गु. मर्दाशिंगी; सं. मेषशृंगी, मधुनाशिनी; इं. स्मॉल इंडियन इपेककुन्हा; लॅ. जिम्नेमा सिल्व्हेस्टर ; कुल-ॲस्क्लेपीएडेसी). ही वनस्पती भारतात महाबळेश्वरात विपुल असून धारवाड, बेळगाव, सह्याद्री घाट, कारवार, बांदा येथेही बरीच आढळते. आशिया व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका येथेही ही मिळते. ही मोठी, काष्ठमय, अनेक शाखायुक्त वर चढणारी वेल इतर उंच झाडांच्या शेंड्यांपर्यंत जाते.

कावळी

कोवळ्या खोडांवर दाट व बारीक लव असते. पाने साधी, समोरासमोर, ३⋅७५—५ X १⋅२५ — ३⋅७५ सेंमी., टोकदार, तळाशी गोलाकार किंवा हृदयाकृती; पानाची खालची बाजू अधिक लवदार; कुंठित चामरकल्प फुलोरे [⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेतून एप्रिल-मेमध्ये येतात. फुले लहान, सु.१⋅५ सेंमी. लांब व पिवळ्या रंगाची असतात. पुष्पमुकुट घंटाकृती; प्रदले जाड, पसरट व गुळगुळीत पुष्पमुकुटाचे तोरण पंचभागी; हे भाग व प्रदले एकांतरित (एकाआड एक); किंजल्क जाड, अर्धगोलाकार, पांढरट आणि परागकोशांहून पुष्कळच बहिरागत असतो [⟶फूल ]. पेटिकाफळ पाच ते आठ सेंमी. लांब, सु.०⋅६ सेंमी. व्यासाचे, गोल, टोकदार व गुळगुळीत असून बहुधा एकएकटे असते. बिया लहान, कडा पातळ, रुंद व राखी रंगाच्या असतात [ ⟶ ॲस्क्लेपीएडेसी ].

कावळीच्या पानांचा विशिष्ट गुण असा की, पाने चांगली चावली तर तोंडातील गोड व कडू चव नाहीशी होते; मात्र आंबटपणा व खारटपणा कळतो. काही तासांनंतर परत तोंडास खरी चव कळू लागते. ही वनस्पती दीपक (भूक वाढविणारी), उत्तेजक, सारक आणि मूत्रल (लघवी साफ करणारी) असून खोकला, पित्तविकार, काही नेत्रविकार इत्यादींवर गुणकारी आहे. पानांची भुकटी तपकिरीप्रमाणे नाकात ओढून नासिकास्राव वाढविण्यास वापरतात; शर्करामेहावर (मधुमेहावर) गुणकारी; कीटकदंशावर लावण्यास उपयुक्त. ज्वरावर मुळांचा काढा देतात; मूळ वांतिकारक व कफोत्सारक असते.

हर्डीकर, कमला श्री.